दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने विविध ठिकाणांहून सहा दहशतवाद्यांना अटक केल्यानंतर आता महाराष्ट्र एटीएसने मोठी कारवाई केली आहे. महाराष्ट्र एटीएसने मुंबईतून एका संशयित दहशतवाद्याला ताब्यात घेतले आहे. ताब्यात घेण्यात आलेल्या व्यक्तीचं नाव झाकिर असल्याची माहिती समोर आली आहे.
दिल्ली पोलिसांनी अटक केलेल्या सहा दहशतवाद्यांपैकी एक दहशतवादी हा मुंबईत राहणारा होता. त्यातच आता महाराष्ट्र एटीएसने मुंबईतून आणखी एका संशयित दहशतवाद्याला ताब्यात घेतल्याने एकच खळबळ उडाली आहे. एएनआय न्यूज एजन्सीने दिलेल्या वृत्तानुसार, ही कारवाई रात्री उशिरा महाराष्ट्र एटीएस आणि मुंबई पोलिसांनी केली आहे.
एएनआयने दिलेल्या वृत्तानुसार, महाराष्ट्र एटीएसने जोगेश्वरी परिसरातून एका व्यक्तीला ताब्यात घेतले असून त्याचे नाव झाकिर असे आहे. या झाकिरचे आणि दिल्ली पोलिसांनी अटक केल्या सहा दहशतवाद्यांचे एकमेकांसोबत संबंध असल्याची माहिती समोर आली आहे. त्यानुसारच महाराष्ट्र एटीएस आणि मुंबई पोलिसांनी झाकिरला ताब्यात घेतले आहे.
एएनआयच्या वृत्तानुसार, अटक करण्यात आलेला दहशतवादी जान मोहम्मद याने झाकिरला मुंबईत स्फोटके आणि इतर शस्त्रे आणण्यास सांगितले होते अशी माहिती एटीएसने दिली आहे.
दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने अटक केलेल्या सहा दहशतवाद्यांपैकी एक दहशतवादी हा मुंबईत राहणारा असल्याची माहिती समोर आली आहे. ज्याचे नाव जान मोहम्मद असून त्याच्याबाबत एटीएसने मोठी माहिती दिली आहे.
महाराष्ट्र एटीएसचे प्रमुख विनीत अग्रवाल यांनी पत्रकार परिषद घेत जान महोम्मद याच्या बाबत माहिती दिली आहे. दिल्ली पोलिसांनी 6 जणांना अटक केली आहे त्यापैकी एक जण मुंबईत राहणारा असून त्याचे नाव जान मोहम्मद शेख आहे. मुंबईतील धारावीत राहणारा जान मोहम्मद याची गुन्हेगारी पार्श्वभूमी असून तो गेल्या 20 वर्षांपासून डी कंपनीच्या संपर्कात होता अशी माहिती एटीएस प्रमुखांनी दिली आहे.
जान मोहम्मद शेख याच्यावर कर्ज होते आणि त्याला पैशांची गरज होती. त्याने कर्ज काढून एक टॅक्सी घेतली होती पण त्या कर्जाची परतफेड करु न शकल्याने त्याने पुन्हा डी गॅंगला संपर्क केला अशी माहितीही एटीएसने पत्रकार परिषदेत दिली.