शिवजन्मस्थळ शिवनेरी महाराष्ट्राचेच नाही तर जगाचे श्रद्धास्थान आहे. शिवरायांचे राज्य रयतेच्या कल्याणासाठी होते. अलौकिक पराक्रम करून त्यांनी हिंदूवी स्वराज्याचा पाया घातला. छत्रपती शिवाजी महाराज यांचे कार्य देशाला मार्गदर्शक आहे, असे गौरवोद्गार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रविवारी किल्ले शिवनेरीवर झालेल्या शिवजयंती सोहळय़ामध्ये काढले. तर, गड-कोट, किल्ल्यांच्या संवर्धनासाठी देण्यात येणाऱ्या निधी व्यतिरिक्त प्रत्येक जिल्हा नियोजन मंडळाच्या निधीतील तीन टक्के रक्कम राखीव ठेवण्यात येईल, अशी घोषणा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली.
किल्ले शिवनेरी येथे एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत शिवजन्मोत्सव सोहळा उत्साहात साजरा झाला. पर्यटनमंत्री मंगलप्रभात लोढा, माजी खासदार छत्रपती संभाजीराजे, शिवाजीराव आढळराव पाटील, आमदार प्रवीण दरेकर, अतुल बेनके, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. अंकित गोयल, अपर जिल्हाधिकारी अजय मोरे, जुन्नरचे विभागीय पोलीस अधिकारी मंदार जवळे, माजी आमदार शरद सोनवणे, आशा बुचके, मराठा सेवा संघाचे प्रदेशाध्यक्ष विजय घोगरे, राजेंद्र डुबल, रुपेश जगताप या वेळी उपस्थित होते.
शिंदे म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराज यांनी उभारलेले गड-कोट, किल्ले आपला इतिहास आणि संपत्ती असल्याने ती जपण्याचे काम योग्यप्रकारे करण्यात येईल. त्यांचा आदर्श समोर ठेवून आपण काम करतो. त्यांच्या विचारानुसार राज्य शासन सर्वसामान्य, गोरगरीब आदी सर्व घटकांसाठी काम करीत आहे. शिवनेरी परिसराचा विकास आराखडा वेळेत पूर्ण होईल. वढू, तुळापूर येथील विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही.फडणवीस म्हणाले की, छत्रपती संभाजी महाराजांची समाधी असलेल्या वढू, तुळापूरसाठी ३९७ कोटी रुपयांचा आराखडा केला असून या कामांसाठी निधी कमी पडून देणार नाही. शिवराज्याभिषेकाला ३५० वर्षे पूर्ण होत आहेत. त्यासंदर्भात बृहद कार्यक्रम हाती घेतला असून एक वर्ष शिवाजी महाराजांचा विचार, स्मारके जनतेपर्यंत पोहचविण्याचे काम सरकार करेल.
व्हीआयपी पास कशासाठी?
शिवजयंतीसाठी शिवनेरीवर येणाऱ्या ठरावीक शिवभक्तांना व्हीआयपी पास दिला जातो आणि राज्यभरातून आलेल्या हजारो शिवभक्तांना गडाच्या पायथ्याशी तिष्ठत उभे का केले जाते. असा दुजाभाव का? असा सवाल माजी खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी उपस्थित केला. मुख्यमंत्र्यांसह मान्यवरांनी हेलिकॉप्टरने न येता पायी चालत गडावर यावे. राष्ट्रपतीचे हेलिकॉप्टर रायगडावर उतरू दिले नाही, अशी आठवण त्यांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांना करून दिली. शिवजयंतीच्या शासकीय कार्यक्रमात अडथळा नको म्हणून मी खालीच थांबतो, अशी भूमिका घेत ते श्रोत्यांमध्ये बसले. ‘शिवप्रेमीच्या गडावरील प्रवेशासंदर्भातील भूमिकेशी आम्ही सहमत आहोत. पुढील वर्षी प्रशासनाला योग्य त्या सूचना दिल्या जातील, असे एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केले.