आयर्लंड दौऱ्यासाठी टीम इंडियाची निवड जाहीर झाली आहे. आयपीएल स्पर्धेत गुजरात टायटन्सला विजेतेपद मिळवून देणाऱ्या हार्दिक पांड्याची या टीमचा कॅप्टन म्हणून निवड करण्यात आली आहे. टीम इंडियाची मुख्य टीम याच काळात इंग्लंडमध्ये असेल. त्यामुळे आयपीएल स्पर्धा गाजवलेल्या अनेक खेळाडूंना या टीममध्ये संधी देण्यात आलीय. राजस्थान रॉयल्सचा कॅप्टन संजू सॅमसनचं टीममध्ये पुनरागमन झालं असून पुणेकर राहुल त्रिपाठीची पहिल्यांदाच टीममध्ये निवड झाली आहे.
आयपीएल स्पर्धेत फिनिशर म्हणून दमदार कामगिरी करणाऱ्या राहुल तेवातियाकडं मात्र निवड समितीनं दुर्लक्ष केलं आहे. टीम इंडियात निवड न झाल्यानं तेवातिया दुखावला असून त्यानं त्याची वेदना सोशल मीडियावर व्यक्त केली आहे. ‘अपेक्षा असली की त्रास होतो’ असं ट्विट तेवातियानं या याबाबत केलं आहे.
गुजरात टायटन्सला आयपीएल स्पर्धेचं विजेतेपद मिळवून देण्यात तेवातियाच्या आक्रमक बॅटींगचा महत्त्वाचा वाटा होता. त्यानं 16 सामन्यांत 147.61 च्या स्ट्राईक रेटनं 217 रन केले होते. शेवटच्या ओव्हर्समध्ये त्यानं केलेल्या फटकेबाजीमुळे गुजरातला काही थरारक विजय मिळाले होते. या कामगिरीच्या जोरावर टीम इंडियात निवड होईल अशी, तेवातियाला आशा होती. मात्र त्याची निराशा झाली आहे.
आयर्लंड दौऱ्याच्या वेळी टीम इंडियाचा हेड कोच राहुल द्रविड हा मुख्य टीमसोबत इंग्लंडमध्ये असेल. त्यामुळे व्ही.व्ही.एस. लक्ष्मण भारतीय टीमचा कोच असणार आहे. यापूर्वी गेल्या वर्षी मुख्य भारतीय टीम इंग्लंडमध्ये असताना श्रीलंका दौऱ्यावर गेलेल्या तरूण टीम इंडियाचे प्रशिक्षकपद राहुल द्रविडनं सांभाळलं होतं. टीम इंडिया आयर्लंड दौऱ्यावर 2 टी20 सामने खेळणार असून 26 आणि 28 जून रोजी हे सामने खेळले जाणार आहेत.
आयर्लंड दौऱ्यासाठी भारतीय टीम
हार्दिक पांड्या, भुवनेश्वर कुमार, इशान किशन, ऋतुराज गायकवाड, संजू सॅमसन, सूर्यकुमार यादव, व्यंकटेश अय्यर, दीपक हुड्डा, राहुल त्रिपाठी, दिनेश कार्तिक, युझवेंद्र चहल, अक्षर पटेल, रवी बिष्णोई, हर्षल पटेल, आवेश खान, अर्शदीप सिंग, उमरान मलिक