शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्ह एकनाथ शिंदेंना मिळाल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी पहिल्यांदाच जाहीर सभा घेतली. रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेडमध्ये उद्धव ठाकरेंची सभा झाली. या सभेमध्ये उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे, त्यांच्यासोबत गेलेले आमदार-खासदार, भाजप तसंच निवडणूक आयोगावर जोरदार प्रहार केला.
उद्धव ठाकरेंच्या या टीकेवर आता शिवसेनेनेही पलटवार केला आहे. उद्धव ठाकरेंनी सभा घेतली तिथेच म्हणजे खेडमध्येच एकनाथ शिंदे यांचीही सभा होणार आहे. 19 मार्चला खेडमध्ये एकनाथ शिंदेंच्या सभेचं आयोजन करण्यात आलं आहे. उद्योगमंत्री आणि शिवसेना नेते उदय सामंत यांनी याबाबतची माहिती दिली आहे.
‘शिवसेनेचे मुख्यनेते, वंदनीय हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचे खरे वारसदार राज्याचे मुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे १९ मार्चला खेड (रत्नागिरी) मध्ये.. शिवसेनेची जाहीरसभा.. लांडगे, कोल्हे म्हणणाऱ्यांना वाघाच्या डरकाळीने उत्तर.. कितीही आदळआपट करा योगेश कदमच आमदार.’, असं ट्वीट उदय सामंत यांनी केलं आहे.
‘महाराष्ट्र गुलामगिरी सहन करणार नाही. नुसतं मोदींचं नाव वापरून महाराष्ट्रात मत मागून दाखवा. बाळासाहेबांच्या नावाशिवाय मत मागून दाखवा. मोदींच्या नावाने मत मागून दाखवा. हिंमत असेल चोरलेलं धनुष्यबाण घेऊन तुम्ही मैदानात या, मी मशाल घेऊन मैदानात येतो. निवडणुकीला सामोरं जा,’ असं आव्हान उद्धव ठाकरे यांनी भाजप तसंच एकनाथ शिंदेंना दिलं आहे.
“शिवसेनेची स्थापना निवडणूक आयोगाच्या वडिलांनी नाही, तर माझ्या वडिलांनी केली आहे,” असं म्हणत उद्धव ठाकरेंनी नाव न घेता पंतप्रधान नरेंद्र मोदींवर हल्ला चढवला. तसेच भाजपाला आधी गल्लीतलं कुत्रं विचारत नव्हतं, असं म्हणत खोचक टोला लगावला. “हिंमत असेल तर निवडणुकीला सामोरं जा, जनतेने मला नाकारलं तर वर्षा सोडलं तसाच निघून जाईन, मी मशाल घेऊन येतो, तुम्ही चोरलेला धनुष्यबाण घेऊन मैदानात या, असं आव्हान ठाकरेंनी दिलं आहे.