सिंहगडावर मधमाशांचा पर्यटकांवर भीषण हल्ला
पुण्यातील सिंहगड किल्ल्यावर फिरण्यासाठी आलेल्या पर्यटकांवर मधमाशांनी हल्ला केल्याची घटना समोर आली आहे. या हल्ल्यात 8ते 10 जण जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. मधमाशांच्या हल्ल्यात 2 जण बेशुद्ध झाल्याची माहिती समोर आली आहे.
आज रविवारचा दिवस असल्यामुळे सिंहगड परिसरात नेहमी गर्दी होत असते. त्यातच पावसाचे आगमन झाल्यामुळे पुणेकरांनी सिंहगडाकडे कूच केली. पण, आज दुपारी सिंहगडावर कल्याण दरवाजा परिसरात मधमाशांनी पर्यटकांवर हल्ला केला. अचानक झालेल्या या प्रकारामुळे परिसरात एकच धावपळ उडाली.
मुंडे समर्थक पुन्हा आक्रमक, प्रवीण दरेकरांचा दोन वेळा अडवला ताफा
विधान परिषदेच्या दहा जागांसाठी 20 जूनला निवडणूक होणार आहे. या निवडणुकीत भाजप नेत्या पंकजा मुंडे यांना उमेदवारी देण्यात येईल, अशी चर्चा होती. पण पंकजा यांना पक्षश्रेष्ठीकडून या निवडणूक संधी मिळाली नाही. त्यामुळे मुंडे समर्थक आक्रमक झाले आहेत. दोन दिवसांपूर्वी एका मुंडे समर्थकाने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. त्यानंतर आज काही मुंडे समर्थकांनी भाजप नेते आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांचा ताफा अडविण्याचा प्रयत्न केला. यावेळी मुंडे समर्थकांवर गाडी घालण्याचा प्रयत्न करण्यात आला.
शिवसेनेच्या आरोपानंतर आता राष्ट्रवादीने बोलावली बैठक
राज्यसभा निवडणुकीनंतर महाविकास आघाडीमध्ये बिघाडी झाल्याचे दिसून येत आहे. शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी राष्ट्रवादीवर गंभीर आरोप केले आहे. त्यामुळे आता राष्ट्रवादीने सुद्धा बैठक बोलावली आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांच्या अध्यक्षतेखाली बैठक होईल, असं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितलं आहे. या बैठकीत नेमकं काय चुकलं याची चर्चा केली जाईल, अशी माहिती अजित पवार यांनी दिली.
‘मला पुन्हा मंत्रीमंडळात घेण्याबाबत मुख्यमंत्री निर्णय घेतील’- संजय राठोड
शिवसेना नेते आणि राज्याचे माजी वनमंत्री संजय राठोड यांच्याबाबत एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे. संजय राठोड हे पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणी अडचणीत सापडले होते. संबंधित प्रकरणी विरोधी पक्ष जास्त आक्रमक झाल्याने त्यांना गेल्यावर्षी मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. त्यानंतर संजय राठोड पुन्हा मंत्रीमंडळात येणार असल्याच्या चर्चा सुरु झाल्या आहेत. विशेष म्हणजे संजय राठोड यांना पूजा चव्हाण प्रकरणी क्लीन चीट देण्यात यावी या मागणीसाठी पोहरादेवीच्या महंतांनी दोन दिवसांपूर्वी पुणे पोलिसांकडे विनंती केली होती. त्यानंतर राठोड पुन्हा मंत्रीमंडळात सहभागी होणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं होतं. या चर्चांवर संजय राठोड यांनी स्वत: प्रतिक्रिया दिली आहे. “माझ्या मंत्रिमंडळ वापसीबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे निर्णय घेतील. पण संधी मिळाली तर समाजाला न्याय देण्याचा प्रयत्न करेन”, असं सूचक विधान संजय राठोड यांनी केलं आहे. तसेच “मी समाजासाठी काम करतोय. पुढेही करत राहीन”, असं देखील राठोड म्हणाले.
आघाडी सरकार अल्पमतात, उद्धव ठाकरेंनी राजीनामा द्यावा – नारायण राणे
राज्यसभा निवडणुकीनंतर केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी पत्रकार परिषद घेत शिवसेनेवर जोरदार निशाणा साधला आहे. राज्यसभा निवडणुकीत सहा जागांवर एकूण सात उमेदवार रिंगणात होते. यापैकी महाविकास आघाडीचे तीन उमेदवार आणि तीन जागांवर भाजपचे उमेदवार जिंकले. तर शिवसेनेच्या एका उमेदवाराचा पराभव झाला. महाविकास आघाडीला अपक्ष आणि लहान पक्षांचा पाठिंबा असतानाही शिवसेनेचा उमेदवार पराभूत झाल्याने शिवसेनेच्या गोटात एकच खळबळ उडाली आहे. याच मुद्द्यावरुन आता नारायण राणे यांनी शिवसेनेवर निशाणा साधला आहे.
नारायण राणे म्हणाले, मला सांगायचं आहे उद्धव ठाकरेजी सत्तेसाठी 145 मते लागतात.. तुम्ही अल्पमतात आला आहात. तुम्ही राजीनामा द्या. नैतिकतेचं भान असेल तर राजीनामा द्या आणि बाजुला व्हा. या महाराष्ट्राला 10 वर्षे मागे नेलंत. सत्तारुढ आणि विरोधक यांचं लोकशाहीत असलेलं नातंही तुम्ही धुळीला मिळवलं. त्यामुळे सत्तेवर राहण्याचा तुम्हाला अधिकार नाही.
सोनिया गांधींची तब्येत बिघडली, रुग्णालयात दाखल
काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांची प्रकृती खालावल्याने त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दिल्लीतील गंगाराम रुग्णालयात त्यांना दाखल करण्यात आले आहे. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, सोनिया गांधी यांना काही दिवसांपूर्वी कोरोनाचा संसर्ग झाला होता. कोविड संबंधित त्रास होत असल्याने त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
सोनिया गांधी यांना सध्या रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती स्थिर आहे. काँग्रेस नेते रणदीप सुरजेवाला यांनी याबाबत माहिती दिली आहे.
‘1 किलो वजन कमी करा आणि 1000 कोटी मिळवा’; गडकरींचं चॅलेंज स्विकारत खासदाराने घटवलं 15 किलो
मध्य प्रदेशातील उज्जैन लोकसभा मतदारसंघातील भाजप खासदार अनिल फिरोजिया सध्या त्यांच्या फिटनेसवर खूप मेहनत घेत आहेत. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी म्हटलं होतं की फिरोजिया यांच्या मतदारसंघातील विकासकामांसाठी पैसा हवा असेल, तर ते जितकं किलो वजन कमी करतील, तितकं मोठं पॅकेज त्यांना दिलं जाईल. गडकरी म्हणाले होते की 1 किलो वजन कमी करण्यासाठी एक हजार कोटी रुपयांचं पॅकेज मिळेल, जे अनिल फिरोजिया त्यांच्या लोकसभा मतदारसंघातील विकासकामांवर खर्च करू शकतात. यानंतर आता या खासदाराचा दावा आहे, की त्यांनी 15 किलो वजन कमी केलं आहे.
देहूतील तुकोबांचे मंदिर भाविकांसाठी राहणार खुले
देहूतील संत तुकाराम महाराजांचे मंदिर दर्शनासाठी भाविकांना बंद ठेवण्याचा निर्णय संस्थानने मागे घेतला आहे. केवळ कार्यक्रमादिवशी म्हणजे १४ जूनला सायंकाळी पाचपर्यंत मंदिरात भाविकांना बंदी असणार आहे, अशी माहिती देहू संस्थानचे अध्यक्ष नितीन महाराज मोरे यांनी दिली आहे. शनिवारी देहूतील तुकोबांचे मंदिर भाविकांसाठी तीन दिवस बंद ठेवण्यात येणार असल्याचे विश्वस्त माणिक महाराज मोरे यांनी सांगितलं होतं. परंतु, या निर्णयानंतर समाजमाध्यमांवर आलेल्या प्रतिक्रिया आणि भाविकांची होणारी गैरसोय यामुळे हा निर्णय बदलण्यात आला असल्याची माहिती नितीन महाराज मोरे यांनी दिली आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते १४ जूनला शिळा मंदिर आणि तुकोबांच्या मूर्तीचा लोकार्पण सोहळा पार पडणार आहे. त्या पार्श्वभूमीवर सुरक्षेच्या दृष्टीने देहू संस्थान ने मंदिर तीन दिवस बंद ठेवण्याचा निर्णय घेतला होता. परंतु, तो निर्णय आता बदलण्यात आला आहे. याविषयी देहू संस्थान चे अध्यक्ष नितीन महाराज मोरे म्हणाले की, मंदिर परिसर स्वच्छ करून घेण्यात येत आहे.
शरद पवार यांच्या नावाला आमचा पाठिंबा, राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीवर नाना पटोलेंचे भाष्य
राज्यसभेची निवडणूक संपताच आता राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीचे सर्वांना वेध लागले आहे. या निवडणुकीसाठी सत्ताधारी तसेच विरोधकांनी तयारी सुरु केली आहे. ही निवडणूक भाजपासाठी सोपी जाणार असल्याचे म्हटले जात आहे. मात्र असे असले तरी विरोधकदेखील या निवडणुकीत पूर्ण ताकदीने उतरणार आहेत. या पार्श्वभूमीवर राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी शरद पवार यांचे नाव समोर येत असेल तर आमचा त्यांना पाठिंबा राहील, असे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले आहेत. ते आज पत्रकारांशी बोलत होते.
१०० दिवसांत युक्रेनच्या १० हजार सैनिकांचा मृत्यू
सध्या रशिया आणि युक्रेन या दोन देशांत युद्ध सुरू आहे. हे युद्ध सुरू होऊन आज १०९ दिवस उलटले आहेत, तरीही युद्ध थांबण्याची कोणतीही चिन्हे दिसत नाहीत. या युद्धात रशिया आणि युक्रेन दोन्ही देशांना मोठा फटका बसला आहे. दररोज निष्पाप नागरिकांसह आणि अनेक सैनिक मारले जात आहेत. युद्ध सुरू झाल्यापासून प्रथमच युक्रेनच्या एका उच्चपदस्थ अधिकाऱ्यानं युद्धात मृत पावलेल्या सैनिकांबाबत मोठा खुलासा केला आहे.
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की यांचे सल्लागार ओलेक्सी अरेस्टोव्हिच यांनी शनिवारी सांगितलं की, युद्ध सुरू झाल्यापासून आतापर्यंत युक्रेनच्या १० हजार सैनिकांचा मृत्यू झाला आहे. त्यांनी अलीकडेच सोशल मीडियावर एक मुलाखत दिली होती. मुलाखतीदरम्यान विचारलेल्या एका प्रश्नावर त्यांनी १० सैनिकांचा मृत्यू झाल्याच्या चर्चेला दुजोरा दिला आहे.
दुसऱ्या सामन्यात पावसाचा खेळ?
भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातल्या 5 टी-20 मॅचच्या सीरिजची दुसरी मॅच रविवारी कटकमध्ये होणार आहे. ऋषभ पंतच्या नेतृत्वात खेळत असलेली टीम इंडिया या सामन्यात विजय मिळवून बरोबरी करण्यासाठी मैदानात उतरेल. भारतीय टीमने सामन्याच्या एक दिवस आधी शनिवारी जोरदार सराव केला. तर दुसरीकडे दक्षिण आफ्रिकेचा हा सामना जिंकून सीरिजमध्ये 2-0 ने आघाडी घेण्याचा प्रयत्न असेल.
SD Social Media
9850 60 3590