राजापूर रिफायनरीवरून शिवसेनेत धूमशान, आणखी एक आमदार सोडणार ठाकरेंची साथ?
राजापूर रिफायनरीवरून शिवसेनेमध्ये धूमशान सुरू आहे. बारसू, सोलगाव इथं रिफायनरी उभारणीला स्थानिक शिवसेना आमदार राजन साळवी यांनी समर्थन केल्यामुळे शिवसेना नेतृत्व नाराज आहे. स्थानिक जनतेच्या बाजूने शिवसेना असल्याची खासदार विनायक राऊत यांची भूमिका आहे. राजन साळवी यांनी घेतलेल्या समर्थनाच्या भूमिकेवरून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी नाराजी व्यक्त केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
राजन साळवी यांनी राजापूरच्या रिफायनरीच्या समर्थनार्थ भूमिका घेतल्यानंतर उद्धव ठाकरेंनी त्यांना मातोश्रीवर बोलावलं आणि खडसावल्याचीही माहिती आहे. पक्षश्रेष्ठींनी रिफायनरीला विरोध केल्यास आमदार राजन साळवी वेगळी राजकीय भूमिका घेण्याची शक्यता आहे.
कांजूर कारशेड भुखंडाचा राज्य आणि केंद्र सरकारचा वाद मिटला
कांजूरमार्ग कारशेडच्या भूखंड प्रकरणात राज्य सरकार आणि केंद्र सरकार यांच्यातला वाद संपुष्टात आला आहे. आरेमधील मेट्रो कारशेड कांजूरला हलवण्याबाबतचा 1 ऑक्टोबर 2020 चा आदेश राज्य सरकारने मागे घेतला आहे. याबाबत मुंबई उपनगर जिल्हाधिकाऱ्यांचा संबंधित आदेश हायकोर्टात सादर करण्यात आला आहे.
कांजूरमार्गमधील 102 एकरचा भूखंड एमएमआरडीएच्या ताब्यात देण्याचा आदेश देण्यात आला होता. या निर्णयाला केंद्र सरकारने आव्हान दिलं होतं. केंद्र सरकारने मिठागर आयुक्तांमार्फत या जागेवर आपला मालकी हक्क सांगत हायकोर्टात याचिका दाखल केली होती. राज्यामध्ये शिंदे-फडणवीस सरकार आल्यानंतर मेट्रो कारशेड पुन्हा आरे कॉलनीत हलवण्याचा निर्णय घेण्यात आला.
TET परीक्षा घोटाळ्यात सत्तारांच्या संस्थेतील 10 ते 12 लाभार्थी, अंबादास दानवेंचा गंभीर आरोप
टीईटी परीक्षा घोटाळ्यामुळे वादात अडकलेले शिंदे गटाचे मंत्री अब्दुल सत्तार यांच्या अडचणीमध्ये पुन्हा वाढ होण्याची चिन्ह आहे. टीईटी परीक्षा घोटाळ्यामध्ये सत्तार यांच्या संस्थेतील 10 ते 12 जणांची नाव आहे, असा खळबळजनक आरोप शिवसेनेचे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केला आहे.टीईटी परीक्षा घोटाळ्यामुळे अब्दुल सत्तार चांगलेच अडचणीत सापडले आहे. त्यांच्या मुलांची नाव टीईटी परीक्षेच्या लाभार्थीच्या यादीत असल्याचे समोर आले होते. मात्र, तरीही शिंदे सरकारने सत्तार यांना कॅबिनेट मंत्रिपद बहाल केले आहे. आज अंबादास दानवे यांनी पत्रकार परिषद घेऊन सत्तार यांच्यावर गंभीर आरोप केले आहे.
दगडूशेठ हलवाई गणपती मंडळाकडून अथर्वशीर्ष पठण, पुण्यात मध्यभागातील वाहतुकीत बदल
राज्यात उद्या बुधवारी 31 ऑगस्टपासून गणेशोत्सवाला सुरुवात होत आहे. संपूर्ण राज्यात दोन वर्षांनी मोठ्या धुमधडाक्यात लाडक्या गणरायाचं आगमन होणार आहे. पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंडळाकडून गुरुवारी 1 सप्टेंबरला पहाटे उत्सव मंडप परिसरात सामूहिक अथर्वशीर्ष पठणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर शहरातील मध्यभागातील वाहतूक व्यवस्थेत गुरुवारी पहाटे चार वाजल्यापासून बदल करण्यात येणार आहेत.
मनसेसोबत युती करायचीय म्हणून राज ठाकरेंची भेट?
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सोमवारी (29 ऑगस्ट) राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती. त्यामुळे विविध चर्चांना उधाण आलं आहे. राज्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील सरकार आल्यापासून राज ठाकरे आणि भाजपचे संबंध आणखी चांगले झाल्याचं चित्र आहे. देवेंद्र फडणवीस यांनी याआधी राज ठाकरे यांच्या निवासस्थानी जावून त्यांची भेट घेतली होती. त्यानंतर काल राज ठाकरे यांनी फडणवीसांच्या निवासस्थानी जावून भेट घेतली. राज ठाकरे आणि फडणवीस यांच्या भेटीमागे नेमकं कोणत्या मुद्द्यांवर चर्चा झाली? याबाबत चर्चा सुरु आहे. दरम्यान, देवेंद्र फडणवीस यांनी आज प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया दिली. यावेळी त्यांनी राज ठाकरेंच्या भेटीवरही प्रतिक्रिया दिली.
देवेंद्र फडणवीस यांनी आज राज ठाकरेंच्या भेटीवर प्रतिक्रिया देणं टाळलं. मुंबई महापालिकेच्या निवडणुका जवळ आल्या आहेत. त्यामुळे आगामी काळात मनसे आणि भाजप एकत्र येणार का? असा प्रश्न देवेंद्र फडणवीस यांना विचारला तेव्हा त्यांनी त्यावर प्रतिक्रिया देणं टाळलं. “तुम्ही काहीही पंतगबाजी कराल आणि मी थोडीच उत्तर देणार”, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.
‘आधी मोठमोठी भाषणं दिली अन् आता..’; अण्णा हजारेंचं केजरीवालांना पत्र
ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी अरविंद केजरीवाल यांना पत्र लिहिलं आहे. अरविंद केजरीवाल मुख्यमंत्री झाल्यापासून अण्णांनी हे पहिलं पत्र लिहिलं आहे. दिल्लीतील दारू धोरणात घोटाळे झाल्याच्या वृत्ताबाबत अण्णा हजारे यांनी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना पत्र लिहिलं आहे. अण्णांनी यात आपली नाराजी व्यक्त केली आहे.
या पत्रात अण्णा हजारे यांनी दारू धोरणावर केजरीवाल यांना फटकारले आहे. अण्णा हजारे म्हणाले की, तुमच्या सरकारने महिलांवर परिणाम करणारे दारू धोरण केलं, लोकांचं जीवन उद्ध्वस्त केलं. तुमच्या बोलण्यात आणि वागण्यात फरक आहे. अण्णांनी आपल्या पत्रात लिहिलं आहे की, टीम अण्णाच्या सदस्यांची 10 वर्षांपूर्वी 18 सप्टेंबर 2012 रोजी दिल्लीत बैठक झाली, त्यावेळी तुम्ही राजकीय मार्ग स्वीकारण्याबाबत बोलले होते. पण राजकीय पक्ष काढणे हे आमच्या आंदोलनाचं उद्दिष्ट नव्हतं हे तुम्ही विसरलात.
देशात आत्महत्येचं प्रमाण वाढलं; 55 वर्षांतील सर्वाधिक आत्महत्यांची नोंद 2021 मध्ये, महाराष्ट्र अव्वल
मागची दोन वर्षे ही कोरोनाच्या सावटाखाली गेली. या काळात कोरोनामुळे अनेकांना प्राण गमवावे लागले. या भयंकर साथीच्या रोगामुळे लोकांनी फक्त जवळचे लोकच गमावले नाहीत, तर नोकरी आणि पैसाही गमावला. रोजंदारीवर काम करणाऱ्या लोकांना तर उपासमार सहन करावी लागली. उद्योगधंदे बंद झाल्याने लोकांच्या हाताला काम नव्हतं, अशातच या भयंकर साथीच्या रोगाचा सामना करावा लागला. अनेकांचे उपासमारीने जीव गेलेत, तर अनेकांनी हाताला काम नसल्याच्या आणि नोकरी गेल्याच्या तणावातून कोरोना काळात आत्महत्या केल्या. या दोन वर्षांतील आत्महत्यांची आकडेवारी ही मागच्या जवळपास 55 वर्षांनंतर सर्वाधिक आहे.
देशात 1967 नंतर पहिल्यांदाच सर्वाधिक आत्महत्यांची नोंद करण्यात आली आहे. गेल्या वर्षी दर 10 लाख लोकसंख्येमागे 120 जणांनी आत्महत्या केल्या होत्या. हा दर 2020 च्या तुलनेत 6.1 टक्क्यांनी जास्त आहे. यापूर्वी 2010 मध्ये सर्वाधिक आत्महत्यांची नोंद करण्यात आली होती. तेव्हा दर 10 लाख लोकांमागे 113 जणांनी आत्महत्या केल्या होत्या. नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरोने जारी केलेल्या ताज्या आकडेवारीतून ही बाब समोर आली आहे. या संदर्भात लाइव्ह हिंदुस्थानने वृत्त दिलंय.
काँग्रेसला जम्मू-काश्मीरमध्ये मोठा धक्का; माजी उपमुख्यमंत्र्यांसह ६४ जणांचा राजीनामा
ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझाद यांनी काही दिवसांपूर्वी काँग्रेस पक्षाचा राजीनामा दिला होता. त्यांच्या राजीनाम्यानंतर काँग्रेसला मोठा धक्का बसलेला. त्यानंतर आता काँग्रेस पक्षाला आणखी एका झटका बसला आहे. गुलाम नबी आझाद यांनी पक्षाला रामराम केल्यापासून जम्मू-काश्मीरमध्ये आतापर्यंत ६४ जणांनी काँग्रेस पक्षाचा राजीनामा दिला आहे. यामध्ये माजी उपमुख्यमंत्र्यासह, माजी मंत्री आणि काही माजी आमदारांचा समावेश आहे.गुलाम नबी आझाद यांच्या समर्थनार्थ काँग्रेसच्या ६४ नेत्यांनी आपल्या पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. त्यामध्ये माजी उपमुख्यमंत्री तारा चंद, माजी मंत्री अब्दुल माजिद वानी, मनोहर लाल शर्मा, घारु राम आणि माजी आमदार बलवन सिंह यांनी काँग्रेस पक्ष सोडण्याची घोषणा केली आहे.
सर्वोच्च न्यायालयाचा ‘मोठा’ निर्णय; बाबरी विध्वंस आणि गुजरात दंगलीशी संबंधित याचिका बरखास्त
बाबरी मशीद विध्वंस आणि गुजरात दंगलीशी संबंधित सर्वोच्च न्यायालयाने मोठा निर्णय घेतला आहे. न्यायालयाने बाबरी मशीद विध्वंस प्रकरणी उत्तर प्रदेश सरकारविरोधात दाखल झालेल्या आणि गुजरात दंगलीशी संबंधित दाखल झालेल्या ११ जनहित याचिका बरखास्त केल्या आहेत. २०१९ मध्ये रामजन्मभूमी बाबरी मस्जिद प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने अंतिम निकाल दिल्यानंतर उत्तर प्रदेश सरकारविरोधातील या प्रकरणीच्या जनहित याचिका निष्फळ ठरल्या असून त्या बंद करण्यात येत असल्याचे सांगितले. तसेच गुजरातमधील गोध्रा येथील दंगलींनंतर न्यायालयीन हस्तक्षेपाची मागणी करत अनेक जनहित याचिका दाखल करण्यात आल्या होत्या. परंतु नंतर या प्रकरणी झालेल्या प्रगतीनंतर याचिका निष्फळ ठरत असल्याचे निरीक्षण न्यायालयाने नोंदवले आहे.
भारताकडून पाकिस्तानला आर्थिक मदतीची शक्यता
पाकिस्तानात नुकत्याच आलेल्या पुरामुळे मोठ्या प्रमाणात नागरिक बेघर झाले आहेत. अतिवृष्टीमुळे पिकांचे मोठे नुकसान झाले असून महागाईदेखील प्रचंड वाढली आहे. भाजीपाल्यांचे भावही गगनाला भिडले आहेत. अशा परिस्थिती भारताकडून पाकिस्तानला आर्थिक मदत देण्याची शक्यता आहे.
गौतम अदानी जगातले तिसऱ्या क्रमांकाचे अतिश्रीमंत
अब्जाधीश गौतम अदानी यांनी लुई व्हिटॉनचे अध्यक्ष आणि सीईओ बर्नार्ड अर्नॉल्ट यांना मागे टाकून ब्लूमबर्ग अब्जाधीशांच्या यादीत टॉप ३ मध्ये आपले स्थान निश्चित केले आहे. हा मान मिळवणारे अदानी हे आशिया खंडातील पहिले व्यावसायिक ठरले आहेत. विशेष म्हणजे चीनचे जॅक मा आणि भारताचे दुसरे सर्वात श्रीमंत व्यक्ती मुकेश अंबानी यांना सुद्धा आजवर हे करणे शक्य झालेले नाही.
रोहित शर्मा घेणार कॅप्टन कूल धोनीची जागा
संयुक्त अरब अमिरातीमध्ये सुरू असलेल्या आशिया कपमध्ये टीम इंडियाने पाकिस्तानचा ५ विकेट्सने पराभव करून जोरदार सुरुवात केली आहे. आता ३१ ऑगस्टला टीम इंडिया हाँगकाँगशी आमने सामने येणार आहे. दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडिय येथे भारत विरुद्ध हॉंगकॉंग सामना पार पडणार आहे. हा सामना भारतीय संघाला महत्त्वाचा असणार आहे कारण या सामन्यात विजयी झाल्यास टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा याच्या शिरपेचात एक मानाचा तुरा रोवला जाणार आहे.पाकिस्तान विरुद्धच्या विजयासह रोहित शर्माने आशिया चषक स्पर्धेत सलग सहा विजय मिळवले आहेत. आशिया कप सामन्यातील कर्णधार म्हणून प्राप्त केलेले ६ विजय हे सर्वाधिक असून हा विक्रम एमएस धोनी आणि मोईन खान यांच्या नावे आहे. जर हाँगकाँग विरुद्धचा सामना भारताने जिंकला तर सात विजयांसह रोहित शर्मा या यादीत प्रथम क्रमांकावर येईल. रोहितसाठी हा एक महत्त्वाचा विक्रम असेल. २०१८ मध्ये अफगाणिस्तान विरुद्धचा बरोबरीचा ससामन्याचा अपवाद वगळल्यास रोहितच्या नेतृत्वाखाली भारत अपराजित राहिला.
SD Social Media
9850 60 3590