स्वप्निल लोणकर याने पुण्यात आत्महत्या केल्याच्या घटनेनं त्यांच्या कुटुंबियांवर दुःखाचा डोंगरच कोसळला. ऐन उमेदीच्या काळात खचून गेल्यानं स्वप्निलनं टोकाचं पाऊल उचललं, पण निर्णयाने त्याच्या आईच्या काळजावर मोठा घावच घातला. मागच्या दोन वर्षांपासून स्वप्निलच्या मनावर होत असलेल्या आघातांचे अनुभव सांगत त्या माऊलीने सरकारला जळजळीत सवाल केला आहे. ‘मला माहितीये माझं पोरंग किती झुरायचं… दोन वर्ष माझं पोरंग किती झुरलं. आई, इंटरव्ह्यू झाला नाही, असं म्हणायचं. मी पास झालो, इंटरव्ह्यू नाही झाला,’ असं म्हणत स्वप्निलच्या आईने हंबरडा फोडला.
स्वप्निलच्या आत्महत्येनं त्यांचं दुःखात बुडालं आहे. स्वप्निलच्या मृत्यूचं वृत्त त्याची आई छाया लोणकर यांच्यासाठी मोठा आघात ठरला. स्वप्निलच्या आत्महत्येनंतर त्यांच्या आईने सरकारबद्दल संताप व्यक्त केला. “मला सांगा एखाद्या मंत्र्याच्या मुलाने आत्महत्या केली असती, तर मंत्र्यांना जाग आली असती की नाही? तसंच जरा दुसऱ्यांच्या जिवाचा विचार करा ना… दुसऱ्याच्या आईवडिलांचा विचार करा ना की, त्यांच्यावर काय परिस्थिती आली आहे. माझ्या कुटुंबाची काय परिस्थिती आहे, हे माझं मलाच माहिती. आम्ही त्याला कसं शिकवलं? तो किती हुशार होता. हुशार होता म्हणून त्याला तिथपर्यंत पोहोचवलं. तिथपर्यंत पोहोचण्याआधी सरकारने अशी मुलं आत्महत्येकडे करावीत का?,” असा जळजळीत सवाल स्वप्निलच्या आईने सरकारला केला आहे.
“माझा हा तळतळाट आहे. एखाद्या मंत्र्यांच्या मुलाने आत्महत्या करावी. त्याच्याशिवाय सरकारला कळणार नाही. आत्महत्या काय असते? मुलगा जाण्याचं दुःख काय असतं. त्यांना नाही कळणार. त्याची नुसती भांडणं… जगात काय चाललंय त्यांना काही देणंघेणं नाही. कोण किती सोसतंय… कोण काय करतंय त्यांना काही नाही. त्यांचं फक्त राजकारण चाललंय. मला माहितीये माझं पोरंग किती झुरायचं… दोन वर्ष माझं पोरंग किती झुरलं. आई, इंटरव्ह्यू झाला नाही, असं म्हणायचं. मी पास झालो, इंटरव्ह्यू नाही झाला. दोन वर्षात किती झुरलं मला माहितीये. तो माझ्याशी बोलायचा. त्यांना काही देणंघेणं नाही…. त्यांची मुलं सुरक्षित आहेत… गरिबांची काय कितीही मेली, तरी त्यांना काही देणंघेणं नाही,” असं म्हणत स्वप्निलच्या आईने हंबरडा फोडला.