भाजपाच्या १२ आमदारांचं निलंबन
सुप्रीम कोर्टाकडून रद्द
भाजपाच्या १२ आमदारांचं निलंबन सुप्रीम कोर्टाकडून रद्द करण्यात आलं आहे. इतर मागासवर्गीयांचे (ओबीसी) राजकीय आरक्षण कायम राहण्याकरिता केंद्राकडून सांख्यिकी माहिती मिळावी, यासाठी पावसाळी अधिवेशानावेळी विधानसभेत मांडण्यात आलेल्या ठरावावेळी विरोधकांनी जोरदार गदारोळ केला होता. अध्यक्षांच्या दालनात पीठासीन अधिकारी भास्कर जाधव यांना शिवीगाळ आणि अंगावर धावून जाण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी १२ आमदारांना एका वर्षांसाठी निलंबित करण्यात आलं होतं. यानंतर याप्रकरणी सुप्रीम कोर्टात धाव घेण्यात आली होती. सुप्रीम कोर्टाने हा निर्णय असंवैधानिक असल्याचं सांगत निलंबन रद्द केलं.
भय्यू महाराज आत्महत्या प्रकरणी
मुख्य सेवक, चालक दोषी
मागील अनेक वर्षांपासून भय्यू महाराज आत्महत्या प्रकरणी न्यायालयात सुनावणी सुरू होती. अखेर इंदोर न्यायालयाने भय्यू महाराजांचा मुख्य सेवक विनायक, केअर टेकर पलक आणि चालक शरदला दोषी ठरवलं आहे. या तिघांनीही भय्यू महाराजांना आत्महत्येला प्रवृत्त केलं असं निरिक्षण न्यायालयाने नोंदवलं. त्यांनी इंदोरमधील आपल्या राहत्या घरात गोळी झाडून आत्महत्या केली होती. अखेर न्यायालयाने पुराव्यांच्या आधारे तिन्ही आरोपींना केवळ दोषी घोषित केलं.
भय्यू महाराज यांनी २०१८ मध्ये परवानाधारक पिस्तुलने गोळ्या झाडत आत्महत्या केली होती.
भाजपाचे आमदार नितेश राणे
जिल्हा न्यायालयात हजर
सुप्रीम कोर्टाने अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळल्यानंतर भाजपाचे आमदार नितेश राणे जिल्हा न्यायालयात हजर झाले. सिंधुदुर्ग जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत यांचे प्रचारप्रमुख संतोष परब यांच्यावर झालेल्या हल्लाप्रकरणी नितेश राणे यांचा अटकपूर्व जामीन अर्ज सुप्रीम कोर्टाने गुरुवारी फेटाळला. यावेळी सुप्रीम कोर्टाने नितेश राणे यांना जिल्हा न्यायालयात शरण जाण्यास तसंच नियमित जामिनासाठी अर्ज करावा असे निर्देश दिले होते. यासाठी कोर्टाने नितेश राणे यांना १० दिवसांची मुदत दिली होती. तसंच तोपर्यंत त्यांना अटक करु नये असे निर्देश देत दिलासा दिला होता.
येत्या दोन-तीन दिवसात महाराष्ट्रात
थंडीची लाट येण्याची शक्यता
महाराष्ट्रात काही भागात येत्या दोन-तीन दिवसात थंडीची लाट येण्याची शक्यता आहे. विदर्भात हवामानात मोठी घट दिसून येईल. तसेच उत्तर-पश्चिम, मध्य भारत (Central India), पूर्व भारत आणि मध्य प्रदेशच्या (Madhya Pradesh काही भागात थंडीची लाट राहील. या काळात देशातील अनेक राज्यांमध्ये पाऊस पडेल, असा अंदाज भारतीय हवामान विभागाने वर्तवला आहे. हवामान विभाग (IMD) नुसार, ताज्या वेस्टर्न डिस्टर्बन्समुळे, जम्मू आणि काश्मीर, लडाख गिलगिट-बाल्टिस्तान-मुझफ्फराबादमध्ये 29-31 जानेवारी दरम्यान हलका पाऊस. हिमवर्षाव होण्याची शक्यता आहे. याशिवाय 2 ते 4 फेब्रुवारी दरम्यान मैदानी भागात हलका पाऊस पडू शकतो.
एलटीटीईने १२ वर्षांनंतर पुन्हा
एकदा डोकं वर काढले
जवळपास एक तपापूर्वी अर्थात २००९ साली एलटीटीईचा म्होरक्या प्रभाकरनसोबतच या संपूर्ण संघटनेच्या मुसक्या आवळण्यात सुरक्षा यंत्रणांना यश आलं होतं. त्यामुळे दक्षिण भारतात, विशेषत: तामिळनाडू आणि आसपासच्या भागातील नागरिकांनी सुटकेचा नि:श्वास टाकला होता. मात्र, त्यानंतर तब्बल १२ वर्षांनंतर पुन्हा एकदा या संघटनेनं डोकं वर काढल्याचं नुकत्याच झालेल्या एका कारवाईवरून स्पष्ट झालं आहे. तामिळनाडू पोलिसांनी एका गँगचा पर्दाफाश केला असून या संघटनेच्या पुनरुज्जीवनासाठी ही टोळी पैसा उभा करत असल्याची बाब समोर आली आहे
सिद्धूंनी पैशांसाठी आईला
म्हातारपणी वाऱ्यावर सोडलं
पंजाब काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नवज्योत सिंग सिद्धू यांच्यावर त्यांच्या मोठ्या बहिणीने गंभीर आरोप केले आहेत. सिद्धूंनी पैशांसाठी आपल्या आईला म्हातारपणी वाऱ्यावर सोडलं असा आरोप सुमन तूर यांनी केला आहे. सुमन अमेरिकेत वास्तव्यास असून सिद्धू फार क्रूर व्यक्ती असल्याचं म्हटलं आहे. सूमन सध्या चंदिगडमध्ये असून शुक्रवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी काही धक्कादायक आरोप केले. वडिलांच्या मृत्यूनंतर १९८६ मध्ये सिद्धू यांनी मला आणि आईला बाहेर काढलं असा आरोप त्यांनी केला.
आता संपूर्ण 30 दिवसांचे
रिचार्ज मिळणार
TRAI च्या टेलिकॉम टेरिफ Order 2022 अंतर्गत, सर्व दूरसंचार कंपन्यांना आता आदेश देण्यात आला आहे की, प्रत्येक कंपनीने किमान एक प्लॅन व्हाउचर, एक स्पेशल टॅरिफ व्हाउचर आणि एक कॉम्बो व्हाउचर ज्याची वैधता 28 दिवस नसून संपूर्ण 30 दिवसांचे असावे. जर ग्राहकाला या प्लॅन्सचे पुन्हा रिचार्ज करायचे असेल, तर ते सध्याच्या प्लॅनच्या तारखेपासून ते करू शकतात, अशी तरतूद असावी.
न्यायालयीन कारणांमुळे एमपीएससी
गट ब मुख्य परीक्षा पुढे ढकलली
एमपीएससी (MPSC Exam) गट ब मुख्य परीक्षा न्यायालयीन कारणांमुळे पुढे ढकलल्याची माहिती एमपीएससी आयोगाकडून देण्यात आली आहे. 5 आणि 12 फेब्रुवारीला ही परीक्षा होणार होती. काही विद्यार्थ्यांनी मुंबई हायकोर्टात याचिका दाखल केल्यानं परीक्षा पुढे ढकलत असल्याची माहिती आयोगाकडून दिली गेली आहे. एमपीएससी आयोगाने ट्विट करत परीक्षा पुढे ढकलत असल्याची अधिकृत माहिती दिली नाही, काही विद्यार्थ्यांनी न्यायालयीन लढ्याचा मार्ग स्वीकारल्याने परीक्षा पुढे ढकलण्याची वेळ एसपीएससी आयोगावर आली आहे.
LIC च्या आयपीओची
विवरण पुस्तिका अंतिम टप्प्यात
भारतातील सर्वात मोठी विमा कंपनी भारतीय आयुर्विमा महामंडळ (LIC) च्या आयपीओची सर्वांना प्रतीक्षा आहे. नेमका एलआयसीचा आयपीओ कधी दाखल होणार याकडं अर्थजगताचं लक्ष लागलं आहे. भारतीय आयुर्विमा महामंडळ (एलआईसी) इनिशियल पब्लिक ऑफरिंग (IPO) विवरण पुस्तिका अंतिम टप्प्यात आहे. एलआयसीकडून लवकरच सेबीला गुंतवणूक धोरण सादर केले जाणार आहे.
किराणा दुकान आणि सुपर
मार्केटमध्ये वाईन मिळणार
राज्य सरकारने आज मोठा निर्णय घेतला आहे. आता राज्यात किराणा दुकान आणि सुपर मार्केटमध्ये वाईन विक्रीसाठी उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. जे सुपर मार्केट एक हजार स्क्वेअर फुटाच्यावर आहे. तिथे एक स्टॉल टाकून वाईन विक्रीला मुभा देण्यात येणार आहे. दहा वर्षांपूर्वीचा हा प्रस्ताव आहे. त्यामुळे आज निर्णय घेण्यात आला.
२२ जिल्ह्यांमध्ये साप्ताहिक
पॉझिटिव्हिटी रेट सर्वाधिक
राज्यातील कोरोनाचे निर्बध शिथिल झाले असले, शाळा सुरु झाल्या असल्या तरी सावधान कोरोनाचे सावट अजूनही पूर्णतः संपलेलं नाही. राज्यातल्या २२ जिल्ह्यांमध्ये साप्ताहिक पॉझिटिव्हिटी रेट सर्वाधिक असल्याबद्दल मंत्रिमंडळाच्या बैठकीत चर्चा करण्यात आली. राज्याचा साप्ताहिक पॉझिटिव्हिटी रेट सरासरी २३.८२ टक्के इतका आहे. त्या तुलनेत २२ जिल्ह्यांत पॉझिटिव्हिटी रेट उच्चांकी पातळीवर आहे. त्यामुळे या जिल्ह्यात लसीकरण, प्रतिबंधात्मक उपाययोजना, चाचण्या वाढवण्यावर अधिक भर देण्यात यावा असा निर्णय या बैठकीत घेण्यात आला.
(फोटोसेवा गुगल साभार)
SD social media
9850 60 3590