काँग्रेस आणि डावे पक्ष केरळमध्ये एकमेकांशी कुस्ती खेळतात आणि त्रिपुरात दोस्ती करतात, अशी टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी केली. त्रिपुरामध्ये या पक्षांना मत दिल्यास हे राज्य अनेक वर्षे पिछाडीवर जाईल, असेही मोदी म्हणाले.
त्रिपुरामधील प्रचारसभेत मोदींनी काँग्रेस आणि डाव्यांना लक्ष्य केले. भाजप देशभरातील आदिवासींच्या उत्थानासाठी काम करत आहे, तर डावे पक्ष आणि काँग्रेसने आदिवासींमध्ये फूट पाडली, असा आरोप मोदी यांनी केला. केंद्र सरकारने आदिवासी क्षेत्रांच्या विकासासाठी १ लाख कोटी रुपयांची तरतूद केल्याचे त्यांनी सांगितले. राज्याचा विकास पुढेही सुरू ठेवण्यासाठी ‘डबल इंजिन’ सरकारला पुन्हा सत्तेवर आणा, असे आवाहन मोदी यांनी केले.
करोनावरून केरळ लक्ष्य
डाव्यांची सत्ता असलेल्या राज्यामध्ये (केरळ) करोना विषाणूमुळे मोठय़ा प्रमाणात मृत्यू झाले, पण भाजपची सत्ता असलेले त्रिपुरा मात्र सुरक्षित राहिले, असा दावा पंतप्रधान मोदी यांनी या प्रचारसभेत केला.करोनामुळे मृत्यू झालेल्या राज्यांमध्ये केरळचा अधिकृतरित्या क्रमांक दुसरा आहे, पहिल्या क्रमांकावर महाराष्ट्र आहे. सरकारी आकडेवारीनुसार उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश आणि गुजरात या राज्यांमध्ये करोनाबळींची संख्या बरीच कमी आहे. मात्र उत्तर प्रदेशसारख्या राज्यात मृत्यूचे खरे आकडे महाराष्ट्रापेक्षाही जास्त असल्याचे आरोप झाले आहेत.
तिरंगी लढतीचा आम्हाला फायदा : येचुरी
राज्यातील तिरंगी लढतीचा फायदा काँग्रेस आणि माकप युतीला होईल, अशी आशा माकपचे सरचिटणीस सीताराम येचुरी यांनी व्यक्त केली. त्रिपुराच्या ६० जागांसाठी १६ फेब्रुवारीला निवडणूक होत आहे. त्यातील २० जागा आदिवासींसाठी राखीव आहेत. टिपरा मोथा या स्थानिक पक्षामुळे भाजपला होणाऱ्या मतदानाच्या टक्केवारीत घट होईल, असा विश्वास येचुरी यांनी व्यक्त केला.