‘एक टक्क्याने मागे पडलो, पण…’, हिमाचलच्या पराभवावर मोदींची फर्स्ट रिएक्शन

गुजरात विधानसभा निवडणुकीत भाजपच्या विजयानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्लीतील भाजप कार्यालयात कार्यकर्त्यांना संबोधित केलं. ‘मी जनतेसमोर नतमस्तक आहे. गुजरातच्या जनतेचे आभार. हिमाचलच्या जनतेचेही मी खूप आभार मानतो. भाजप कार्यकर्त्यांनी जे परिश्रम केले आहेत, त्याचा सुगंध आता चारही बाजूंना दरवळत आहे. उत्तर प्रदेशच्या रामपूरमध्येही भाजपचा विजय झाला आहे. बिहारच्या पोटनिवडणुकीतली कामगिरी येणाऱ्या दिवसांचे संकेत देते,’ असं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.

‘हिमाचल प्रदेशमध्ये आम्ही 1 टक्क्यांनी पिछाडीवर राहिलो, तरी विकासासाठी आम्ही 100 टक्के पुढे राहू, हे आश्वासन मी देतो. हिमाचलसाठी काहीच कमी पडू देणार नाही. भाजपचं वाढतं जनसमर्थन म्हणजे नागरिकांचा परिवारवाद आणि भ्रष्टाचाराविरुद्धचा आक्रोश वाढला आहे,’ अशी प्रतिक्रिया पंतप्रधानांनी दिली.

‘गुजरातने यावेळी तर कमालच केली. जिकडे भाजपचा विजय झाला नाही, तिथला व्होट शेअर भाजपप्रती असलेला स्नेह दाखवतो. मी गुजरात, हिमाचल आणि दिल्लीच्या जनतेचे आभार मानतो. गुजरातच्या लोकांनी रेकॉर्डचं रेकॉर्ड मोडलं आहे. सगळ्यात मोठा जनादेश देऊन गुजरातच्या लोकांनी इतिहास घडवला आहे,’ असं वक्तव्य पंतप्रधानांनी केलं.

‘भाजप आपल्या कार्यकर्त्यांच्या शक्तीवर विश्वास ठेवते, याच्याच बळावर पक्ष आपली रणनीती ठरवतो आणि यात यशस्वी होतो. युवा वर्ग तेव्हाच मत देतो जेव्हा त्याला विश्वास असतो आणि सरकारचं काम सगळ्यांना दिसतं. तरुणांनी भाजपला मोठ्या प्रमाणावर मत दिलं आहे, याचा अर्थ त्यांनी आमचं काम बघितलं आणि त्यावर विश्वास दाखवला,’ असं पंतप्रधान म्हणाले.

‘जनतेने भाजपला मत दिलं, कारण भाजपने प्रत्येक सुविधा गरीब आणि मध्यमवर्गीयापर्यंत लवकरात लवकर पोहोचवू इच्छिते. लोकांनी भाजपला मत दिलं कारण भाजपमध्ये देशाच्या हितासाठी मोठे आणि कठोर निर्णय घेण्याची क्षमता आहे,’ असं पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सांगितलं.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

scroll to top
error: आपल्याला माहिती कॉपी करण्याची परवानगी नाही.