बॉलिवूड अभिनेता इरफान खान यांच्या निधनाला आज (29 एप्रिल) एक वर्ष पूर्ण होत आहे. आज इरफानची पुण्यतिथी आहे. इरफानने जरी या जगाचा निरोप घेतलेला असला, तरी आजही त्याच्या आठवणी फक्त त्यांच्या कुटुंबातच नाही, तर चाहत्यांच्या हृदयात जिवंत आहेत. इरफान त्या लोकांपैकी एक आहेत, जे कधीचे कशाचा दिखावा करत नव्हते. इरफानच्या मृत्यूसमयी देश कोरोना विषाणूच्या महामारीशी संघर्ष करत होता. आजारी असूनही इरफानने त्यावेळी कोरोनाग्रस्त झालेल्या लोकांची मदत केली होती. इरफानच्या जाण्यानंतर त्याचा मित्र जियाउल्लाह यांनी याबद्दल सांगितले.
त्यांनी एका मुलाखतीत सांगितले होते की, गेल्यावर्षी ते कोरोना ग्रस्त लोकांच्या मदतीसाठी निधी गोळा करत होते आणि जेव्हा इरफानला हे कळले तेव्हा, ते स्वत: मदतीसाठी पुढे आले. तथापि, दरम्यान त्यांनी आपल्या मित्रासमोर एक अट ठेवली होती. इरफान म्हणाले की, याबद्दल कोणालाही काहीही सांगायचे नाही. इरफानचा असा विश्वास होता की, आपण डाव्या हाताने काही केले तर त्याची माहिती उजव्या हाताला देखील माहित होऊ नये. इरफानने स्वतः आजारी असताना देखील गरजू लोकांना मदत केली होती.
इरफानच्या मित्रानेही सांगितले होते की, आपण याबद्दल कोणालाही काही सांगितले नव्हते. परंतु, आता जेव्हा इरफान आपल्यातून निघून गेला, तेव्हा प्रत्येकाला त्याच्या उदात्त कृत्याबद्दल आणि उदात्त विचारांबद्दल माहित असले पाहिजे. इरफान इतका मोठा स्टार होता, परंतु याचा त्यांनी कधीही अभिमान मिरवला नाही, असे जियाउल्लाहने सांगितले. तो अगदी साधा माणूस होता आणि जेव्हा जेव्हा जयपूरला त्याच्या घरी जायचा तेव्हा तो सामान्य माणसाप्रमाणे सगळ्यांना भेटायचा. कोणालाही मदतीची आवश्यकता असल्यास तो नेहमी पुढे होता.
इरफानचा मुलगा बाबिल यांनी सांगितले की, इरफानला आधीच समजले होते की, आता ते हे जग सोडून जाणार आहेत. ते रुग्णालयात असताना मृत्यूच्या 2-3 दिवस आधी बाबिल इरफानला भेटायला गेला होता. बाबिल म्हणाला, ‘पप्पा माझ्याकडे पहात होते आणि हसत म्हणाले, आता मी मरणार आहे. मात्र, मी त्यांना सांगितले की, असे काहीही होणार नाही, परंतु ते पुन्हा हसले आणि झोपी गेले.’ त्याच्या 2-3 दिवसानंतर अभिनेत्याने या जगाचा निरोप घेतला.