अफगाणिस्तानच्या कुंदुज (Kunduz) प्रांतात शक्तीशाली स्फोट झाला असून या स्फोटात 100 लोक मारले गेले आहेत. तर अनेक जण जखमी झाले आहेत. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. तालिबानच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, शिया मशिदीजवळ स्फोट झाला तेव्हा नागरिक शुक्रवारची नमाज अदा करत होते.
याआधी 3 ऑक्टोबरला काबूलमधल्या एका मस्जिदीच्या बाहेर बॉम्ब स्फोट झाला होता. यात 5 अफगाण नागरिकांचा मृत्यू झाला होता. जबिहुल्ला मुजाहिद यांच्या आईच्या मृत्यूबद्ल शोक व्यक्त करण्यासाठी अनेक जण मशिदीत जमले होते. या हल्ल्याची जबाबदारी अद्याप कोणत्याही संघटनेने घेतलेली नाही. पण इस्लामिक स्टेट ग्रुपवर (The Islamic State in Khorasan Province) संशय असून काबूल ताब्यात घेतल्यापासून तालिबानवर हल्ले तीव्र झाले आहेत.
स्फोटाच्या काही तासांच तालिबानने अफगाणिस्तानच्या राजधानीत इस्लामिक स्टेटच्या अड्ड्यावर हल्ला करून आपल्या लोकांच्या मृत्यूचा बदला घेतला आणि अनेक दहशतवाद्यांना ठार केलं. सोमवारी मुजाहिद यांनी एका निवेदनात म्हटले आहे की तालिबान सैन्याने काबुलच्या उत्तरेला खैर खाना इथं इस्लामिक स्टेट सेंटरवर हल्ला केला. मात्र, आयएसचे किती दहशतवादी मारले गेले हे त्यांनी सांगितले नाही.