एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यातील निवासस्थानाबाहेर शिवसैनिक आक्रमक
ठाण्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आनंद आश्रम या निवासस्थानाबाहेर शिवसैनिक आणि पोलीस यांच्यात गोंधळ झाल्याची माहिती समोर आली आहे. एकनाथ शिंदे हे आज ठाण्यात त्यांच्या निवासस्थानी आहेत. असं असताना त्यांच्या घराबाहेर शिवसैनिक आणि पोलीस यांच्यात बाचाबाची झाली. विशेष म्हणजे एकनाथ शिंदे यांच्या निवासस्थानाबाहेर शेकडो शिवसैनिक हे त्यांच्या भेटीसाठी तात्कळत उभे आहेत. ते आपल्याला प्रत्यक्ष भेटतील अशी कार्यकर्त्यांची आशा आहे. त्यासाठी कल्याण, बदलापूर, पालघर, भिवंडी, मुरबाड अशा वेगवेगळ्या ठिकाणाहून आणि लांबून शिवसैनिक आले आहेत. मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी शिवसैनिक तासंतास उभे आहेत. याच दरम्यान या शिवसैनिक आणि पोलिसांमध्ये बाचाबाची झाल्याची माहिती समोर आली आहे.
‘नारळ नंतर फोडता येईल’ नितीन गडकरींच्या निर्णयामुळे सगळेच भारावले
साधारणपणे एखादा रस्ता वा पूल बांधल्यानंतर तो जनतेसाठी खुला करण्यापूर्वी मोठा उद्घाटन समारंभ पार पडतो. कित्येक वेळा हा समारंभ उशिरा झाल्यामुळे जनतेलाही या सोयी वापरण्यासाठी वाट पाहावी लागते. केंद्रीय रस्ते व वाहतूक मंत्री नितीन गडकरींनी मात्र असं होऊ नये याची खबरदारी घेतली.सोहना-गुरुग्राम हायवेचं उद्घाटन 11 जुलै रोजी होणार होते. या कार्यक्रमाला नितीन गडकरींसोबत राज्याचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर आणि उपमुख्यमंत्री दुष्यंत चौटाला हेदेखील उपस्थित राहणार होते; मात्र हे दोघंही सध्या विदेशात असल्यामुळे हा कार्यक्रम रद्द करण्यात आला. हायवेचं उद्घाटन रद्द झाल्यामुळे आता हा मार्ग वापरण्यासाठी आणखी वाट पाहावी लागणार अशी चिंता तिथल्या नागरिकांना वाटू लागली; मात्र गडकरींनी उद्घाटनाशिवाय हा रस्ता वाहतुकीसाठी खुला करावा असे निर्देश NHAI ला दिले. यामुळे जनता गडकरींवर भलतीच खुश झाली. ‘झी न्यूज’ने याबाबतचं वृत्त प्रसिद्ध केलं आहे.
राहुल गांधी पुन्हा परदेश दौऱ्यावर, काँग्रेसच्या उद्यापासूनच्या महत्त्वाच्या बैठकीला दांडी मारणार
राष्ट्रपतीपदाची निवडणूक आणि संसदेचं पावसाळी अधिवेशन 18 जुलैपासून सुरू होत आहे. पण या सगळ्या महत्त्वाच्या घडामोडी घडत असताना काँग्रेस नेते राहुल गांधी मंगळवारी (12 जुलै) एका छोट्या खासगी दौऱ्यासाठी परदेशी रवाना झाले आहेत, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. राहुल गांधी भारतात रविवारी (17 जुलै) परतण्याची शक्यता आहे; मात्र काँग्रेस पक्षाकडून राहुल गांधी यांच्या दौऱ्याबाबत अधिक माहिती देण्यात आलेली नाही.
नागपूरमध्ये स्कॉर्पिओ वाहून गेली, सहा जणांना जलसमाधी
नागपूर जिल्ह्यातील सावनेर तालुक्यातील नांदागोमुख मार्गावरील पुलावरुन स्कार्पियो वाहन वाहून गेल्याची घटना काल घडली. यात 5 ते 6 प्रवासी पुरात वाहून गेल्याची माहिती पुढे येत आहे. काल दुपारी 3 वाजता ही घटना घडली. या घटनेचा धक्कादायक व्हिडीओ समोर आला आहे. यात स्कार्पियो गाडीत काही लोक असल्याचे पाहायला मिळत आहेत.
वसईत चाळीवर कोसळली दरड, आई-मुलगा वाचला, पण बाप-लेकीचा झाला मृत्यू
राज्यभरात पावसाने धुमशान घातले आहे. ठिकठिकाणी दरडी कोसळण्याच्या घटना घडत आहे. मुंबई जवळील वसई पूर्वेच्या वाघरळपाडा येथील एका चाळीतील घरावर दरड कोसळली. या दुर्घटनेत वडील आणि मुलीचा मृत्यू झाला आहे. तर दोन जण जखमी आहे. जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. वसई पूर्वेच्या वाघरळपाडा येथील एका चाळीवर आज सकाळी 6 वाजता दरड कोसळली होती. 4 जण ढिगार्याखाली अडकले होते. त्यांना ढिगार्यातून बाहेर काढण्यात आले आहे. या दुर्घटनेत अमित ठाकूर आणि त्यांची मुलगी रोशनी ठाकूर यांचा ढिगाऱ्याखाली दबून दुर्दैवी मृत्यू झाला आहे.
18+ सर्वांना कोरोना लशीचा बुस्टर डोस फ्री; मोदी सरकारची मोठी घोषणा
भारतात कोरोनाची प्रकरणं दिवसेंदिवस वाढत आहेत. कोरोनाच्या चौथ्या लाटेचं संकट घोंघावत आहे. त्यामुळे आता मोदी सरकारने तातडीने हालचाली सुरू केल्या आहेत. मोदी सरकारने आता मोठा निर्णय घेतला आहे. देशात आता 18 पेक्षा जास्त वयाच्या सर्व नागरिकांना कोरोना लशीचा बुस्टर डोस म्हणजेच प्रिकॉशन डोस फ्री दिला जाणार आहे, अशी घोषणा केंद्र सरकारने केली आहे
पाळीव कुत्र्याचा 80 वर्षाच्या मालकिणीवर जीवघेणा हल्ला! एक तास तोडत होता लचके
मोकाट कुत्र्याने माणसांवर हल्ला केल्याच्या तुम्ही अनेक बातम्या वाचल्या किंवा ऐकल्या असतील. मात्र, पाळीव कुत्र्यानेच आपल्या मालकीणीवर हल्ल्याची केल्याची घटना दुर्मिळ म्हणावी लागेल. मात्र, हा हल्ला साधासुधा नव्हता. उत्तर प्रदेशची राजधानी लखनौमध्ये पिटबुलच्या हल्ल्याची ही बातमी कोणाच्याही मनात भिती निर्माण करणारी आहे. पिटबुलने 80 वर्षीय सुशीला त्रिपाठी यांच्यावर भयानक हल्ला केला. पिटबुलने सुशीला यांच्या शरीराचे अक्षरशः लचके तोडले, जे पिटबुलनेही खाल्ले आहे, असा शेजाऱ्यांचा दावा आहे. या पिटबुलमुळे संपूर्ण परिसरात दहशतीचे वातावरण आहे.
गुगलवरुन बँक हेल्पलाईन नंबर घेणे महागात, माजी सैनिकाच्या खात्यातून तब्बल 20 लाख रुपये लंपास
हिमाचलमध्ये एका माजी सैनिकाला धक्कादायक अनुभव आला आहे. नेट बँकिंग सुविधा सुरू करण्यासाठी गुगलवरून बँकेच्या हेल्पलाइन क्रमांकाची मदत घेणे या माजी सैनिकाला महागात पडले. सायबर क्राईम आरोपींनी माजी सैनिकाच्या खात्यातून तब्बल 20 लाख रुपये काढून घेतले. ही धक्कादायक घटना हिमाचल प्रदेशच्या बिलासपूर येथील आहे. याप्रकरणी बिलासपूरच्या तलाई पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मुंबई मनपा निवडणूक : “कोणी सोबत येईल की नाही याचा विचार नको, तयारी करा” शरद पवारांचे कार्यकर्त्यांना निर्देश
बहुमत गमावल्यामुळे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रीपदाचा राजीमाना द्यावा लागल्यानंतर राज्यातील राजकीय गणिते बदलली आहेत. नगरसेवक तसेच अनेक शिवसैनिक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणजेच बंडखोर गटात सामील होत आहेत. असे असताना अनेक शहरांच्या महानगरपालिकांच्या निवडणुका जवळ आल्या आहेत. या निवडणुकांना लक्षात घेऊन काही दिवसांपूर्वी झालेला सत्तासंघर्ष विसरुन सर्व पक्षांनी तयारीला सुरुवात केली आहे. दरम्यान, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी देखील मुंबई महानगरपालिकेची निवडणूक लक्षात घेऊन आपल्या कार्यकर्त्यांना कोणी सोबत येईल किंवा नाही, याबाबत विचार करु नका. तयारी करा, असे निर्देश दिले आहेत.
हिमाचल प्रदेशात भाजपाला धक्का, खिमी राम यांचा कॉंग्रेसमध्ये प्रवेश
हिमाचल प्रदेश भाजपाला मोठा धक्का बसला आहे. २००९ ते २०१२ या काळात हिमाचल प्रदेशात भाजपचे नेतृत्व करणारे प्रेमकुमार धुमल यांचे निकटवर्तीय खिमी राम यांनी कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. त्यांनी मंगळवारी अधिकृतरित्या काँग्रेसमध्ये प्रवेश केला.. या वर्षाच्या अखेरीस होणाऱ्या निवडणुकीत कुल्लू जिल्ह्यातील बंजार विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढविण्याचा त्यांचा विचार केला आहे. याच मतदार संघातून ते दोन वेळा निवडून आले होते.
निवृत्तीनंतर अवघ्या काही महिन्यातच पुनरागमन करणार इंग्लंडचा दिग्गज खेळाडू
इंग्लंडचा माजी कर्णधार इऑन मॉर्गनने काही दिवसांपूर्वीच सर्व प्रकारच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. त्याच्या जागी कर्णधार म्हणून बेन स्टोक्स आणि जोस बटलर यांची वर्णी लागली आहे. मात्र, निवृत्ती घेतल्यानंतर काही महिन्याच मॉर्गन क्रिकेटच्या मैदानावर पुनरागमन करणार आहे. आपल्या नेतृत्वाखाली इंग्लंडला पहिल्यांदाच विश्वचषक जिंकून देणारा इऑन मॉर्गन लिजेंड्स क्रिकेट लीगच्या दुसऱ्या सत्रात खेळताना दिसणार आहे.
राज्यातून द्रौपदी मुर्मू यांना ७० टक्क्यांपेक्षा अधिक मते मिळणार
राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत शिवसेनेच्या दोन्ही गटांनी भाजप उमेदवार द्रौपदी मुर्मू यांच्या उमेदवारीला पाठिंबा दिल्याने राज्यातून एकूण मत मूल्यांच्या ७० टक्क्यांपेक्षा अधिक मते मुर्मू यांना मिळू शकतात. भाजप उमेदवाराला शिंदे गटाच्या ४० तर त्यांच्याबरोबर असलेल्या १० अपक्षांनी आधीच पाठिंबा जाहीर केला होता. खासदारांच्या दबावानंतर पक्षातील फूट टाळण्यासाठीच बहुधा शिवसेनेनेही द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा जाहीर केला. यासाठी आदिवासी महिलेला सर्वोच्च पदावर संधी हे कारण पुढे करण्यात आले असले तरी खासदारांचा गट फुटू नये यासाठीच ही खबरदारी शिवसेनेने घेतल्याचे मानले जाते.
दीड मिनिटाचं भाषण वाचताना पाच वेळा अडखळले तेजस्वी यादव
राजकीय वर्तुळात जसे नेतेमंडळींचे आरोप चर्चेचा विषय ठरतात, तशीच त्यांनी मिश्किलपणे एकमेकांवर केलेली टोलेबाजी देखील चर्चेत राहाते. पण राजदचे अध्यक्ष लालू प्रसाद यादव यांचे पुत्र तेजस्वी यादव हे सध्या वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आले आहेत. त्यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. भाजपाच्या काही नेतेमंडळींकडून देखील हा व्हिडीओ व्हायरल केला जात असून त्यावरून “असे कसे नेता बनणार तुम्ही?” अशा खोचक शब्दांत निशाणा देखील साधला जात आहे. हा व्हिडीओ एका जाहीर कार्यक्रमातला असून यावेळी सभागृहात व्यासपीठावर खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि इतर ज्येष्ठ मान्यवर देखील उपस्थित असल्याचं दिसून येत आहे.
SD Social Media
9850 60 3590