आज दि.१५ आॕगस्ट च्या दिवसभरातील ठळक घडामोडी अशा….

‘त्यांचा चेहरा खूप पांढरा पडला होता’, मेटेंच्या डॉक्टर पत्नीचा मृत्यूवर संशय

शिवसंग्राम संघटनेचे नेते विनायक मेटे यांचं काल पहाटे पुणे-मुंबई एक्सप्रेस हायवेवर अपघाती निधन झालं. विनायक मेटे यांच्या अपघाती मृत्यूवर त्यांची पत्नी डॉक्टर ज्योती मेटे यांनी संशय व्यक्त केला आहे. मेडिकल टर्मोनॉलॉजीनुसार मृत्यूनंतर एवढ्या लगेच चेहरा पांढरा पडत नाही, काही काळानंतर चेहरा पांढरा पडायला सुरूवात होते, पण साहेबांचा चेहर अतोनात पांढरा पडला होता, असं ज्योती मेटे म्हणाल्या.’अपघाताबाबतची माहिती मिळाल्यानंतर मी धावत सुटले. मदतीसाठी मी विश्वास नांगरे पाटील यांना फोन केला. माझा भाऊ पोलिसात उच्चपदावरचा अधिकारी आहे, मी त्यालाही फोन करण्याचा प्रयत्न केला, पण दोघांनीही फोन उचलला नाही,’ अशी प्रतिक्रिया विनायक मेटेंच्या पत्नीने दिली.

भारत 2047 साली कसा असावा? PM मोदींनी लाल किल्ल्यावरून माडलं India@100 चं व्हिजन

विकसित भारताच्या दिशेने 5 प्रतिज्ञांसोबत महिलांच्या सन्मानासाठी स्पष्ट आवाहन, भ्रष्टाचार आणि घराणेशाही नाकारणे आणि आत्मनिर्भर भारतावर लक्ष केंद्रित करून पुढील 25 वर्षांचा रोडमॅप तयार करणे, हे लाल किल्ल्याच्या तटबंदीवरून मोदींच्या सुमारे 83 मिनिटांच्या भाषणाचा महत्त्वपूर्ण निष्कर्ष आहे. या स्वातंत्र्यदिनी कोणतीही नवीन सरकारी योजना किंवा प्रकल्प जाहीर करण्यात आलेला नाही. PM मोदींनी ‘India@100’ डोळ्यासमोर ठेवून पुढील 25 वर्षांचा दूरदर्शी अजेंडा तयार करण्यावर भर दिला. पीएम मोदी म्हणाले, “या ‘अमृत काल’मध्ये आपल्याला एकत्र येऊन ‘विकसित भारत’च्या मोठ्या ध्येयासाठी काम करायचे आहे.”

पंतप्रधान मोदींनी आपल्या भाषणात ‘नारी शक्ती’चा उल्लेख महत्त्वाच्या पद्धतीने केला. गेल्या 8 वर्षात महिला मतदारांवर भाजपचे स्पष्ट लक्ष आणि मोदी सरकारच्या अनेक योजनांवर लक्ष केंद्रित केल्यामुळे, पंतप्रधान मोदी म्हणाले की देशातील महिलांबद्दलच्या अनादरामुळे मला खूप दुःख झाले आहे. ते म्हणाले की, स्त्री-पुरुष समानता अत्यंत महत्त्वाची आहे. पीएम म्हणाले, ‘संभाषण आणि आचरणात आपण महिलांच्या प्रतिष्ठेला धक्का पोहोचेल असे काहीही करू नये.’

श्वास कुठून घ्यायचा हेपण तुम्हीच ठरवणार? वंदे मातरमच्या निर्णयावरुन वादंग

राज्यात शासकीय कार्यालयात आता ‘हॅलो’ ऐवजी ‘वंदे मातरम्’ने संभाषणाला सुरुवात होणार आहे. काल शनिवारी सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी याबाबतची घोषणा केली आहे. हे वर्ष भारतीय स्वातंत्र्याचं अमृत महोत्सवी वर्ष आहे. देशाला स्वातंत्र्य मिळून 75 वर्ष पूर्ण होत असल्याचं औचित्य साधत मुनगंटीवार यांनी याबाबतचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे यापुढे राज्यातील सरकारी कर्मचारी फोनवर संभाषण करतानाची सुरुवात ‘हॅलो’ने नाही तर ‘वंदे मातरम्’ने करतील. यावरुन माजी मंत्री तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी मुनगंटीवारांवर निशाणा साधला आहे.

म्यानमार: नोबेल पारितोषिक विजेत्या आँग सान स्यू की यांना आणखी 6 वर्षांचा तुरुंगवास

लष्करशासित म्यानमारमधील न्यायालयाने सोमवारी देशाच्या पदच्युत नेत्या आंग सान स्यू की यांना भ्रष्टाचाराच्या आणखी चार प्रकरणांमध्ये दोषी ठरवले आणि त्यांना अतिरिक्त सहा वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे. एका कायदा अधिकाऱ्याने ही माहिती दिली. सुनावणी इन-कॅमेरा झाली आणि सू कीच्या वकिलांना कार्यवाहीबद्दल माहिती उघड करण्यापासून रोखण्यात आले. त्याच्याशी संबंधित चार अतिरिक्त खटल्यांचा निकाल सोमवारी न्यायालयाने दिला.बाजार मूल्यापेक्षा कमी भाड्याने सार्वजनिक जमीन देण्यासाठी आणि धर्मादाय हेतूंसाठी देणग्या घेऊन घर बांधण्यासाठी सू की यांच्यावर त्यांच्या पदाचा गैरवापर केल्याचा आरोप होता. त्यांना चार प्रकरणांमध्ये प्रत्येकी तीन वर्षांची शिक्षा झाली होती. मात्र, यापैकी तीन प्रकरणांमध्ये ही शिक्षा एकाच वेळी चालेल. अशाप्रकारे त्यांना आणखी सहा वर्षे तुरुंगात राहावे लागणार आहे.

मंत्रिमंडळ विस्ताराआधी काँग्रेसमध्ये राडा, नेत्यांनी प्रभाऱ्यांनाच दिल्या शिव्या

बिहारमध्ये नितीश कुमार यांच्या नेतृत्वातल्या महागठबंधनच्या नव्या सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार मंगळवारी होणार आहे. मंगळवारी संध्याकाळी राज्यपाल फागू चौहान आमदारांना मंत्रीपदाची शपथ देतील. मंत्रिमंडळात काँग्रेसला तीन खाती द्यायला नितीश कुमार आणि तेजस्वी यादव तयार आहेत, पण स्वातंत्र्यदिनी काँग्रेस मुख्यालय सदाकत आश्रममध्ये राडा झाला. काँग्रेसला जास्त मंत्रिपदं मिळावीत म्हणून कार्यकर्ते आणि बिहार काँग्रेस प्रभारी भक्त चरण दास यांच्यात बाचाबाची झाली.काँग्रेस नेते आणि कार्यकर्त्यांनी भक्त चरण दास यांना शिव्याही दिल्या. काँग्रेस नेते आणि कार्यकर्ते पक्षाला फक्त तीन मंत्रीपदं मिळणार असल्यामुळे नाराज झाले आहेत. 

जयंत पाटलांच्या हाती ‘लाल परी’चं स्टेअरीगं, इस्लामपुरात चालवली ‘विठाई’

काही महिन्यांपूर्वी राज्याची सत्ता चालवणारी महाविकासआघाडी सध्या विरोधकांच्या भूमिकेत आहेत. सध्या सत्ता चालवत नसले तरी एसटी चालवण्याचा अनुभव मात्र माजी मंत्र्यांनी घेतला आहे. माजी मंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी थेट एसटीच्या स्टेअरींगवर बसत वाहन चालवण्याचा अनुभव घेतला. देशाच्या अमृत महोत्सवी स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर जयंत पाटील यांनी इस्लामपूर आगारामध्ये जाऊन एसटी कर्मचाऱ्यांशी संवाद साधला. त्यानंतर थेट एसटीचं स्टेअरिंग हातात घेऊन फेरफटका देखील मारला. याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

स्मशानभूमीत रात्रीस खेळ चाले, संपूर्ण परिसरात लिंबू-हळदीचा सडा, बुलडाण्यातील भयंकर घटना

देशभरात स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा केला जात आहे. पण दुसरीकडे बुलडाण्यामध्ये एक अघोरी कृत्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. खामगाव तालुक्यामध्ये अज्ञात व्यक्तीने कुंकू, लिंबू आणि हळदीने पूर्ण स्मशानभूमीत पुजली असल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. या घटनेमुळे गावात भीतीचे वातावरण पसरले आहे.बुलडाणा जिल्ह्यातील खामगाव तालुक्यात येणाऱ्या पारखेड गावातील हिंदू स्मशानभूमीत हा अघोरी प्रकार समोर आला आहे.  कुणीतरी अज्ञात व्यक्तीने कुंकू, लिंबू आणि हळदीने पूर्ण स्मशानभूमीत पुजली असल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. मात्र कुणी आणि का ? असा प्रकार केला याबाबत कुठलीच माहिती अद्याप समोर आली नसली तरी या घटनेने गावकरी चांगलेच धास्तावले आहे.

‘नेताजींच्या अस्थी मातृभूमीत परत आणा’; सुभाषचंद्र बोस यांच्या मुलीची भारत सरकारला विनंती

आज भारताचा ७५ वा स्वातंत्र्य दिवस साजरा करण्यात येत आहे. भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यात नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे मोठे योगदान होते. आजच्या दिवशी संपूर्ण देश नेताजींचे स्मरण करत आहे. दरम्यान, जर्मनीत राहणाऱ्या नेताजी यांची मुलगी अनिता बोस फाफ यांनी नेताजींच्या अस्थी भारतात आणण्याची विनंती त्यांनी भारत सरकारकडे केली आहे.अनिता बोस यांच्या म्हणण्यानुसार, नेताजींचा मृत्यू १८ ऑगस्ट १९४५ रोजी तैवानमध्ये विमान अपघातात झाला आणि त्यांचे अवशेष सप्टेंबर १९४५ पासून टोकियोच्या रेन्कोजी मंदिरात जतन करण्यात आले आहेत. “नेताजींच्या निधनाच्या ७३ व्या वर्धापनदिनानिमित्त त्यांनी भारत सरकारसोबत जपान सरकारलाही नेताजींच्या अस्थी भारतात पाठवण्याची मागणी केली आहे.

रविंद्र जडेजाचा चेन्नई सुपर किंग्जला सोडचिठ्ठी देण्याचा निर्णय नक्की!

चेन्नई सुपर किंग्ज (सीएसके) हा इंडियन प्रीमियर लीगमधील (आयपीएल) सर्वात लोकप्रिय संघापैकी एक आहे. चेन्नईच्या संघामध्ये महेंद्रसिंह धोनी आणि रविंद्र जडेजासारखे प्रसिद्ध खेळाडू आहेत. मात्र, आता रविंद्र जडेजा लवकरच संघातून बाहेर पडणार असल्याचे म्हटले जात आहे. माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, आयपीएलच्या १५व्या हंगामापासून रविंद्र जडेजा आणि सीएसके संघ व्यवस्थापन एकमेकांच्या संपर्कात नाही.

SD Social Media

9850 60 3590

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

scroll to top
error: आपल्याला माहिती कॉपी करण्याची परवानगी नाही.