येत्या 20 मार्च रोजी औरंगाबाद जिल्हा परिषदेची मुदत संपत आहे. सध्या तरी निवडणूक प्रक्रिया लांबणीवर पडली असली तरीही स्थानिक पातळीवर विविध ताकदवान पक्षांमध्ये मोठ्या प्रमाणावर इनकमिंग आणि आउटगोइंग सुरु आहे. विद्यमान सभागृह 2017 मध्ये अस्तित्वात आले. त्यावेळी काँग्रेसच्या पंजा निशाणावर जिंकून आलेल्या 16 सदस्यांपैकी 7 सदस्यांनी काँग्रेसचा हात सोडला. दोन दिवसांपूर्वी काँग्रेसच्या गटनेत्यांनीही मुंबईत जाऊन मंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवबंधन बांधले. हे पाहून आता इतर नेतेही डगमगण्याची चिन्ह आहेत. त्यामुळे जिल्हा परिषदेत काँग्रेसची ताकद कमकुवत होते की काय अशी चर्चा आहे.
सत्तारांनी पंजाची साथ सोडल्यापासून काँग्रेसची दैना
2017 मध्ये भाजपने सर्वाधिक 23 जागा जिंकत जिल्हा परिषदेची सत्ता काबीज करण्यासाठी दावा केला होता. मात्र तत्कालीन काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अब्दुल सत्तार यांनी शिवसेनेच्या मदतीने भाजपला खो दिला. अध्यक्षपद शिवसेनेकडे तर उपाध्यक्षपद आणि सभापती पद काँग्रेसकडे घेतले. अशा प्रकारे त्यांनी जिल्हा परिषदेत महाविकास आघाडीचा फॉर्म्युला यशस्वी केला होता. तसेच अडीच वर्षानंतर जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद काँग्रेसला मिळेल, असे आश्वासन दिलं होतं. मात्र ऐनवेळी सत्तारांनी काँग्रेसची साथ सोडली. त्यामुळे पुढील अडीच वर्षांचं अध्यक्षपद घेण्यासाठीही काँग्रेस नेत्यांना बरीच मशक्कत करावी लागली.
अब्दुल सत्तार यांच्या नेतृत्वात त्यांचे मित्र, काँग्रेसचे माजी गटनेते श्रीराम महाजन यांनी नुकताच मुंबईत समर्थकांसह शिवसेनेत प्रवेश केला. त्यांच्यासह किशोर बलांडे, केशवराव तायडे, सीमा गव्हाणे, मीना गायकवाड, गोपीचंद जाधव, धनराज बेडवाल या जिल्हा परिषद सदस्यांनीही शिवबंधन बांधले.
दरम्यान, जिल्हा परिषदेतील एवढे सदस्य एकाच वेळी शिवसेनेत गेल्याने काँग्रेसला काहीही फरक पडणार नाही, अशी प्रतिक्रिया काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष डॉ. कल्याण काळे यांनी दिली. जिल्ह्यातील मतदार हा काँग्रेसशी बांधलेला आहे. जिल्हा परिषदेच्या मागील निवडणुकीत निवडून आलेले जे सदस्य आहेत, ते बहुतांश सिल्लोड मतदार संघातील आहेत. सदस्य गेल्याने काँग्रेसची ताकद झाली नाही. उलट नव्या चेहऱ्यांना संधी मिळेल, अशी प्रतिक्रिया डॉ. कल्याण काळे यांनी दिली.