मार्च महिन्याची सुरुवात होताच उन्हाचा चटका वाढला आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात तापमान वाढल्याने अनेक भागात उन्हाचा पारा चढलेला आहे. मात्र, तेच दुसरीकडे हवामान विभागाने वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता वर्तवली आहे. तसेच नाशिक जिल्ह्यातील मनमाड परिसरात पावसाने अक्षरश: झोडपून काढले.
मनमाडमधील परिस्थिती काय –
विजांचा कडकडाट आणि मेघ गर्जनेसह अवकाळी पावसाने मनमाड शहर परिसराला झोडपून काढले आहे. सुरुवातीला जोरदार पाऊस झाला. त्यानंतर रात्रभर पावसाची रिपरिप होती सुरू होती. पावसामुळे शेतात पाणी तुंबले आहे. त्यामुळे गहू, कांदा, हरभरा यासह इतर पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. अवकाळी पावसाने झालेल्या या नुकसानामुळे शेतकरी पुन्हा चिंताग्रस्त झाला आहे.
राज्यात 8 मार्चपर्यंत काही ठिकाणी ढगाळ हवामान राहून गडगडाटासह पावसाची शक्यता आहे. तर 7 मार्च रोजी मराठवाड्यात काही ठिकाणी गारपिटीची शक्यता आहे. एकीकडे मुंबईत जीवघेणा उकाडा तर दुसरीकडे राज्यात काही ठिकाणी पाऊस असे चित्र आहे.
धुळे जिल्ह्यात गारपीट झाली आहे. तसेच वीज पडून तीन बैल ठार झाले आहेत. धुळे जिल्ह्यात शनिवारी रात्रीच्या सुमारास शिरपूर व शिंदखेडा तालुक्यात झालेल्या वादळी वाऱ्यामुळे गहू, हरभरा, मका पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. वीज पडून सांगवी मंडळात एक तर शिंदखेडा तालुक्यातील वरझडी येथे दोन बैलांचा मृत्यू झाला आहे. तर जळगावच्या काही भागांत शनिवारी रात्री अवकाळी पाऊस झाला.
राज्यातील या जिल्ह्यांना इशारा –
नाशिक, पुणे, औरंगाबाद, अहमदनगर, बीड, जालना, बुलडाणा, अकोला, अमरावती, नागपूर, भंडारा, जळगाव, यवतमाळ, वर्धा, नागपूर, चंद्रपूर.