शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण हे चिन्ह एकनाथ शिंदेना देण्याचा निर्णय निवडणूक आयोगाने घेतला आहे. उद्धव ठाकरेंसाठी हा सगळ्यात मोठा धक्का आहे. निवडणूक आयोगाच्या या निर्णयाविरोधात उद्धव ठाकरे सुप्रीम कोर्टात जाणार आहेत. सुप्रीम कोर्टात आधीच ठाकरे गट आणि शिंदे गट यांच्यामध्ये 16 आमदारांच्या अपात्रतेच्या मुद्द्यावरून वाद सुरू आहेत. या आठवड्यात लागोपाठ तीन दिवस सुप्रीम कोर्टात सुनावणी पार पडली, यानंतर आता 21 तारखेला पुन्हा एकदा सुनावणी होणार आहे.
सुप्रीम कोर्टामध्ये ठाकरे गटाकडून कपिल सिब्बल आणि अभिषेक मनू सिंघवी हे बाजू मांडत आहेत. कपिल सिब्बल यांनी निवडणूक आयोगातही ठाकरे गटाची बाजू मांडली. ठाकरेंसाठी किल्ला लढवणारे कपिल सिब्बल नेमकं किती मानधन घेतात? याबाबत अनेकांच्या मनात उत्सुकता आहे. ठाकरेंची केस लढवण्यासाठी सिब्बल नेमकी किती फी घेतात, याबाबत माहिती मिळू शकली नाही, पण केरळ सरकारच्या एका आदेशामुळे सिब्बल यांचं मानधन समोर आलं आहे. कपिल सिब्बल हे देशभरात सर्वाधिक मानधन घेणाऱ्या वकिलांपैकी एक असल्याचंही बोललं जातं.
कपिल सिब्बल यांनी सोने तस्करी प्रकरणात केरळ सरकारची बाजू सुप्रीम कोर्टात मांडली. मुख्य म्हणजे कपिल सिब्बल फक्त एकच दिवस सुप्रीम कोर्टाच्या सुनावणीसाठी आले होते, यासाठी कपिल सिब्बल यांना 15.5 लाख रुपये मानधन मिळालं. केरळच्या कायदा सचिवांनी सिब्बल यांना या सुनावणीचे 15.5 लाख रुपये द्यावेत यासाठी केरळ सरकारला पत्र लिहिलं होतं.
10 ऑक्टोबर 2022 या एकाच दिवशी कपिल सिब्बल यांनी केरळ सरकारची बाजू सुप्रीम कोर्टात मांडली. केरळचा सोने तस्करीचा खटला बंगळुरूमध्ये हलवण्यात यावा, यासाठी ईडीने कोर्टात धाव घेतली होती, याला विरोध करण्यासाठी कपिल सिब्बल यांनी एक दिवस सुप्रीम कोर्टात केरळ सरकारची बाजू मांडली.