कर्जबाजारी एअर इंडियाने पुन्हा एकदा आपली काही स्थावर मालमत्ता विक्कीस काढली आहे. यापैकी काही मालमत्ता आरक्षित किंमत कमी करून पुन्हा लिलावात आणल्या जातील. या माध्यमातून कंपनी आपले नुकसान भरून काढण्याचा प्रयत्न करेल. कंपनीच्या या ऑफरमुळे दिल्ली-मुंबईसारख्या मोठ्या शहरांमध्ये घराचे स्वप्न पाहणाऱ्यांचे स्वप्न पूर्ण होऊ शकेल. आपण स्वस्त दरात लक्झरी फ्लॅट्स खरेदी करू शकता. यासाठी 8 आणि 9 जुलै रोजी ऑनलाईन बोली लावण्यात येणार आहे.
एअर इंडिया देशातील 10 मोठ्या शहरांमधील आपल्या मालमत्तांचा लिलाव करणार आहे. यासाठी कंपनी ऑनलाईन लिलावाचे आयोजन करणार आहे. एअर इंडियाने या माध्यमातून 250 ते 300 कोटी रुपये उभे करण्याची योजना आखली आहे. मनी कंट्रोलच्या वृत्तानुसार, या युनिटची प्रारंभिक बोली 13.3 लाख रुपयांपासून सुरू होईल.
एअर इंडियाने जारी केलेल्या नोटीसनुसार मुंबईत एक निवासी प्लॉट व फ्लॅट, नवी दिल्लीत पाच फ्लॅट, बंगळुरूमध्ये एक निवासी प्लॉट आणि कोलकाता येथे चार फ्लॅट आहेत. कंपनी या सर्व मालमत्तांची विक्री करेल. त्याचप्रमाणे औरंगाबादमधील बुकिंग कार्यालय व स्टाफ क्वार्टर, नाशिकमधील 6 फ्लॅट्स, नागपुरातील बुकिंग कार्यालय, एअरलाइन्स हाऊस व भुजमधील एक निवासी भूखंड व तिरुअनंतपुरम मधील एक निवासी भूखंड लिलावासाठी उपलब्ध आहेत. यापूर्वीच्या अनेक वेळा या लिलावाच्या स्लॉटमध्ये अशा अनेक मालमत्ता ठेवल्या गेल्या आहेत.
माध्यमांच्या वृत्तानुसार कंपनीच्या सूत्रांचे म्हणणे आहे की, निवडलेल्या मालमत्तांमध्ये विशेषत: टियर 1 शहरांमध्ये फ्लॅट खरेदी करण्यावर 10 टक्क्यांपर्यंत अतिरिक्त सूट मिळू शकेल. कारण येथे राखीव किंमत कमी करण्यात आली आहे. लिलावात समाविष्ट करावयाच्या मालमत्ता निवासी आणि व्यावसायिक दोन्ही असतील.