जगातील प्रत्येकजण मालमत्ता खरेदी करण्याचं स्वप्न पाहतो. लोकांना त्यांचं स्वप्नातील घर सर्वोत्तम असावं असं वाटत असतं. मात्र, अनेकवेळा लोभापायी किंवा पैसे वाचवण्याच्या नादात लोक अतिशय वाईट मालमत्ता खरेदी करतात. अशाच लोभापायी फसवणूक झालेल्या एका जोडप्याने आपली कहाणी सांगितली. ब्रिटनच्या या जोडप्याने फक्त एक युरो म्हणजेच भारतीय चलनात सुमारे शंभर रुपयांना घर विकत घेतलं. त्यांना वाटलं की त्यांनी खूप चांगला करार केला आहे. मात्र जेव्हा ते घरात शिफ्ट झाले, त्यानंतर वास्तव त्यांच्यासमोर उघड झालं.
या जोडप्याने हे घर ब्रिटनमधील कोब्रिजमध्ये घेतले होतं. घरची स्थिती त्यांना व्यवस्थित वाटली. घर बघून त्यांना वाटलं की त्यांनी खूप चांगल्या पद्धतीने डील क्रॅक केली. मात्र घरातून बाहेर रस्त्यावर आल्यावर त्यांना वास्तव कळालं. जे घर त्यांना केवळ १०० रुपयांना विकलं गेलं होतं, त्याच्याबाहेर सोफे, कचरा आणि रद्दीच्या वस्तू फेकल्या जातात. घराबाहेर पडलेले कचऱ्याचे ढीग पाहून या दाम्पत्याला धक्का बसला. या अस्वच्छतेमुळे हे घर त्यांना अवघ्या शंभर रुपयांना विकलं गेलं.
सेंच्युरी स्ट्रीट आणि डेबिंग स्ट्रीटमध्ये ज्या भागात घर बांधलं आहे, ती जागा पूर्णपणे घरांनी व्यापलेली आहे. ही घरं अशा पद्धतीने बनवण्यात आली आहेत की, सर्व एकमेकांना अगदी चिटकून आहेत. परिषदेने हे घर या लोकांना अवघ्या एक पौंडात विकलं होतं. मात्र इथे कचरा टाकला जाईल, असं त्यावेळी कोणी सांगितलं नव्हतं. कौन्सिलही याकडे अधिक लक्ष देत नाही. तसंच स्वच्छतेसाठी आवश्यक ती पावलं उचलत नाहीत.
दाम्पत्याने सांगितलं की, ड्रग्ज अॕडिक्ट लोक त्यांच्या घराबाहेरील रस्त्यांवरुन फिरत असतात. यासोबतच चोरीच्या घटनाही मोठ्या प्रमाणात होत आहेत. ड्रग्ज घेऊन फेकलेल्या सुयाही घराच्या बाहेर रस्त्यावर दिसतात. जोडप्याच्या घराशेजारी राहणाऱ्या महिलेनं सांगितले की, तिने हे घर ३३ वर्षांपूर्वी घेतलं होते. तेव्हा इथे हे सगळं होत नसे. मात्र हळूहळू या भागात अमली पदार्थ विक्रेते वाढत गेले. त्यामुळे आजच्या घडीला प्रत्येकजण इथून बाहेर पडण्याचा प्रयत्न करत आहे. या कारणास्तव, ही घरं कवडीमोल भावाने विकून इथले लोक आपली सुटका करून घेत आहेत.