उड्डाणादरम्यान इंजिनला आग; ‘इंडिगो’च्या विमानाचा मोठा अपघात थोडक्यात टळला

बंगळुरुला जाणाऱ्या ‘इंडिगो’ कंपनीच्या विमानाचा मोठा अपघात थोडक्यात टळला आहे. दिल्ली विमानतळावर उड्डाणादरम्यान इंडिगोच्या (६E-२१३१) या विमानाच्या इंजिनला आग लागली होती. या घटनेनंतर हे उड्डाण रद्द करण्यात आले आहे. या घटनेत कोणीही जखमी झाले नाही. विमानातील १७७ प्रवासी आणि सात कर्मचाऱ्यांना सुरक्षित बाहेर काढण्यात आले आहे.

या घटनेचा व्हिडीओ एका प्रवाश्याने ट्विटरवर पोस्ट केला आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. उड्डाणादरम्यान विमानाच्या इंजिनमधून ठिणग्या बाहेर पडताना या व्हिडीओत स्पष्ट दिसत आहे.सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर विमानाला आग लागल्याची माहिती विमानतळ नियंत्रण कक्षाला केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाच्या (सीआयएसएफ) नियंत्रण कक्षाकडून देण्यात आली होती. त्यानंतर तात्काळ पाऊलं उचलत या परिस्थितीवर विमानतळ कर्मचाऱ्यांकडून नियंत्रण मिळवण्यात आले. केंद्रीय नागरी हवाई वाहतूक मंत्रालयाने या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.

या घटनेनंतर इंडिगो कंपनीकडून एक निवेदन जारी करण्यात आले आहे. “दिल्लीहून बंगळुरूला जाणाऱ्या ६E-२१३१ या विमानाला उड्डाणादरम्यान तांत्रिक अडचणीचा सामना करावा लागला. वैमानिकाने हे उड्डाण तात्काळ रद्द केले. या विमानातील सर्व प्रवासी आणि कर्मचारी सुरक्षित आहेत. या प्रवाश्यांसाठी पर्यायी विमानाची व्यवस्था करण्यात आली आहे. प्रवाशांना झालेल्या त्रासाबदद्ल आम्ही दिलगीर आहोत”, असं ‘इंडिगो’नं म्हटलं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

scroll to top
error: आपल्याला माहिती कॉपी करण्याची परवानगी नाही.