राजकारणाची रणभूमी झालेल्या पश्चिम बंगालमध्ये चौथ्या टप्प्यातील मतदानाला सुरूवात झाली आहे. चौथ्या टप्प्यात ४४ जागांसाठी मतदान होत असून, सकाळी ७ वाजल्यापासून मतदान सुरू झालं आहे. ४४ जागांसाठी तब्बल ३७३ उमेदवार रिंगणात असून, १ कोटी १५ लाख ८१ हजार २२ मतदार मतदानाचा अधिकार बजावणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मतदारांना मोठ्या संख्येनं मतदान करण्याचं आवाहन केलं आहे.
देशाच्या राजकारणात चर्चेचा विषय ठरत असलेल्या पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यातील मतदान सुरूवात झाली आहे. सकाळी सात वाजल्यापासून मतदारांनी मतदान केंद्राबाहेर रांगा लावल्या आहेत. ४४ जागांसाठी मतदान होत असून, भाजपाचे केंद्रीय मंत्री बाबूल सुप्रिओ, पश्चिम बंगालचे मंत्री पार्था चॅटर्जी, अरुप बिस्वास आणि माजी क्रिकेटपटू मनोज तिवारी यांच्यासह ३७३ उमेदवारांचं भवितव्य आज मतदान यंत्रात बंद होणार आहे.
पश्चिम बंगालमध्ये चौथ्या टप्प्यामध्ये मॅक्लिगंज, माथाभांगा, कूच बिहार (उत्तर), कूच बिहार (दक्षिण), सीतलकुची, सीताई अप्रिल, दिनहाटा अप्रिल, नटबरी, तुफानगंज, कुमारग्राम, कालचिनी, अलीपुरद्वार, फलकटा, मदारीहाट, सोनारपूर दक्षिण, भांगर, कस्बा, जाधवपूर, सोनारपूर उत्तर टॉलीगंज, बेहाला पुरबा, बेहला पश्चिम, महेशताला, बज बज, मटियाबुर्ज, १६९ बॅली, हावडा उत्तर, हावडा मध्य, शिबपूर, हावडा दक्षिण, संकरील, पंचला, उलूबेरिया पुरबा, दोम्जुर, उत्तरपारा अप्रिल, श्रीरामपूर, चांपदानी, सिंगूर, चंदननगर, चुंचुरा, बालागढ, पंडुआ, सप्तग्राम आणि चंदीताला या मतदारसंघांचाही समावेश आहे.