नोकरी, किंबहुना चांगल्या पगाराची नोकरी हा सध्याच्या पिढीच्या आयुष्यातील एक महत्त्वाचा मुद्दा, किंबहुना एक ध्येय्य. अनेक स्वप्न साकार करण्यासाठी नोकरीची ही पायरी चढण्याचं धाडस सर्वजण करतात. पण, अशाच काही मंडळीच्या मनात खूप सारे न्यूनगंड असतात.
मग ते आपण शिक्षण एखाद्या स्थानिक शाळेतून झाल्याबाबतचा संकोचलेपणा असो किंवा आपण इंग्रजी माध्यमात न शिकल्याची खंत असो. पण तुम्हाला माहितीये का, आपल्या कौशल्यापुढे भाषेची बंधनं कधीच आलेली नाहीत. हे एका व्यक्तीनं दाखवून दिलं आहे.
प्राथमिक शिक्षण हिंदी भाषेतून झालेल्या या व्यक्तीला Google नं तब्बल 3.30 कोटी रुपयांच्या दणदणीत पॅकेजची नोकरी दिली आहे. श्रीधर चंदन असं या व्यक्तीचं नाव. राजस्थानच्या अजमेरमधील श्रीधरला वर्षाला 3.30 कोटी रुपये पगार म्हणून मिळणार आहेत. बसला ना धक्का? Google नं श्रीधरला सिनीयर ग्रुप इंजिनीयर या पदावर नियुक्त केलं आहे. सध्या तो न्यूयॉर्कस्थित ब्लूमबर्ग या कंपनीमध्ये सिनीयर इंजिनीयर या पदावर नोकरी करत आहे.
श्रीधर शालेय जीवनापासून अभ्यासात पुढे होता. पुण्यातून त्यानं कंप्युटर सायन्स या क्षेत्रातून पदवी घेतली. सर्वप्रथन त्यानं हैदाबादमधील इंफोसिसमध्ये नोकरी केली. 2012 मध्ये तो स्नातक पदवीसाठी अमेरिकेला गेला. इथं वर्जिनीया विद्यापीठातून ही पदवी घेतल्यानंतर त्याला ब्लूमबर्गमध्ये नोकरी मिळाली.
सुट्टीच्या दिवसांमध्ये त्यानं अभ्यास केला, नोकरी करतच शिक्षणही घेणाऱ्या श्रीधरची निवड अखेर जगविख्यात Google नं केली. श्रीधरच्या वडिलांनीही बरीच मेहनत घेतलीय दहा-बाराव्या वर्षापासूनच त्यांच्या संघर्षाची सुरुवात झाली. पुढे इंजिनीयरिंगचं शिक्षण घेतल्यानंतर त्यांना गुजरातमध्ये नोकरी मिळाली आणि त्यानंतर 1976 मध्ये सिंचन विभागात त्यांना इंजिनीयर पदावर नोकरी मिळाली.
एखाद्यासाठी संघर्ष किती लहान किंवा किती मोठा हे महत्त्वाचं नसतं, तर या संघर्षाच्या काळातही तुम्ही तुमच्या स्वप्नांशी आणि मेहनतीशी किती प्रामाणिक राहता हेच सर्वात जास्त महत्त्वाचं असतं. अनेक वर्षांनी जेव्हा आपण यशाच्या टप्प्यावर पोहोचतो तेव्हा मागे वळून पाहताना याच प्रामाणिकपणाचं चीज झाल्याची भावना मनात घर करून जाते.