भारतात आणखीनही कोरोनाचा प्रकोप सुरुच आहे. दररोज लाखो रुग्णांना कोरोनाची बाधा होत आहे, हजारो जणांना कोरोनाने मृत्यूला कवटाळावं लागत आहे. अशा परिस्थितीत प्रत्येक जण आपापल्या परीने मदत देतोय. आतापर्यंत अनेक भारतीय खेळाडूंनी तसंच विदेशी खेळाडूंनीही या संकटसमयी मोलाची मदत केली आहे. दिल्लीचा आक्रमक बॅट्समन जो आयपीएलमध्ये सध्या खोऱ्याने धावा करतोय त्या शिखर धवनने मनाचा मोठेपणा दाखवत सध्या 20 लाखांच्या मदतीची घोषणा केली आहे, तर आयपीएल 2021 मध्ये येणारी प्रत्येक बक्षिसरुपी रक्कम कोरोना रुग्णांसाठी देणार असल्याचं त्याने सांगितलं आहे.
कोरोना संक्रमणाच्या पार्श्वभूमीवर, भारतात आयपीएलच्या आयोजनावरुन बीसीसीआय आणि क्रिकेटपटूंवर सध्या टीका होतीय. अशातच गेल्या काही दिवसांत, क्रिकेटपटूंनी मदतीसाठी पुढाकार घेतला आहे. कोलकात्याकडून खेळणार्या पॅट कमिन्सने 37 लाखांची देणगी देऊन मदतीचा श्रीगणेशा केला. त्यानंतर रोहित शर्मा, सचिन तेंडुलकर, ब्रेट ली, जयदेव उनाडकर, निकोलस पूरन यांनीही भरघोस मदतीची घोषणा केली.
दिल्ली कॅपिटल्सचा दिग्गज सलामीवीर शिखर धवन याने कोरोना संकटाच्या काळात महत्त्वपूर्ण योगदान दिलंय. धवनने रूग्णालयात ऑक्सिजन सिलेंडर्स आणि कन्सट्रेटर खरेदी करण्यासाठी एका स्वयंसेवी संस्थेला (ऑक्सिजन इंडिया) २० लाख रुपये दिले आहेत. याचवेळी धवनने आयपीएल 2021 मध्ये येणारी प्रत्येक बक्षिसरुपी रक्कम कोरोना रुग्णांसाठी देणार असल्याचं जाहीर केलंय.
आयपीएलमध्ये राजस्थान रॉयल्स संघाकडून खेळणाऱ्या जलदगती गोलंदाज जयदेव उनादकटने इंडियन प्रीमियर लीगच्या (IPL) सॅलरीमधील 10 टक्के रक्कम देण्याचा निर्णय घेतला आहे. ट्विटरवर व्हिडीओ शेअर करत जयदेवने स्वतःच याबाबतची माहिती जाहीर केली आहे. व्हिडीओमध्ये त्यानं म्हटलं आहे की, “गेल्या काही आठवड्यांपासून मला तुमच्याबरोबर काहीतरी शेअर करण्याची इच्छा होत आहे. आपला देश प्रचंड मोठ्या संकटातून जात आहे आणि मला माहित आहे की, या परिस्थितीत आम्ही क्रिकेट कसे खेळत आहोत. मला माहित आहे की कोणाचंही वैयक्तिक नुकसान किती वेदनादायक असू शकतं. आपल्या जवळच्या मित्रांना अशा परिस्थितीशी लढताना पाहणं खूप हृदयद्रावक आहे. मी सध्या या दोन्ही प्रकारच्या स्थिती अनुभवतोय.