‘भारताला अजून अनेक सानिया हव्या आहेत’, सानिया मिर्झाच्या टेनिस कारकिर्दीला अखेर पूर्ण विराम
टेनिस खेळात आंतरराष्ट्रीय पातळीवर भारताचं नाव लौकिक वाढवणारी खेळाडू सानिया मिर्झा हिने रविवारी आपल्या शानदार कारकिर्दीचा समारोप केला. सानियाने 20 वर्षांपूर्वी लाल बहादूर टेनिस स्टेडिअममध्ये आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली होती, तर याच ठिकाणी काल प्रदर्शनीय सामना खेळून तिने आपल्या कारकिर्दीचा समारोप केला.
सानियाने फेब्रुवारी 2023 मध्येच तिच्या आंतरराष्ट्रीय टेनिस कारकिर्दीचा निरोप घेतला आहे. तिने तिचा अखेरचा आंतरराष्ट्रीय सामना डब्लूटीए दुबई ड्यूटी फ्री चॅम्पियनशिप स्पर्धेत खेळला होता. पण तिला या स्पर्धेतील मिश्र दुहेरीच्या पहिल्याच फेरीत अमेरिकन जोडीदार मॅडिसन कीजबरोबर खेळताना पराभव स्विकारावा लागला होता. तसेच सानियाने जानेवारी 2023 मध्ये ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धेतील मिश्र दुहेरी प्रकारात रोहन बोपन्नाबरोबर अंतिम सामना खेळला होता. हा तिचा अखेरचा ग्रँडस्लॅम सामना ठरला होता.
तुकाराम महाराजांच्या दर्शनासाठी शरद पवार देहूत, 24 वर्षांनी ठेवलं मंदिरात पाऊल
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी देहूमध्ये संत तुकाराम महाराजांच्या मंदिरात येऊन दर्शन घेतलं आहे. तब्बल 24 वर्षांनंतर शरद पवारांनी तुकाराम महाराज मंदिरात पाऊल ठेवलं आहे. तुकाराम महाराजांच्या मुख्य मंदिरात शरद पवारांनी विठू माऊलीचंही दर्शन घेतलं.
जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांच्या जीवन कार्यातील प्रसंगचित्रण दिनदर्शिका अनावरण सोहळा शरद पवार यांच्या हस्ते पार पडला. या कार्यक्रमाला शरद पवार यांच्या पत्नी प्रतिभा पवारही उपस्थित होत्या. शरद पवार यांचा तुकाराम पगडी घालून सत्कार करण्यात आला.
मी देव-दानव यापासून लांब असतो, पण काही देवस्थान अशी आहेत, जी अंत:करणात आहेत, त्यापैकी एक म्हणजे शेगाव. आळंदी देहूत आल्यानंतर मानसिक समाधान मिळतं, असं शरद पवार या कार्यक्रमात म्हणाले.
होळी, धुळवडीआधीच महाराष्ट्रात पावसाची शक्यता!
राज्यात सगळीकडे होळीची धामधूम सुरू असताना वरुणराजानेही हजेरी लावली आहे. विदर्भातील नागपूर, वर्धा, भंडारा, यवतमाळ जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. विदर्भातील नागपूर जिल्ह्यात काही ठिकाणी गारपिटीची शक्यता आहे. तर मुंबईसह पश्चिम आणि उत्तर महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्येही पावसाने तुरळक हजेरी लावली आहे.पालघर, नाशिक, धुळे, नंदुरबार, छत्रपती संभाजीनगर, ठाणे, बीड आणि उत्तर मध्ये महाराष्ट्रात सध्या पावसाची शक्यता आहे. तर बदलापूरलाही हलक्या सरी बरसण्याची शक्यता आहे.
हार्दिक पांड्याने केला नवा विक्रम! इंस्टाग्राम फॉलोवर्सच्या बाबतीत भल्याभल्यांचे तोडले रेकॉर्ड
भारताचा स्टार क्रिकेटर हार्दिक पांड्या नेहमी विविध कारणांमुळे चर्चेत येत असतो. अशातच आता हार्दिक पांड्याने इंस्टाग्राम फॉलोवर्सच्या बाबतीत भल्याभल्यांचे रेकॉर्ड तोडले आहेत. हार्दिकने नुकताच इंस्टाग्रामवर 25 मिलियन फॉलोवर्सचा टप्पा गाठला असून यासोबतच त्याने एक नवा विक्रम आपल्या नावे केला आहे.हार्दिक पांड्या हा आपल्या सोशल मीडियावर नेहमीच अॕक्टिव्ह राहून आपल्या चाहत्यांना तो स्वतःच्या जीवनाविषयी विविध अपडेट्स देत असतो. अशातच हार्दिक गेल्या काही वर्षांमध्ये भारतीय क्रीडा क्षेत्रातील सर्वात रोमांचक व्यक्तिमत्व म्हणून उदयास आला आहे. यामुळे हार्दिकला फॉलो करणाऱ्यांची संख्या 25 मिलियनपर्यंत पोहिचली असून तो इंस्टाग्रामवर 25 दशलक्ष फॉलोअर्सचा टप्पा गाठणारा जगातील सर्वात तरुण क्रिकेटपटू ठरला आहे.
भारताच्या अडचणीत वाढ! चौथ्या कसोटीत या खेळाडूकडे ऑस्ट्रेलियाच कर्णधार पद
भारत विरुद्ध आॕस्ट्रेलिया यांच्यात सध्या बॉर्डर गावस्कर ट्रॉफीचे सामने सुरु आहेत. 9 मार्च पासून अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात चौथा कसोटी सामना खेळवला जाणार आहे. या सामन्याकरता ऑस्ट्रेलिया संघात मोठा बदल करण्यात आला असून यामुळे भारताच्या अडचणीत मोठी वाढ होण्याची शक्यता आहे.
बॉर्डर गावस्कर ट्रॉफी सामन्यात ऑस्ट्रेलिया संघाच्या कर्णधार पदाची धुरा ही पॅट कमिन्सकडे सोपवण्यात आली होती. त्याच्या नेतृत्वात ऑस्ट्रेलियाचा संघ कसोटी मालिकेत कमाल दाखवू शकला नाही आणि परिणामी भारताने नागपूर आणि दिल्ली येथे झालेले दोन्ही सामने जिंकून मालिकेत 2-0 अशी आघाडी घेतली. परंतु इंदोर येथील तिसऱ्या सामन्यापूर्वी काही कौटुंबिक कारणामुळे कर्णधार पॅट कमिन्सला मायदेशात परतावे लागले. त्यामुळे ऑस्ट्रेलिया संघाचे कर्णधारपद हे स्टीव्ह स्मिथकडे देण्यात आले. यावेळी स्टीव्ह स्मिथच्या नेतृत्वात ऑस्ट्रेलियाने मालिकेत जोरदार कमबॅक करून मालिकेत 2-1 ने पिछाडी भरून काढली.
दिल्ली मद्य धोरण : मनिष सिसोदियांची २० मार्चपर्यंत न्यायालयीन कोठडीत रवानगी
सीबीआयने दिल्ली मद्य धोरण प्रकरणात आम आदमी पार्टीचे नेते मनिष सिसोदिया यांना दिल्लीच्या न्यायालयात हजर केलं होतं. सीबीआयने कोर्टाकडे मनिष सिसोदियांची रिमांड मागितली नाही. कोर्टाने यानंतर २० मार्चपर्यंत मनिष सिसोदियांना न्यायालयीन कोठडीत धाडलं आहे. सीबीआयने हे म्हटलं आहे आम्ही त्यांचा ताबा मागत नाही. मात्र येत्या काही दिवसांमध्ये त्यांची चौकशी केली जाईल. गेल्या वेळी जेव्हा मनिष सिसोदियांना न्यायालयासमोर आणलं गेलं होतं तेव्हा त्यांची रिमांड वाढवण्यात आली होती. मात्र न्यायालयापुढे सीबीआयने कुठलीही मागणी केलेली नाही. त्यामुळे मनिष सिसोदियांना २० मार्चपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.
इम्रान खान यांची पोलिसांना हुलकावणी, उद्या न्यायालयात हजर होण्याचे आश्वासन
पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांना अटक करण्यासाठी त्यांच्या निवासस्थानी गेलेल्या पोलिसांना रिकाम्या हाती परत जावे लागले. इम्रान खान घरी नव्हते, मात्र ते मंगळवारी न्यायालयासमोर हजर राहतील असे त्यांच्या वकिलांनी पोलिसांना सांगितले. आम्ही इम्रान यांच्या खोलीतही शोध घेतला असे पोलिसांकडून सांगण्यात आले.
दरम्यान, इस्लामाबाद न्यायालयाने इम्रान यांना अटक करण्याचे आदेश दिलेले नसून त्यांना ७ मार्चपर्यंत न्यायालयासमोर हजर राहण्यास सांगण्यात आलेले आहे, असा युक्तिवाद पाकिस्तान तेहरिक-ए-इन्साफचे उपाध्यक्ष आणि माजी परराष्ट्रमंत्री शाह महमूद कुरेशी यांनी केला. तोशाखाना प्रकरणात न्यायालयाने बिगर-जामीन अटक वॉरंट जारी केल्यामुळे त्यांना अटक होण्याची शक्यता आहे. इम्रान खान यांनी तीन वेळा सुनावणीसाठी न्यायालयात हजर राहणे टाळले आहे.
SD Social Media
9850 60 3590