मुख्यमंत्री साहेब, तुमचा २८ वर्षाचा मुलगा मंत्री होतो. पण आमच्या नियुक्तयांचं काय?

पुण्यातील फुरसुंगी परिसरात राहणाऱ्या स्वप्निल लोणकर या २४ वर्षीय तरुणाने आत्महत्या केल्यानंतर आख्ख्या महाराष्ट्राला धक्का बसला आहे. आत्महत्येपूर्वी त्याने लिहिलेल्या नोटमधून व्यवस्थेवरच अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. परीक्षा उत्तीर्ण होऊनही दोन वर्षांपासून स्वप्निल मुलाखतीच्या प्रतिक्षेत होता. पण मुलाखतच झाली नसल्यामुळे तो प्रचंड तणावाखाली होता. आता त्यानं आत्महत्या केल्यानंतर राज्यातील इतर स्पर्धा परीक्षा देणारी मुलं थेट सरकारला जाब विचारू लागली आहेत. राजकीय नेत्यांना सर्वसामान्य कुटुंबातील मुलांचं काही देणंघेणं नाही. या नेत्यांना केवळ स्वतःची मुलं सेट झाली पाहिजेत. एवढंच त्यांचं लक्ष आहे. मुख्यमंत्री साहेब, तुमचा २८ वर्षाचा मुलगा मंत्री होतो. पण आमच्या नियुक्तयांचं काय?”, असा परखड पण उद्विग्न सवाल या मुलांकडून विचारला जात आहे.

अक्षय रामहरी शेळके, महेश घरबुडे, महेश पांढरे, अविनाश शेमबाटवाड, सचिन सावदेकर, रामेश्वर आर या सर्वच परीक्षार्थींनी या मुद्द्यावरून सरकारला कठोर प्रश्न केले आहेत. “राज्यभरात स्पर्धा परीक्षा देणार्‍या मुलांची संख्या तीन लाखांहून अधिक आहे. ही परीक्षा देताना, लाखो रुपये खर्च होतात. ही स्पर्धा देणारे बहुतांश विद्यार्थी हे ग्रामीण भागातीलच आहे. घरून सर्व पैसे पुरवले जातात. एवढं करून देखील परीक्षेत पास झालो नाही. तर घरचे आणि गावातील लोक काय म्हणतील? असे विचार मनात येतात. यामुळे आम्ही गावाला देखील जाणं बंद केलंय, असं या परीक्षार्थींच म्हणणं आहे.

मागील काही वर्षात MPSC ची परीक्षा देणार्‍या विद्यार्थ्यांच्या दृष्टीने शासन आणि आयोग कोणत्याही प्रकारचे निर्णय घेत नाही. परीक्षेच्या तारखे पासून ते नियुक्त्या जाहीर करेपर्यंत आजवर गोंधळ पाहण्यास मिळाला आहे. याचा फटका सर्व कुटुंबातील तरुणांना बसला आहे. परीक्षा देत-देत वय निघून गेलंय. कोणी लग्नासाठी मुलगी देत नाही. एवढं शिक्षण घेऊन आमच्या वाट्याला अपयश आणि नैराश्य आलं आहे. आम्ही कसं जगायचं आणि शेतात राबणाऱ्या बापाला काय उत्तर द्यायचं? असा सवाल हे परीक्षार्थी आता विचारू लागले आहेत.

शासन आणि राजकीय नेत्यांच्या इच्छा शक्तीच्या अभावामुळे स्वप्निलने आत्महत्येचं पाऊल उचललं. याला जबाबदार ही व्यवस्था असून असे स्वप्निल अभ्यासिकेत अनेक वेळा पाहायला मिळतात. हे झालं आमच्या मित्राचं, पण ज्या राज्यकर्त्यांमुळे आमच्यावर ही वेळ आली. त्यांना आमचं देणंघेणं नसून त्यांना त्यांच्या मुलांना आमदार, खासदार आणि मंत्री म्हणून सेट करायचं आहे. आपल्या राज्याचे कुटुंबप्रमुख मुख्यमंत्री साहेब तुमचा मुलगा २८ वर्षाचा आहे. तो आमदार होतो, मंत्री होतो. पण आमचं काय? मुख्यमंत्री साहेब आमच्या परीक्षा ते नियुक्त्यांबाबत निर्णय घ्या. अन्यथा शेतकरी आत्महत्यांनंतर स्पर्धा परिक्षेच्या विद्यार्थ्यांचा विस्फोट होईल, एवढंच सरकारने लक्षात ठेवावं, असा इशारा देखील या परीक्षार्थींनी दिला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

scroll to top
error: आपल्याला माहिती कॉपी करण्याची परवानगी नाही.