डॉ. नरेंद्र दाभोळकर हत्या प्रकरणात 7 सप्टेंबरला आरोपनिश्चिती होणार

अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे प्रणेते डॉ. नरेंद्र दाभोळकर यांच्या हत्या प्रकरणातील 5 आरोपींविरोधात येत्या मंगळवारी म्हणजेच 7 सप्टेंबरला आरोपनिश्चिती होणार आहे. याप्रकरणाचा तपास करणाऱ्या सीबीआय तपास यंत्रणेने आरोपींविरोधात यूएपीए कायद्याअंतर्गत खटला चालवण्याची मागणी केली आहे. दाभोळकर यांच्या हत्येच्या घटनेला तब्बल 8 वर्ष झाली आहेत. हत्येनंतर अखेर 8 वर्षांनी आरोपनिश्चिती होणार आहे.

दाभोळकर हत्या प्रकरणी मुंबई हायकोर्टात याप्रकरणाची सुनावणी झाली. अतिरिक्त सत्र न्यायाधीश (विशेष न्यायालयाचे न्यायाधीश) एस आर. नावंदर यांच्यासमोर डॉ. वीरेंद्रसिंह तावडे, शरद कळसकर, सचिन अंदुरे, वकील संजीव पुनाळेकर आणि विक्रम भावे या पाच आरोपींवरील आरोप निश्चितीबाबतचा युक्तिवाद झाला. यावेळी सरकारी वकील प्रकाश सूर्यवंशी यांनी आरोपींच्या विरोधात एका समूहाच्या लोकांच्या मनात दहशत माजवण्याच्या प्रयत्न केल्याप्रकरणी यूएपीएचे कलम 16 अंतर्गत खटला चालवावा, अशी मागणी केली. तसेच यूएपीएच्या कलम 16 लागू करण्यासाठी सीबीआयला राज्य सरकारकडून मंजुरी मिळाली आहे, असं देखील त्यांनी यावेळी नमूद केलं.

“यूएपीएच्या कलम 16 ची व्याख्या म्हणजे समाजातील किंवा समाजातील लोकांच्या मनात दहशत निर्माण करणे. तर सध्याच्या प्रकरणात आमचा युक्तिवाद असा आहे की, डॉ. दाभोळकर यांच्या हत्येसाठी बंदुकीचा वापर लोकांच्या एका गटामध्ये दहशत निर्माण करण्यासाठी केला गेला होता, येथे लोकांचा एक गट म्हणजे जो गट महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मुलन समिती (दाभोळकर यांनी स्थापन केलेला) सदस्य आहे, म्हणून यूएपीएचे कलम 16 अंतर्गत खटला चालवावा”, असं देखील सरकारी वकील यावेळी म्हणाले.

दुसरीकडे बचाव पक्षाचे वकील वीरेंद्र इचलकरंजीकर यांनी मात्र युएपीएच्या कलम 16 लागू करण्याच्या सरकारी वकिलांच्या मागणीला विरोध केला. “आम्ही यूएपीएच्या कलम 16 चा खटला चालवण्याच्या मागणीला विरोध करतो. कारण फिर्यादी 2016 पासून त्यांच्या विविध कागदपत्रांद्वारे सांगत आहेत की, दाभोळकर डॉ. तावडेंना तुच्छ लेखत असत आणि त्याचे पडसाद म्हणून त्यांनी त्यांची हत्या केली होती. मग दहशतवादाचा प्रश्न कुठे उद्भवतो?” असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.

“सीबीआयच्या सुरुवातीच्या चौकशीत सारंग अकोलकर आणि विनय पवार यांनी दाभोळकरांना गोळ्या घालून ठार मारले होते आणि तावडे यांना कटकारस्थानी म्हटले होते. पण नंतर अंदुरे आणि कलास्कर यांनी दाभोळकर यांना गोळ्या घालून ठार मारल्याचा आणखी एक सिद्धांत त्यांनी न्यायालयासमोर मांडला, ज्यात त्यांनी पुन्हा तावडे यांना कट कारस्थानी म्हणून नाव दिले. हे असंच कसं असू शकतं? एकच सिद्धांत असायला पाहिजे,” असा युक्तीवाद त्यांनी केला. दोन्ही बाजूंचे युक्तिवाद ऐकल्यानंतर कोर्टाने याप्रकरणाची पुढील सुनावणी 7 सप्टेंबरला होईल, अशी घोषणा केली.

पुण्यातील ओंकारेश्वर पुलावर 20 ऑगस्ट 2013 रोजी डॉ. नरेंद्र दाभोळकर यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. 20 ऑगस्ट 2013 रोजी पुण्यातील ओंकारेश्वर पुलावर डॉ. नरेंद्र दाभोळकर यांची गोळी झाडून हत्या करण्यात आली होती. ओंकारेश्वर पुलावर सकाळी सव्वा सात वाजण्यापूर्वी हल्लेखोरांचे दोन प्रत्यक्षदर्शी साक्षीदार उपस्थित होते. त्यांनी डॉ. दाभोळकर कोण याची ओळख हल्लेखोरांना करुन दिल्याचं यापूर्वी उघडकीस आलं होतं. मारेकऱ्यांना दाभोळकर यांची खात्री झाल्यानंतर त्यांच्यावर प्रत्यक्ष गोळ्या झाडण्यात आल्या आहेत, असेही तपासात समोर आले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

scroll to top
error: आपल्याला माहिती कॉपी करण्याची परवानगी नाही.