नागपूर महापालिकेतील 68 नगरसेवक मौनी नगरसेवक ठरले आहेत. या नगरसेवकांनी गेल्या 4 वर्षात सभागृहात एकही प्रश्न विचारलेला नाही. यात सर्वाधिक भाजपचे 52 तर काँग्रेसचे 12 आणि बसपाचे 4 नगरसेवक आहेत. ज्या उद्देशानं नागरिक नगरसेवकांना निवडून देतात त्या उद्देशालाच या नगरसेवकांनी हरताळ फसलाय.
नागपूर महापालिकेत एकूण 151 नगरसेवक आहेत. प्रभागातील समस्या, प्रश्न सोडविण्याची क्षमता असणाऱ्या उमेदवाराला मतदार निवडून देत असतात. निवडून आलेल्या नगरसेवकांनी सभागृहात प्रश्न मांडून ते सोडवावेत, अशी सामान्य जनतेला अपेक्षा असते. मात्र, नागपूर महापालिकेतील 68 नगरसेवक असे आहेत ज्यांनी चार वर्षात सभागृहात तोंडच उघडलं नाही.
चार वर्षात त्यांनी एकही प्रश्न विचारला नाही. याध्ये महापालिकेत सत्तापक्ष असलेल्या भाजपचे सर्वाधिक 52 नगरसेवक आहेत. त्याखालोखाल काँग्रेसचे 12 आणि बसपाचे 4 नगरसेवक आहेत. जनतेचे प्रश्न न मांडणाऱ्या आणि न सोडविणाऱ्या नगरसेवकांना पुन्हा पुन्हा तिकीटच देऊ नये, अशी मागणी आता होतेय तर पक्षाकडून सावरासावर करण्याचा प्रयत्न केला जातोय.
भाजप गेल्या 15 वर्षांपासून महापालिकेत सत्तेत आहे. मात्र, तरीही शहरातील समस्या सुटल्या नाहीत, प्रश्न कायम आहेत. आम्ही खूप काम केलं, असा दावा भाजपकडून वारंवार केला जातो. मात्र, सभागृहात भाजपचे नगरसेवक मौन धारण करतात, त्यामुळं कुठलेही प्रश्न मार्गी लावत नाही, हे माहितीवरून दिसत असल्याचा आरोप काँग्रेसनं केलाय.