राज्यात सध्या सर्वत्र कोरोनाचा प्रादुर्भाव पाहायला मिळत आहे. यामुळे अनेकांचे जीव गेले आहेत. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत 20 वर्षांपासून वृद्धांपर्यंत सर्वांना याचा त्रास होत आहे. यामुळे अनेकांच्या मनात कोरोनाची भीती बसली आहे. पण ही भीती तुम्हाला कोरोनावर मात करु देणार आहे. त्यामुळे जर तुम्ही कोरोनाला घाबरलात. तर तुमच्यावर कोणत्याही उपचारांचा परिणाम होणार नाही. त्यामुळे तुम्ही कोरोनाला घाबरु नका. त्याच्याशी दोन हात करा. तुम्ही नक्की त्यातून बरे व्हाल, असा संदेश सुशीला पाठक या 102 वर्षांच्या आजींनी दिला आहे.
सुशीला पाठक या मुंबईतील अंधेरी येथे राहतात. त्यांना काही दिवसांपूर्वी कोरोनाची लागण झाली होती. वयाची शंभरी ओलांडल्याने त्या कोरोना उपचाराला प्रतिसाद देतील का? असा अनेकांना प्रश्न पडला होता.आजींचे नेमके पुढे काय होणार असा प्रश्न अनेकांना पडला होता. त्या ठाण्यातील होरायझन प्राईम या रुग्णालयात उपचार घेत होते.
आजींचे दोन्ही नातू डॉक्टर सुजित बोपर्डेकर आणि डॉक्टर अभिजीत बोपर्डेकर यांना आजीची इच्छाशक्ती माहिती होती. त्या आजी कोरोनावर सहज मात करतील, हे दोघांच्याही लक्षात आले होते. त्यानंतर त्यांनी आजींवर उपचार करण्यास सुरुवात केली. जवळपास 15 दिवसांच्या अथक प्रयत्नानंतर त्या आजींनी कोरोनावर मात केली.
विशेष म्हणजे डॉक्टरांनी त्या आजींना सांगितल्याप्रमाणे सर्व गोष्टी केल्या. तसेच आपल्याला कोरोना झाला म्हणजे काही तरी भयंकर झालंय असा निगेटिव्ह विचार त्यांनी कधीच केला नाही. अगदी सकारात्मकतेने त्या कोरोनाशी लढा देत होत्या आणि पंधरा दिवसांनी त्या कोरोनावर मात घरी सुखरुप परतल्या. यानंतर त्यांच्या कुटुंबांनी डॉक्टरांचे आभार मानले. आजींची इच्छाशक्ती आणि सकारात्मक दृष्टीकोन यामुळे त्यांच्यावर सर्व उपचार लागू पडले. आजींनी एक प्रकारे आम्हाला देखील सकारात्मकतेचा धडा दिला आहे, असे मत डॉक्टरांनी व्यक्त केले. तसेच त्यांना डिस्चार्ज देताना त्यांनी केक कापून अभिनंदन केले.