राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारकडून काल(शुक्रवार) एक मोठा निर्णय घेण्यात आला आहे. महाविकास आघाडीतील बड्या नेत्यांची सुरक्षा राज्य सरकारने काढली आहे. मात्र मिलिंदि नार्वेकर यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली असून, जितेंद्र आव्हाड यांची सुरक्षा जैसे थे ठेवण्यात आली आहे. शिंदे-फडणवीस सरकारच्या या निर्णयामुळे राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू आहेत.
राज्यात सत्ताबदल होऊन शिंदे-फडणवीस सरकार आल्यापासून महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून विविध मुद्य्यांवरून वारंवार राज्य सरकारवर टीका केली जात आहे. आता शिंदे सरकारने घेतलेल्या या निर्णयामुळे एकच खळबळ उडाल्याचे दिसत आहे.
मिलिंद नार्वेकर यांच्या सुरक्षेत झालेली वाढ हा त्यातमध्ये सर्वाधिक चर्चेचा विषय आहे. कारण, मिलिंद नार्वेकर हे शिवसेनेचे नेते आणि उद्धव ठाकरे यांचे अत्यंत जवळचे मानले जातात, मात्र मध्यंतरी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी त्यांची झालेली भेट ही चर्चेचा विषय ठरली होती. त्यानंतर आता त्यांची सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आल्याने चर्चेला अधिकच जोर आला आहे. नार्वेकरांना एक्स दर्जाची सुरक्षा होती, आता त्यांना वाय प्लस सुरक्षा प्रदान करण्यात आली आहे.
महाविकास आघाडीमधील कोणत्या नेत्यांची सुरक्षा काढली? –
छगन भुजबळ, बाळासाहेब थोरात, जयंत पाटील, नाना पटोले, नितीन राऊत, संजय राऊत, सतेज पाटील, भास्कर जाधव, विजय वडेट्टीवार, धनंजय मुंढे, नवाब मलिक, सुनील केदार, नरहरी झिरवळे, वरूण सरदेसाई, डेलकर परिवार