बांगलादेशविरुद्ध रविवारपासून सुरू होणाऱ्या एकदिवसीय मालिकेत भारतीय संघ सलामीवीराच्या भूमिकेसाठी अनुभवी शिखर धवन आणि केएल राहुल यांच्यापैकी कोणाला पसंती देणार याकडे सर्वाचे लक्ष असेल.भारतीय संघाने पुढील वर्षी मायदेशात होणाऱ्या एकदिवसीय विश्वचषकाच्या दृष्टीने विचार करण्यास आता सुरुवात केली आहे. या मालिकेत शुभमन गिलला विश्रांती देण्यात आली असून सलामीसाठी कर्णधार रोहित शर्मासह धवन आणि राहुल यांचा पर्याय भारताकडे उपलब्ध आहे.
राहुलने गेल्या काही काळात एकदिवसीय क्रिकेटमध्ये मधल्या फळीत फलंदाजी केली आहे. मात्र, मधल्या फळीसाठी भारताकडे अन्य बरेच पर्याय असल्याने राहुलला सलामीला संधी दिली जाते का, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. विराट कोहली तिसऱ्या क्रमांकावर खेळणे निश्चित असून श्रेयस अय्यरला चौथ्या क्रमांकावर संधी मिळू शकेल. ऋषभ पंत पाचव्या क्रमांकावर खेळण्याची शक्यता असून तो यष्टीरक्षणाची धुरा सांभाळेल. गोलंदाजीची भिस्त अक्षर पटेल, मोहम्मद सिराज, शार्दूल ठाकूर यांच्यावर असेल.दुसरीकडे, बांगालादेशचा नवनियुक्त कर्णधार लिटन दास चांगल्या कामगिरीने मालिकेची सुरुवात करण्याचा प्रयत्न करेल.
वेळ : सकाळी ११.३० वा.
थेट प्रक्षेपण : सोनी टेन ३, टेन ५