लहान बाळ म्हटलं की ते रडणारच. मात्र दोन वर्षांच्या लेकराच्या रडण्याने वैतागलेल्या सैतान बापाने टोकाचं पाऊल उचलल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. सतत किरकिरणाऱ्या बाळाचा सख्ख्या बापानेच खून केला. विशेष म्हणजे हत्येच्या घटनेला अपघात असल्याचं भासवण्याचा प्रयत्नही आरोपीने केला. दोन वर्षांच्या मुलीची बापाने गळा आवळून हत्या केली. घटनेच्या वेळी चिमुकलीची आई घरात नव्हती.
घरात खेळता-खेळता मुलगी गॅस स्टोव्हवर पडून मृत्युमुखी पडली, असा बनाव त्याने पत्नीला फोन करुन रचला. परंतु पोस्ट मार्टमच्या अहवालात नराधम बापाचं बिंग फुटलं. मुंबईजवळच्या भाईंदर पश्चिम भागातील मुर्ढा गाव परिसरात ही अंगाचा थरकाप उडवणारी घटना घडली. रिक्षा चालक बापाला बेड्या ठोकून पोलिसांनी पुढील तपास सुरु केला आहे.
दोन वर्षांच्या मुलीच्या सततच्या रडण्याला कंटाळून पित्याने तिची निर्घृण हत्या केल्याचा प्रकार समोर आला आहे. हा अपघात असल्याचं भासवण्याचाही त्याने प्रयत्न केला. मात्र, पोस्टमॉर्टमच्या अहवालात त्याच्या या भीषण गुन्ह्याचा पर्दाफाश झाला.
रिक्षाचालक असलेल्या आरोपीने पोलिसांच्या जाळ्यातून सुटण्यासाठी, मुलीचा घरात खेळत असताना अपघात झाल्याची कहाणी रचली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भाईंदर (पश्चिम) जवळील मुर्ढा गाव परिसरातील एका इमारतीत ही घटना घडली. मुलीची आई कामानिमित्त बाहेरगावी गेल्याने घटनेच्या वेळी बापलेक दोघेच घरात होते.
आरोपीने मुलीचा गळा दाबून खून केला. मात्र खेळता खेळता ती चुकून गॅसच्या शेगडीवर पडल्याची माहिती तिच्या आईला फोन करुन दिली. मुलीला तातडीने जवळच्या रुग्णालयात नेण्यात आले, मात्र तिथे पोहोचताच तिला मृत घोषित करण्यात आले. शव विच्छेदन अहवालात मात्र मुलीचा मृत्यू गुदमरून झाल्याचे स्पष्ट झाले.
याशिवाय मुलीच्या डोक्यावर जखमेच्या खुणा दिसत होत्या. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास केला, तेव्हा समजले की आरोपी अनेकदा कामावरुन घरी परत आल्यानंतर मुलीच्या सततच्या रडण्याबद्दल राग व्यक्त करायचा. आरोपीला अटक करून भादंवि कलम 302 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सुरु आहे.