आज दि.१ आॕक्टोबर च्या दिवसभरातील ठळक घडामोडी अशा…

एलपीजी सिलेंडरच्या
किंमतीत ४३ रुपयांची वाढ

पेट्रोलियम कंपन्यांनी आता व्यावसायिक लिक्विफाइड पेट्रोलियम गॅस अर्थात एलपीजी सिलेंडरच्या किंमतीत ४३ रुपयांची वाढ केली आहे. किंमतीतील या वाढीनंतर, आता दिल्लीतील १९ किलोच्या व्यावसायिक प्रति सिलेंडरची किंमत आता १७३६.५० रुपये इतकी झाली आहे. हे नवीन दर आजपासून लागू होतील. त्यामुळे, आजपासूनच (१ ऑक्टोबर) व्यावसायिक गॅस सिलेंडर खरेदी करताना जास्त किंमत मोजावी लागणार आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केला स्वच्छ भारत मिशन नागरी २.० मोहिमेचा शुभारंभ

मोदी अटल मिशन २.० (AMRUT 2.0) या मोहिमेचासुद्धा शुभारंभ करण्यात आला. दोन्ही मोहिमांचा शुभारंभ कार्यक्रम सुरु असून यासाठी मोदी पोहोचले आहेत. स्वच्छ भारत मिशन शहरी २.० आणि अटल मिशन २.० अंतर्गत सर्व शहरांना कचरामुक्त कऱणे आणि सांडपाण्याचं व्यवस्थापन करणे हा उद्देश आहे.

स्वच्छ भारत मिशन नागरी २.० आणि अटल मिशन २.० या दोन्ही मोहिमेंतर्गत देशात वेगाने शहरीकरणामध्ये येणाऱ्या आव्हानांवर उपाय योजनाच्या दिशेने काम केले जाणार आहे.

शाहीन चक्रीवादळाची तीव्रता वाढणार; येत्या 4 दिवसांत राज्यात धुव्वाधार पावसाची शक्यता

बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या गुलाब चक्रीवादळाने भारताच्या पूर्व किनारपट्टीला धडक दिल्यानंतर, आता अरबी समुद्रात शाहीन चक्रीवादळाचा धोका निर्माण झाला आहे. सुदैवाची बाब म्हणजे शाहीन चक्रीवादळ भारताच्या पश्चिम किनारपट्टीला धडकणार नाही. पण गुजरातच्या किनारपट्टीवर याचा काहीअंशी परिणाम जाणवण्याची शक्यता आहे. हे चक्रीवादळ सध्या भारतीय किनारपट्टीपासून आखाती देशांच्या किनारपट्टीकडे मार्गक्रमण करत आहे. हे वादळ पुढील काही तासांत तीव्र रुप धारण करण्याची शक्यता आहे.

68 वर्षांनंतर एअर इंडियावर
पुन्हा टाटा समूहाच्या ताब्यात

जेआरडी टाटा यांनी 1932 साली टाटा एअरलाईन्स कंपनी स्थापन केली होती. मात्र, काँग्रेस सरकारच्या काळात या कंपनीचे सार्वजनिकीकरण झाले होते. त्यामुळे कंपनीचे नाव बदलून एअर इंडिया असे करण्यात आले होते. आज 68 वर्षांनंतर ही कंपनी पुन्हा टाटा समूहाच्या ताब्यात जाण्याची शक्यता आहे. टाटा सन्सबरोबरीनेच, स्पाइसजेटचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक अजय सिंग हे स्पर्धेत होते. टाटा समूहाने एअर इंडियाच्या खरेदीसाठी तब्बल 5000 कोटी रुपये मोजण्याची तयारी दर्शविल्याचे सांगितले जाते. आर्थिक बोलीत 85 टक्के हिस्सा हा कंपनीवरील कर्जदायित्वासाठी, तर 15 टक्के हा रोख रूपात येण्याचे अंदाजण्यात येत आहे.

दुसरा डोस घेतलेल्यामध्ये करोनाची
बाधा होण्याचं प्रमाण पुण्यात वाढलं

पुण्यात दुसरा डोस घेतलेल्या नागरिकांमध्ये करोनाची बाधा होण्याचं प्रमाण काहीसं वाढलं आहे. त्यामुळे प्रशासनासाठी ही चिंतेची बाब ठरली असून नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलं आहे. पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी यासंदर्भात पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली आहे.
दुसऱ्या डोसनंतर लागण होण्याचं प्रमाण ०.२५ टक्के!
पुण्यात दुसऱ्या डोसनंतर करोनाची बाधा होण्याचं प्रमाण हे पहिल्या डोसनंतर करोनाची बाधा होण्याच्या प्रमाणापेक्षा जास्त असल्याचं अजित पवार यांनी नमूद केलं.

उपचार करण्यासाठी पैसे नसल्यामुळे
पित्याने मुलाला नदीत फेकले

आपल्या मुलावर उपचार करण्यासाठी पैसे नसल्यामुळे पित्यानच पोटच्या मुलाला नदीत फेकून दिल्याची धक्कादायक घटना कोल्हारपूरमध्ये घडली आहे. कोल्हापूरच्या इचलकरंजी भागात ही घटना उघडकीस आली असून या प्रकरणी पोलिसांनी पित्याला अटक केली आहे. सिकंदर हुसेन मुल्ला असं ४८ वर्षीय पित्याचं नाव असून अफान सिकंदर मुल्ला असं नदीत फेकलेल्या ५ वर्षांच्या चिमुकल्याचं नाव आहे. याप्रकरणी शिवाजी नगर पोलीस चौकशी करत आहेत.

निवासी डॉक्टरांच्या संघटनेचे
आजपासून संप आंदोलन

महाराष्ट्र राज्य निवासी डॉक्टरांच्या संघटनेने (MARD) करोना काळातील शैक्षणिक शुल्क माफ करण्यासह आपल्या विविध मागण्यांसाठी राज्यभरात आजपासून (१ ऑक्टोबर) अनिश्चित काळासाठी संप पुकारला आहे. या संपाबाबत मार्डची वैद्यकीय संशोधन आणि संचालनालयाच्या संचालकांसोबत सेंट जॉर्ज रुग्णालयात गुरुवारी (३० सप्टेंबर) रात्री उशीरापर्यंत बैठक सुरू झाली होती. दरम्यान, या पार्श्वभूमीवर एएनआय या वृत्तसंस्थेशी बोलताना सायनच्या लोकमान्य टिळक म्युनसिपल मेडिकल कॉलेजच्या निवासी डॉक्टरांनी आपली भूमिका मांडली आहे.

शिर्डी-हैदराबाद आणि शिर्डी- नवी दिल्ली
विमानसेवा पुन्हा सुरू होणार

कोरोना लॉकडाऊनमुळे ठप्प असलेली येथील विमानसेवा आता पुन्हा सुरू होणार आहे. इंडिगो कंपनीकडून येत्या १५ ऑक्टोबरपासून दोन शहरांसाठी विमानसेवा सुरू होत आहे. त्याचे बुकींग सुरू झाले आहे. शिर्डी-हैदराबाद आणि शिर्डी- नवी दिल्ली या त्या दोन सेवा आहेत. राज्य सरकारने नवरात्रीच्या पहिल्या माळेपासून सर्व धार्मिक स्थळे उघडण्यास परवानगी दिली आहे. त्यानुसार शिर्डी येथील श्री साईबाबा मंदिरही खुले होत आहे. मंदिर खुले होताच भाविकांसाठी विमानसेवाही सुरू होत आहे. आठवड्यातील सर्व दिवस ही सेवा दिली जाणार असल्याचे कंपनीने सांगितले

धार्मिक प्रार्थना स्थळे सुरु करण्यास
७ ऑक्टोंबर पासून परवानगी

कोविड- 19 च्या अनुषंगांने शासनाच्या मार्गदर्शक तत्वांचे काटेकोरपणे पालन करुन प्रतिबंधीत क्षेत्राबाहेरील धार्मिक आणि प्रार्थना स्थळे सुरु करण्यास ७ ऑक्टोंबर पासून परवानगी देण्यात आली आहे.
प्रतिबंधीत क्षेत्राबाहेरील धार्मिक आणि प्रार्थना स्थळांच्या वेळेबाबत संबंधीत विश्वस्त मंडळ, घटना व्यवस्थापक यांनी निर्णय घ्यायचा आहे. धार्मिक आणि प्रार्थना स्थळांच्या ठिकाणी मास्कचा आणि सुरक्षीत अंतर पाळायचे आहे.

देशातील ८२% विद्यार्थी प्रत्यक्षात
शाळेत येण्यास उत्सुक

देशातील ८२% विद्यार्थी आता प्रत्यक्षात शाळेत येण्यास उत्सुक असल्याचे ब्रेनली या जगातील सर्वात मोठ्या ऑनलाइन लर्निंग प्लॅटफॉर्मद्वारे करण्यात आलेल्या सर्वेक्षणातून निदर्शनास आले आहे. सर्वेक्षणात शाळा पुन्हा सुरू होण्याच्या संदर्भात आणि ऑनलाइन शिक्षणाचे भवितव्य यावर विद्यार्थ्यांच्या भावनांवर प्रकाश टाकण्यात आला आहे

तुळजाभवानी मंदिरात दररोज
15 हजार भाविकांनाच दर्शन मिळणार

महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी देवीचा शारदीय नवरात्र उत्सव 7 ऑक्टोबरपासून सुरू होणार असून या उत्सव काळात दररोज केवळ 15 हजार भाविकांना प्रवेश दिला जाणार आहे. भाविकांना मंदिरात प्रवेश असेल मात्र त्यांना अभिषेक इतर विधींना परवानगी नाही. देवीचे महंत,सेवेकरी व मानकरी यांच्या उपस्थितीत देवीचे कुलाचार विधी संपन्न होणार आहेत.

आर्थिक व्यवहाराचे नियम
आज पासून बदलणार

आर्थिक व्यवहार अधिक सुरक्षित आणि सुलभ करण्यासाठी सरकार आणि बँकांकडून सातत्याने नियमांमध्ये बदल केले जात असतात. त्यामुळे अलीकडच्या काळात अगदी दर महिन्याला आर्थिक व्यवहारांशी संबंधित कोणत्या ना कोणत्या नियमांत बदल होत असतो. येत्या 1 ऑक्टोबरपासून आर्थिक व्यवहारांबाबत असेच काही बदल होऊ घातले आहेत.

रिझर्व बँकेच्या आटो
डेबीट नियमांमध्ये बदल

नेटफ्लिक्स, अ‍ॅमेझॉन प्राईम किंवा हॉटस्टार यासारख्या ओव्हर द टॉप म्हणजे ओटीटी माध्यमांचे ग्राहक असाल तर रिझर्व्ह बँकेच्या बदललेल्या धोरणाचा तुमच्यावर परिणाम होऊ शकतो. रिझर्व्ह बँकेकडून घोषणा केलेल्या ऑटो डेबिटच्या नियमांची 1 ऑक्टोबरपासून अंमलबजावणी होईल. त्यामुळे आता तुम्हाला नेटफ्लिक्स, अ‍ॅमेझॉन प्राईम किंवा हॉटस्टारच्या सबस्क्रिप्शनचे पैसे भरण्याच्या पद्धतीत बदल करावा लागू शकतो. अर्थात हा नियम सगळ्यांसाठी सरसकट लागू होणार नाही.

SD social media
9850 60 3590

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

scroll to top
error: आपल्याला माहिती कॉपी करण्याची परवानगी नाही.