आज दि.६ आॕक्टोबर च्या दिवसभरातील ठळक घडामोडी अशा…

मान्सूनच्या परतीचा
प्रवास सुरू

आता या मान्सूनच्या परतीचा प्रवास सुरू झाला आहे.
हवामान विभागाने याविषयीचा अंदाज वर्तवला आहे. आजपासून मान्सूनचा परतीचा प्रवास सुरू झाला आहे. येत्या २४ तासांमध्ये या परतीच्या प्रवासासाठी अनुकूल वातावरण निर्माण होणार आहे. मान्सूनच्या परतीच्या प्रवासाला पश्चिम राजस्थान, संलग्न गुजरातच्या काही भागातून आजपासून सुरुवात होत आहे.

देशातील एक लाख वीस हजार
शाळांमध्ये केवळ एक शिक्षक

देशात सुमारे १ लाख २० हजार अशा शाळा आहेत, जिथे फक्त एकच शिक्षक आहे. त्यापैकी ८९ टक्के शाळा या ग्रामीण भागातील आहेत, असं युनेस्कोच्या अहवालात म्हटलंय. भारताला आणखी ११.१६ लाख शिक्षकांची गरज असल्याचे अहवालात सांगण्यात आले आहे. ‘स्टेट ऑफ एज्युकेशन रिपोर्ट -२०२०’ हा शिक्षकांवर केंद्रित अहवाल आहे. यातील माहिती ही पीरियोडिक लेबर फोर्स सर्व्हे (PLFS) आणि शिक्षणासाठी एकात्मिक जिल्हा माहिती प्रणाली (UDISE) डेटाच्या विश्लेषणावर आधारित आहे. प्रा. सारंगपाणी यांच्या नेतृत्वाखालील टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस, मुंबईच्या तज्ज्ञांच्या टीमने युनेस्कोच्या टीमला हा अहवाल तयार करण्यात मदत केली.

पंचायत समिती पोटनिवडणुकीत
काँग्रेसची मुसंडी

पंचायत समिती पोटनिवडणुकीत काँग्रेसने मुसंडी मारली आहे. “काँग्रेसने चांगल काम केलं. त्याचंच फळ आजच्या निकालात पाहायला मिळत आहे. देशात भाजपाची वागणूक, शेतकरी विरोधी धोरण, बहुजनांच्या विरोधातील धोरण, देशाला विकण्याची जी पॉलिसी भाजपाने सुरु केली आहे. त्या व्यवस्थेला फक्त काँग्रेसचं थांबवू शकतं हे जनतेचं मत आहे,” असा विश्वास काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी व्यक्त केला आहे.

जिम कॉर्बेट व्याघ्र प्रकल्पाचे नाव
आता रामगंगा राष्ट्रीय उद्यान

देशातील प्रसिद्ध राष्ट्रीय उद्यानांपैकी एक असलेल्या जिम कॉर्बेट व्याघ्र प्रकल्पाचे नामकरण रामगंगा राष्ट्रीय उद्यान असे करण्यात येईल. जिम कॉर्बेट राष्ट्रीय उद्यानाचे संचालक म्हणाले की, केंद्रीय वन आणि पर्यावरण मंत्री अश्विनीकुमार चौबे या उद्यानाला भेट देण्यासाठी आले होते, यावेळी या उद्यानाचे नामकरण रामगंगा राष्ट्रीय उद्यान केले जाईल, असं त्यांनी सांगितलं. तसेच या प्रस्तावाबाबत औपचारिकता पूर्ण झाली आहे आणि लवकरच या संदर्भात घोषणा केली जाऊ शकते, असंही ते म्हणाले.

२०५० पर्यंत जागतिक स्तरावर
पाणीटंचाई गंभीर स्वरूप घेणार

पाणीटंचाई ही भीषण समस्या होत चालली आहे. २०५० पर्यंत जागतिक स्तरावर पाच अब्जाहून अधिक लोकांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागेल, असा इशारा संयुक्त राष्ट्रसंघाच्या (यूएन) एजन्सीने दिला आहे. हवामान बदलामुळे पूर आणि दुष्काळ यासारखा जागतिक धोका वाढत असून पाणी टंचाईमुळे प्रभावित लोकांची संख्याही वाढण्याची अपेक्षा आहे, असं जागतिक हवामान संघटनेने (डब्ल्यूएमओ) सांगितलं.

माजी मंत्री एकनाथ खडसे
रुग्णालयामध्ये दाखल

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी महसूलमंत्री एकनाथ खडसे यांना मुंबईमधील रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं आहे. खडसेंवर एक महत्वाची शस्त्रक्रीया करण्यात येणार असून यासाठीच त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती त्यांच्या वकिलांनी दिली आहे. पुण्यामधील जमीन घोटाळा प्रकरणी खडसे आज मुंबईतील सेशन कोर्टामध्ये अनुपस्थित राहिले होते. याच अनुपस्थितीसंदर्भात न्यायालयाला माहिती देताना वकिलांनी खडसे आजारी असल्याचं सांगितलं.

मंत्रालयाच्या गेटजवळ पुन्हा
एकदा आत्मदहनाचा प्रयत्न

मंत्रालयाच्या गेटजवळ पुन्हा एकदा आत्मदहनाचा प्रयत्न झाला आहे. राज्यात ओबीसींच्या राजकीय आरक्षणाचा प्रश्न पेटलेला असतानाच एका इसमाने आज (६ ऑक्टोबर) मंत्रालयाच्या मुख्य प्रवेशद्वारा जवळ अंगावर ज्वलनशील द्रव्य टाकून स्वतःला पेटवून घेण्याचा प्रयत्न केला आहे. “ओबीसी समाजाला आरक्षण मिळालंच पाहिजे”, अशी घोषणा देत त्याने हा आत्मदहनाचा प्रयत्न झाला केला. वेळीच हा प्रकार लक्षात आल्याने अनर्थ टळला. पोलिसांकडून तातडीने सदर इसमाला ताब्यात घेण्यात आलं आहे.

उठा उठा आता मंत्रालयात
सुद्धा जायची वेळ झाली

करोनाच्या पार्श्वभूमीवर लावण्यात आलेल्या लॉकडाऊननंतर जवळपास दीड वर्षांहून अधिक काळानंतर राज्यभरातील सर्व शाळा सोमवारपासून (४ ऑक्टोबर) पुन्हा सुरु झाल्या आहेत. दरम्यान, यावरून आता विरोधकांनी थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. “उठा उठा शाळा चालू झाली आता मंत्रालयात सुद्धा जायची वेळ झाली”, असा टोला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी ट्विटरच्या माध्यमातून लगावला आहे. दरम्यान, यापूर्वीही अनेकदा करोना काळात मंत्रालयात न जाता मुख्यमंत्र्यांनी केलेल्या ‘वर्क फ्रॉम होम’मुळे सातत्याने भाजपा आणि मनसेने बोचऱ्या टीका केल्या आहेत.

पाकिस्तान संघाचा प्रशिक्षक
बनण्यास वसीम अकरमचा नकार

पाकिस्तानचा माजी कर्णधार आणि वेगवान गोलंदाज वसीम अकरमने प्रशिक्षक पदाबाबत आपली भूमिका स्पष्ट केली आहे. वसीम अकरमकडे क्रिकेटचा चांगला अनुभव असून १९९२ विश्वचषक विजेत्या संघात त्याची मोलाची भूमिका होती.त्याच्या नेतृत्वाखालील संघ १९९९ विश्वचषकाच्या अंतिम फेरीत पोहोचला होता. तसेच टी २० लीगमध्ये त्याने एका संघाचं प्रशिक्षपदही भूषवलं आहे. त्याचबरोबर आयपीएलमध्ये कोलकाता नाइट राइडर्सच्या सहयोगी स्टाफमध्ये होता. त्यानंतर पाकिस्तान सुपर लीगच्या फ्रेंचाइजीसोबत काम करत आहे. असं असूनही पाकिस्तान संघाचा प्रशिक्षक बनण्यास त्याने नकार दिला आहे.

दसऱ्यापर्यंत पेट्रोल-डिझेलच्या
किंमतीचे सर्व रेकॉर्डस मोडीत निघणार?

देशातील पेट्रोल आणि डिझेलच्या किरकोळ किमतींनी मंगळवारी उच्चांकी पातळी गाठली. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत क्रूड ऑईलने 82 डॉलर प्रति बॅरलची पातळी पार केल्यानंतर या किंमती आणखी वाढण्याची अपेक्षा आहे. आंतरराष्ट्रीय तेलाच्या किमती 2014 नंतरच्या उच्चांकी पातळीवर गेल्याने इंधनाचे दर पुन्हा वाढले आहेत.

SD social media
9850 60 3590

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

scroll to top
error: आपल्याला माहिती कॉपी करण्याची परवानगी नाही.