राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांनी पुन्हा एकदा भाजप नेते गिरीश महाजन यांच्यावर नाव न घेता निशाणा साधला आहे. ज्यांचे वडील मास्तर होते. त्यांनी हजार बाराशे कोटींची संपत्ती जमवली. त्यांची चौकशी का होत नाही?, असा सवाल एकनाथ खडसे यांनी केला आहे. त्यामुळे खडसे आणि महाजन यांच्यात पुन्हा जुंपण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांच्यावर ईडीने कारवाई केल्याच्या चर्चेला उधाण आले होते. दरम्यान आज एकनाथ खडसे यांनी जळगाव जिल्ह्यातील बोदवड येथे एका कार्यक्रमात उपस्थित राहून कार्यकर्त्यांशी संवाद साधला. याप्रसंगी बोलताना खडसे यांनी आता ईडीचा काहीही संबंध राहिला नसल्याचे म्हटले आहे. याबाबत न्यायालयात खटला दाखल केला असल्याचे त्यांनी सांगितलं. तसेच यावेळी आपल्याबद्दल अपप्रचार करणाऱ्या विरोधकांना खडसे यांनी धारेवर धरले असून गिरीश महाजन यांचे नाव न घेता निशाणा साधला आहे.
माझे स्वतःचे घर वाडे होते. मात्र ज्यांचे वडील मास्तर होते. त्यांनी हजार बाराशे कोटी रुपयांची प्रॉपर्टी जमवली. त्यांची चौकशी का होत नाही? असा सवाल त्यांनी महाजन यांचं नाव न घेता केला आहे. नाथाभाऊचा आता ईडीशी काहीच संबंध राहिलेला नाही. याबाबत कोर्टामध्ये दावा दाखल झाला आहे. आता बोलायचंच असेल तर कोर्ट बोलवेल. ईडी बोलावणार नाही. त्यामुळे आता ईडीशी संबंध राहिला नसल्याचे खडसे यांनी म्हटले आहे. मात्र नाव खराब करण्यासाठी विरोधक जिवाचं रान करत असून नाथाभाऊची ताकद माहिती असल्याने विरोधक अशा प्रकारचे कृत्य करत असल्याचा आरोपही त्यांनी केला.
भाईचंद हिराचंद रायसोनी सोसायटीचा घोटाळा मी उघड केला. विरोधकांचे खरे दुखणे हे असून त्यामुळे विरोधक माझ्यावर आरोप-प्रत्यारोप करत असल्याचेही त्यांनी म्हटलं आहे.
दरम्यान,खडसे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर भाजपचा गड असलेल्या जळगावात भाजपला मोठे धक्के बसत आहेत. 24 सप्टेंबर रोजी बोदवडमधील 11 नगरसेवकांनी हाती शिवबंधन बांधलं. पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांच्या उपस्थितीत भाजपच्या 11 नगरसेवकांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. महत्वाची बाब म्हणजे हे नगरसेवक एकनाथ खडसे समर्थक होते. त्यामुळे हा धक्का नेमका कुणाला? अशी चर्चा आता जळगावच्या राजकीय वर्तुळात पाहायला मिळतेय.