राज्यात पुढील चार ते पाच दिवस पावसासह काही भागांत गारपीटही होण्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी सोसाट्याच्या वाऱ्यासह गारांचा पाऊस कोसळण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.
पावसाळी स्थितीमुळे राज्यातील तापमानात सध्या घट नोंदविली जात आहे. उष्णतेची लाट असलेल्या विदर्भात आता दिवसाच्या कमाल तापमानाचा पारा सरासरीखाली आला आहे. मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात तापमानाचा पारा ४० अंश सेल्सिअसच्या खाली आणि कोकण विभागातही कमाल तापमानाचा पारा सरासरीखाली आला आहे.
हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार, विदर्भात पुढील दोन दिवस सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस आणि गारपिटीचा अंदाज आहे. राज्यावर सध्या कमी दाबाचे क्षेत्र कार्यरत झाले आहे. विदर्भ ते दक्षिण तमिळनाडूच्या अंतर्गत भागापर्यंत उत्तर-दक्षिण कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे. या स्थितीमुळे राज्यात सध्या पावसाळी स्थिती निर्माण झाली आहे.