पूरग्रस्तांना मदत मिळावी म्हणून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी आजपासून पंचगंगा परिक्रमा सुरू केली आहे. कोल्हापूरच्या प्रयाग चिखली ते नरसिंह वाडीपर्यंत ही पंचगंगा परिक्रमा निघणार आहे. तब्बल पाच दिवस चालणाऱ्या या परिक्रमेत हजारो शेतकरी आणि स्थानिक नागरिक एकवटले आहेत. शेतकरी आणि पूरग्रस्तांच्या मागण्या मान्य न केल्यास येत्या 5 सप्टेंबर रोजी पूरग्रस्तांसह जलसमाधी घेऊ, असा इशारा राजू शेट्टी यांनी दिला आहे.
राजू शेट्टी यांनी पूरग्रस्तांच्या मागण्यांसाठी 23 ऑगस्ट रोजी मोर्चा काढला होता. या मोर्चामध्येच त्यांनी पंचगंगा परिक्रमेचा इशारा दिला होता. पण सरकारने या मोर्चाची दखल घेतली नाही. त्यामुळे त्यांनी आज पंचगंगा परिक्रमा सुरू केली आहे. आज सकाळी प्रयाग चिखलीपासून ही पंचगंगा परिक्रमा सुरू झाली. त्यांनी प्रयाग संगमावरील दत्ता मंदिरात आल्यावर अभिषेक केला. त्यानंतर यात्रेला सुरुवात झाली. पाच दिवस चालणाऱ्या या परिक्रमेचा नरसोबाच्या वाडीत समारोप होणार आहे. त्यानंतर 5 सप्टेंबर रोजी राजू शेट्टी पूरग्रस्तांसह जलसमाधीही घेणार आहे.
पुरामुळे सांगली आणि कोल्हापुराचं मोठं नुकसान झालं आहे. शेतकऱ्यांची संपूर्ण शेती वाहून गेली. स्थानिकांची घरं पाण्यात बुडाली. अनेकांचे संसार मातीमोल झाले. मात्र, सरकारकडून या पूरग्रस्तांना अद्यापही मदत मिळालेली नाही. त्यामुळे या सर्वांना सरकारने तातडीने आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी शेट्टी यांनी केली आहे. तसेच 2019च्या जीआरप्रमाणे पूरग्रस्तांना मदत देण्यात यावी, अशी मागणीही त्यांनी केली आहे. कुणाला वेठीस धरण्याचा आमचा हेतू नाही, असंही त्यांनी सांगितलं.
यापूर्वी राजू शेट्टी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्यावर टीका केली होती. कृष्णा, पंचगंगा नदीतील महापुराचं पाणी बोगद्यातून दुष्काळी भागाकडे वळवण्याच्या घोषणा ही निव्वळ धूळफेक आहे. अशा मोठ्या योजना आणून पैसे खाण्याचा हा उद्योग आहे. जयंत पाटील यांची ही योजना कधीच पूर्ण होणार नाही, अशी टीका शेट्टी यांनी केली होती. पूरग्रस्तांना पॅकेज देण्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली. पण अजून कसलीही मदत मिळाली नाही. मदत मिळण्यासाठी मी ठाकरे यांच्याकडे गेलो होतो पण भेट दिली गेली नाही. अजूनही मदत मिळाली नाही. पूरानं शेतकरी कर्जबाजारी झाला आहे. शाळा, कॉलेज सुरु झाले असल्यानं फी कशी भरायची? असा सवाल यावेळी शेट्टींनी विचारला होता. शेतकऱ्यांना 2019 साली आलेल्या महापुराप्रमाणे मदत मिळायला हवी, अशी मागणीही त्यांनी केली होती.