हिंसक मोर्चानंतर शहरात पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात
त्रिपुरा हिंसेच्या निषेधार्थ मालेगावातील काही मुस्लिम संघटनांनी बंद पुकारला होता. या बंदला मालेगावसह मनमाडमध्येही उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. व्यापारी, दुकानदार, नागरिकांनी सर्व व्यवहार बंद ठेवून त्रिपुरा येथील घटनेचा निषेध केला.
दुपारपर्यंत सर्व बंद सुरळीत सुरु होता. बंद शांततेत पार पाडत हिंसाचार करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी मुस्लिम संघटनांनी केली. मात्र काही ठिकाणी याला अपवाद दिसला. काही व्यापाऱ्यांनी दुकाने सुरुच ठेवली होती. या दुकानदारांवर दबाव टाकून बळजबरीने दुकाने बंद करण्याच्या आणि मोर्चा काढण्याच्या उद्देशाने काही लोक नवीन बस स्थानक परिसरात एकत्र गोळा झाले होते.
मात्र पोलिसांकडून मोर्चाला परवानगी देण्यात आली नव्हती. त्यामुळे पोलिसांनी जमावाला पांगवले आणि माघारी पाठवले. यामुळे जमावातील लोकांनी पोलिसांवर दगडफेक करण्यास सुरुवात केली. याला प्रत्युत्तर म्हणून पोलिसांनीही जमावावर सौम्य लाठी चार्ज केला.