तर अजित पवार 4 दिवसांत राज्यच विकून मोकळे होतील : पडळकर

हिवाळी अधिवेशनाने राज्यातला राजकीय पारा वाढवला असून, सकाळी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केलेल्या वक्त्यावरून उठलेली राळ शमायच्या अगोदरच आता गोपीचंद पडळकरांनी त्यावरही कडी करणारे वक्तव्य केले आहे. यामुळे अधिवेशनात खरे मुद्दे कमी आणि राजकीय गुद्देच जास्त पाहायला मिळाले, तर काही वावगे वाटू देऊ नका. आज पडळकरांनी अजित पवारांना मुख्यमंत्री पदाचा चार्ज दिला, तर ते अधिवेशन संपायच्या आत 4 दिवसांत राज्यच विकून मोकळे होतील, अशी टीका केलीय. यामुळे राजकीय ठिणग्या अजून बऱ्याच पडण्याची चिन्हे आहेत.

गोपीचंद पडळकर आणि पवार यांचे सख्य उभ्या महाराष्ट्राला माहितय. आता अधिवेशन सुरू असताना पवारांवर टीका करण्याची संधी सोडणारे पडळकर कसले. त्यांनी अजित दादांवर शरसंधान साधले. ते म्हणाले, अजित पवारांना जर मुख्यमंत्री पदाचा चार्ज दिला, तर हे अधिवेशन संपायच्या आत चार दिवसांत ते राज्यच विकून मोकळं होतील. शिवाय सध्या सुरू असलेल्या परीक्षा घोटाळ्यांवरूनही त्यांनी सरकारवर जोरदार टीका केली.

पडळकर म्हणाले, राज्यात विद्यार्थी फक्त भाजपचेच आहेत का? प्रत्येक ठिकाणी लाखोंचे आकडे येत आहेत. हे प्रकरण थेट मंत्रालयापर्यंत पोचतंय. हे सारं सरकारच्या आशीर्वादानं होतंय, असा आरोपही त्यांनी केला. या घोटाळ्यात तुमचेच एवढी लोक यात सामील असतील, तर पोलीस चौकशी कशी करणार, असा सवाल करत सीबीआय चौकशीची मागणी केली. सीबीआय चौकशी केली, तर बिघडलं कुठं, तुम्ही काही केलं नाही, तर भीती कसली, करू द्या ना सीबीआय चौकशी, अशी मागणीही त्यांनी केली.

मुख्यमंत्री पदाचा चार्ज या विषयाला सकाळी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी तोंड फोडले. त्यांनी चक्क यात रश्मी ठाकरे, आदित्य ठाकरे यांना ओढले. ते म्हणाले, मुख्यमंत्र्यांचा जर पार्टीतही कोणाकडे विश्वास नसेल, तर रश्मी वहिनींना चार्ज देवून त्यांना मुख्यमंत्री करता येऊ शकतं. रश्मी ठाकरे मुख्यमंत्री झाल्यास आम्हाला आश्चर्य वाटणार नाही. त्यांना मंत्री म्हणून सामील करून घ्या. आदित्य ठाकरेंनाही ते चार्ज देवू शकतात. मात्र, त्यांचा बहुदा मुलावरही विश्वास नसेल. त्यामुळेच ते त्यांच्याकडे चार्ज देत नाही, अशी टिप्पणी त्यांनी केली.

चंद्रकांत पाटील यांच्या याच वक्तव्यावर महापौर किशोरी पेडणेकर यांनी संताप व्यक्त केला. त्या म्हणाल्या, चंद्रकांत दादांची किव येते. ते मोठे नेते आहेत. मात्र, भाजप नेते सातत्याने स्त्रीयांबद्दल आक्षेपार्ह बोलतात. ही हिंदू धर्माची शिकवण नाही. त्या पुढे म्हणाल्या की, रश्मी ठाकरे या कधी लाईन लाईफमध्ये नसतात. रश्मी ठाकरे यांच्यावर टीका करणे योग्य नाही. ते सहन केले जाणार नाही. मात्र, अमृता फडणवीस सतत ॲक्टीव आणि लाईन लाईफमध्ये असतात. त्यांना विरोधी पक्षनेत्या बणवणार का, असा सवालही त्यांनी केला. जर भाजपचे नेते असंच बोलणार असतील तर आम्ही पंतप्रधान मोदी यांची भेट घेऊ, असा इशाराही त्यांनी दिला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

scroll to top
error: आपल्याला माहिती कॉपी करण्याची परवानगी नाही.