एमपीमध्ये राष्ट्रीय प्राणी धोक्यात? जंगलात लटकलेल्या अवस्थेत वाघ आढळल्याने खळबळ
देशात वाघांच्या मृत्यूचे सत्र थांबत नसल्याचं चित्र आहे. काही दिवसांपूर्वी ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पात वाघाचे पाच बछडे मृतावस्थेत आढळले होते. त्यानंतर मध्य प्रदेशातही पन्ना व्याघ्र प्रकल्पात एका वाघाचा मृतदेह लटकलेल्या अवस्थेत आढळून आला. क्लच वायरच्या साह्याने वाघाचा मृतदेह लटकवल्याचं दिसून आलं आहे. व्याघ्र प्रकल्पातल्या कर्मचाऱ्यांनी अधिकाऱ्यांना याबद्दल माहिती दिली. त्यानंतर अधिकारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले. या प्रकरणाचा पुढचा तपास सुरू करण्यात आला आहे.
दिवसेंदिवस वाघांची संख्या कमी होत आहे. भारतात वाघ मृतावस्थेत आढळण्याचे प्रकार वाढले आहेत. चार ते पाच दिवसांपूर्वी वेगवेगळ्या घटनांमध्ये ताडोबा व्याघ्र प्रकल्पाच्या शिवनी बफर क्षेत्रात वाघाचे पाच बछडे मृतावस्थेत आढळले होते. त्यानंतर मध्य प्रदेशातल्या पन्ना व्याघ्र प्रकल्पामध्ये वाघाचा मृतदेह आढळल्याने एकच खळबळ उडाली. या घटनेचा पंचनामा केल्यानंतर वाघाचा मृतदेह पोस्टमॉर्टेमसाठी पाठवण्यात येणार आहे. पन्ना व्याघ्र प्रकल्पात वन विभागाचं पथक गस्त घालत असताना उत्तर भागातल्या वनमंडळाअंतर्गत येणाऱ्या विक्रमपूर बीटजवळ या वाघाचा मृतदेह लटकलेल्या अवस्थेत सापडला.
‘आप’ने MCD मधील भाजपची सत्ता संपवली; सोशल मीडियावर मीम्सचा महापूर
दिल्ली एमसीडीमध्ये आम आदमी पक्षाने इतिहास रचत सत्ता मिळवली आहे. दिल्ली महानगरपालिकेच्या आतापर्यंतच्या निकालांमध्ये आम आदमी पक्षाने बहुमताचा जादुई आकडा पार केला आहे. दिल्ली एमसीडी निवडणुकीत बहुमत मिळवून आम आदमी पक्षाने भारतीय जनता पक्षाची 15 वर्षांची सत्ता संपवली आहे. एमसीडी निवडणुकीच्या निकालांची सोशल मीडियावरही जोरदार चर्चा होत आहे. सोशल मीडियावर वेगवेगळ्या प्रकारचे मीम्स शेअर केले जात आहेत. वेगवेगळे सोशल मीडिया यूजर्स आपापल्या पद्धतीने मीम्सच्या माध्यमातून ट्विटरवर मजा घेत आहेत.
वास्तविक, एमसीडी निवडणुकीच्या आतापर्यंतच्या निकालांमध्ये आम आदमी पक्षाने 134 जागा जिंकल्या आहेत, तर भाजपने 104 जागा जिंकल्या आहेत. काँग्रेसच्या खात्यात 9 जागा आल्या आहेत. दुसरीकडे अपक्ष उमेदवारांनी 3 जागा काबीज केल्या आहेत. बहुमतासाठी कोणत्याही पक्षाला MCD च्या 250 पैकी 126 वॉर्ड जिंकणे आवश्यक होते. आम आदमी पक्षाने हा आकडा पार केला आहे.
पालकांनो तुमच्या मुलांना गोवरपासून वाचवा
कोरोनानंतर राज्यात गोवरचं थैमान आहे. राज्यातील गोवरचं वाढतं प्रमाण पाहता राज्य सरकारने गोवरला नियंत्रणात आणण्यासाठी हालचाली सुरू केल्या आहेतच. गोवर संसर्गावर नियंत्रण आणण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या राज्य कृती दलाने तातडीने काही पावलं उचलली आहेत. त्यातील पहिलं म्हणजे लसीकरण. लसीकरणावर लक्ष केंद्रीत करण्यात आलं आहे. राज्यातील गोवरला आवर घालण्यासाठी विशेष लसीकरण मोहीम राबवली जाणार आहे.
मुंबईनंतर ठाणे, नाशिक आणि राज्यात अनेक ठिकाणी गोवरचे रुग्ण आढळून येत आहेत. त्यामुळे बालकांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने आता बालकांसाठी गोवर लसीकरण मोहीम राबवण्याचा निर्णय घेतला आहे. राज्यातील सर्व बालकांचे 26 जानेवारीपर्यंत लसीकरण करण्याचा निर्धार राज्य कृती दलाने केला आहे. त्यानुसार कृती दलाने आराखडा तयार केला आहे. कृती दलाने केलेल्या शिफारशीनुसार राज्यात गोवर-रुबेलासाठी विशेष लसीकरण अभियान राबवण्याचे निर्देश आरोग्यमंत्र्यांनी दिले आहेत. ज्या मुलांनी लशीची एकही मात्रा घेतलेली नाही, त्यांना सर्वात आधी लस दिली जाणार आहे. 9 महिने ते 5 वर्षे या वयोगटातील सर्व बालकांचे लसीकरण केलं जाणार आहे.
‘मंत्री महोदय ही उघड धमकी समजायची का?’, शंभुराज देसाईंच्या इशाऱ्यावर भडकले संजय राऊत
महाराष्ट्र-कर्नाटक सीमा प्रश्नावरून संजय राऊत यांनी राज्य सरकारवर घणाघाती टीका केली. सरकार षंढ आणि नामर्द असल्याचं संजय राऊत म्हणाले. संजय राऊत यांच्या या वक्तव्यावर शिंदे सरकारमधले मंत्री शंभुराज देसाई चांगलेच आक्रमक झाले. ‘संजय राऊत आपलं तोंड आवरा. साडेतीन महिने आराम करून आलात, परत अशी वेळ येऊ देऊ नका,’ असा इशारा शंभुराज देसाई यांनी दिला.
शंभुराज देसाई यांच्या या इशाऱ्यावर आता संजय राऊत यांनी पुन्हा पलटवार केला आहे. ‘मंत्री महोदय ही सरळ सरळ धमकी समजायची काय? महाराष्ट्राची बाजू लढणारे या सरकारचे शत्रू आहेत.सरकार अस्मितेच्या प्रश्नावर गप्प आहे. म्हणून जनता गप्प बसणार नाही.कायदा आणि न्यायालये दबावाखाली आहेत. हे पुन्हा सिद्ध झाले. सत्य बोलणारे तुरुंगात जातील..हाच अर्थ,’ असं ट्वीट संजय राऊत यांनी केलं आहे.
धनभाऊंचा पुन्हा एकदा पंकजा ताईंना धक्का, होमग्राऊंडवरच दिला धोबीपछाड
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांनी पुन्हा एकदा पंकजा मुंडे यांना धक्का दिला आहे. गोपीनाथ गड येथे असलेली पांगरी ग्रामपंचायत धनंजय मुंडे यांच्या ताब्यात आली आहे. 11 सदस्यांपैकी 10 सदस्य आणि सरपंचाची बिनविरोध निवड झाली आहे. धनंजय मुंडे यांनी बिनविरोध ग्रामपंचायत काढत पांगरी ग्रामपंचायतीवर राष्ट्रवादी काँग्रेसचा झेंडा लावला आहे.
सुशील वाल्मीक कराड हे सरपंच म्हणून बिनविरोध निवडून आले आहेत. विशेष म्हणजे वैद्यनाथ सहकारी साखर कारखाना आणि स्वर्गीय लोकनेते गोपीनाथ मुंडे यांचं स्मृतीस्थळ गोपीनाथ गड पांगरी ग्रामपंचायत अंतर्गत येतं, त्यामुळे पुन्हा एकदा धनंजय मुंडे यांनी पंकजा मुंडे यांना धोबीपछाड दिली आहे.
“दीपाली सय्यद यांनी चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून बोगस लग्न लावली”, माजी स्वीय्य साहाय्यकाचे गंभीर आरोप
शिंदे गटात जाण्यासाठी अद्यापही वेटींगवर असणाऱ्या अभिनेत्री दीपाली सय्यद यांच्यावर गंभीर आरोप करण्यात आले आहेत. दीपाली सय्यद यांनी आपल्या चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमाधून बोगस लग्न लावली आहेत. दीपाली सय्यद यांचे माजी स्वीय्य साहाय्यक यांनी हा आरोप केला आहे.
भाऊसाहेब शिंदे असे माजी स्वीय्य साहाय्यकाचे नाव आहे. भाऊसाहेब शिंदे यांनी ‘एबीपी माझा’शी बोलताना सांगितलं की, “दीपाली भोसले चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून सय्यद यांनी हजारो कोटी रुपयांचं वाटप केलं. पण, ऑडिट रिपोर्ट मिळाल्यावर चॅरिटेबल ट्रस्टच्या अकाउंटमध्ये फक्त ९ हजार १८२ रुपये आढळून आले. मग बाकीची रक्कम दीपाली सय्यद यांनी कोठून दिली आणि कोठून आणली, याची आर्थिक गुन्हे शाखेने चौकशी करावी. चौकशी झाली नाहीतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सागर निवासस्थानासमोर आत्मदहन करणार,” असा इशारा शिंदेंनी दिला.
गुजरात भाजपा राखेल, काँग्रेसचे प्रयत्न कमी पडले; संजय राऊतांचं मत
गुजरात आणि हिमाचल प्रदेश विधानसभेसाठी निवडणुका पार पडल्या आहेत. उद्या म्हणजेच ८ दिसेंबर रोजी निकाल जाहीर होणार आहेत. तत्पूर्वी गुजरातमध्ये पुन्हा भाजपा सत्तेत येईल, असं मत खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केलं आहे. तसेच गुजरातमध्ये काँग्रेसची मेहनत आणि यंत्रणा दोन्ही कमी पडले, असंही ते म्हणाले. टीव्ही ९ वृत्तवाहिनीशी बोलताना त्यांनी यांसदर्भात प्रतिक्रिया दिली.
कर्जे महागणार! रिझर्व्ह बँकेने ३५ पॉइंटने रेपो रेट वाढवला!
गेल्या ८ महिन्यांत पाचव्यांदा रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं रेपो रेटमध्ये वाढ केली आहे. शुक्रवारी रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी रेपो रेटमध्ये ३५ पॉइंटची वाढ करण्यात आल्याची घोषणा केली. त्यामुळे आता एकूण रेपो रेट ५.९ टक्क्यांवरून थेट ६.२५ टक्क्यांवर गेला आहे. गेल्या आठ महिन्यांत तब्बल २२५ टक्क्यांनी रेपो रेटमध्ये वाढ झाली आहे. या पार्श्वभूमीवर आता त्याचा अप्रत्यक्ष परिणाम गृहकर्ज आणि बँकांकडून इतर गोष्टींसाठी दिल्या जाणाऱ्या कर्जांवरही होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. आरबीआयकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, या निर्णयाला रिझर्व्ह बँकेच्या संबंधित बोर्डाच्या सहापैकी पाच सदस्यांनी पाठिंबा दर्शवला आहे.
SD Social Media
9850 60 3590