गुजरात विधानसभा निवडणुकीतील दुसऱ्या व अखेरच्या टप्प्यासाठीची प्रचाराची धामधूम शनिवारी संध्याकाळी पाच वाजता थांबली. ५ डिसेंबर रोजी मतदान होणार आहे. ९३ मतदारसंघांत ८३३ उमेदवार रिंगणात आहेत. ८ डिसेंबरला मतमोजणी होणार आहे.दुसऱ्या टप्प्यातील प्रमुख उमेदवारांत घाटलोडियातून मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल, विरमगाममधून पाटीदार नेते हार्दिक पटेल आणि गांधीनगर दक्षिणमधून इतर मागासवर्गीय (ओबीसी) नेते अल्पेश ठाकोर यांचा समावेश आहे. हार्दिक पटेल आणि ठाकोर हे दोघेही भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढवत आहेत. सौराष्ट्र, कच्छ आणि दक्षिण गुजरातमधील ८९ जागांसाठी पहिल्या टप्प्यातील मतदान १ डिसेंबर रोजी झाले होते. या टप्प्यात सरासरी ६३.३१ टक्के मतदान झाले होते. जे गत निवडणुकीच्या तुलनेत कमी होते.
या निवडणुकीत विद्यमान सत्ताधारी भाजप, काँग्रेस व आम आदमी पक्ष (आप) अशी तिरंगी लढत होत आहे. अहमदाबाद, बडोदा आणि गांधीनगरसह उत्तर आणि मध्य गुजरातमधील १४ जिल्ह्यांतील ९३ मतदारसंघांत सोमवारी मतदान होणार आहे. या मतदारसंघांत एकूण दोन कोटी ५४ लाख मतदारांची नोंदणी झाली आहे. २६ हजार ४०९ मतदान केंद्रांवर मतदान होणार असून, त्यासाठी सुमारे ३६ हजार इलेक्ट्रॉनिक मतदानयंत्रांचा वापर केला जाणार आहे. निवडणूक आयोगाने १४ जिल्ह्यांत २९ हजार पीठासीन अधिकारी आणि ८४ हजार मतदान अधिकारी तैनात केले असल्याची माहिती प्रसिद्धी पत्रकात दिली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १ आणि २ डिसेंबर रोजी अहमदाबादमध्ये दोन लागोपाठ प्रचारफेऱ्या (रोड शो) करत भाजपचा जोमाने प्रचार केला. गेल्या दोन दिवसांत त्यांनी पंचमहाल, छोटा उदेपूर, साबरकांठा, बनासकंठा, पाटण, आणंद आणि अहमदाबाद जिल्ह्यांत सात निवडणूक प्रचारसभांना संबोधित केले.
शनिवारी, भाजपने त्यांच्या आघाडीच्या नेत्यांच्या अनेक प्रचार फेऱ्या आणि प्रचारसभांचे नियोजन केले होते. केंद्रीय मंत्री अमित शहा, राजनाथ सिंह, गजेंद्रसिंह शेखावत, स्मृती इराणी आणि भाजप अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनीही दुसऱ्या टप्प्यात भाजपचा प्रचार केला. काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी अहमदाबाद आणि वाघोडिया येथे प्रचारसभांना संबोधित केले. ‘आप’साठी, दिल्लीचे मुख्यमंत्री अरिवद केजरीवाल आणि पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी गेल्या दोन दिवसांत प्रचारफेऱ्या व प्रचारसभांना संबोधित केले.
भाजपला बंडखोरांचे आव्हान
दुसऱ्या टप्प्यात काही ठिकाणी बंडखोर उमेदवारांचेही सत्ताधारी भाजपला आव्हान आहे. वाघोडियातील भाजपचे विद्यमान आमदार मधु श्रीवास्तव भाजपने उमेदवारी नाकारल्याने अपक्ष म्हणून निवडणूक लढवत आहेत. भाजपचे माजी आमदार दिनू सोलंकी, धवलसिंह झाला आणि हर्षद वसावा हे अनुक्रमे पदरा, बयाड आणि नांदोड मतदारसंघातून अपक्ष म्हणून रिंगणात आहेत.