आज गुरुवारपासून राज्यभरातील परिचारिकांनी कामबंद आंदोलन पुकारलं आहे. राज्यातील तब्बल 20 हजार परिचारिका या संपात सहभागी होणार आहेत, त्यामुळं याचा मोठा परिणाम राज्यभरातील रुग्णसेवेवर पाहायला मिळू शकतो. बुधवारीही संचालकांच्या बैठकीत परिचारिकांच्या मागण्यांबाबत कोणताही निर्णय न घेतला गेल्याने परिचारिकांनी आजपासून कामबंद आंदोलन पुकारलं आहे. याशिवाय तोडगा न निघाल्यास 28 मेपासून बेमुदत आंदोलन करणार असल्याचा इशारा परिचारिंकांनी दिला आहे.
आपल्या विविध मागण्यांसाठी राज्यभरातील परिचारिका सोमवारपासून आझाद मैदानात आंदोलन करणार आहेत. केवळ तोंडी आश्वासन महत्त्वाचं नसून लेखी आश्वासनासह त्याची अंमलबजावणी झाली पाहिजे, अशी मागणी करत परिचारिकांनी आजपासून आंदोलन आणखी तीव्र करण्याचा इशाराही दिला आहे.
बुधवारी झालेल्या संचालकांच्या बैठकीत कोणताही तोडगा निघाला नाही त्यामुळं आम्ही राज्यभर कामबंद आंदोलन करणार आहोत. आमच्यासोबत चतुर्थ श्रेणी कामगारही या आंदोलनात सहभागी होणार आहेत. आता या कामबंद आंदोलनातून काही निष्पन्न न झाल्यास 28 मेपासून बेमुदत आंदोलनात उतरणार आहोत, असं परिचर्या समन्वय संघटनेच्या कार्याध्यक्ष हेमलता गजबे यांनी सांगितलं. तसंच आतापर्यंत राज्यातील एकाही मंत्र्याने किंवा अधिकाऱ्याने आंदोलनाला भेट दिलेली नसल्याची तक्रारही त्यांनी केली.
राज्यभरातील परिचारिकांच्या एक तास काम बंद आंदोलनाचा बुधवारी तिसरा आणि अखेरचा दिवस होता. परंतु बुधवारीही संचालकांच्या बैठकीत त्यांच्या मागण्यांवर कोणताही तोडगा निघाला नाही. त्यामुळे आता परिचारिका आजपासून कामबंद आंदोलन करत आहेत. राज्यातील 20 हजार परिचारिका यात सहभागी होणार असल्याने याचा परिणाम रुग्णसेवेवर होणार आहे.