राज्याच्या काही भागांत ढगांच्या गडगडाटासह पावसाचा इशारा देण्यात आला आहे. उद्या, 5 एप्रिल आणि 6 एप्रिल रोजी रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग, सातारा, कोल्हापुरात पावसाचा अंदाज आहे. सोसाट्याच्या वा-यासह मुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्यानं दिला आहे.
राज्यात उन्हाचा तडाखा वाढला आहे. विदर्भात उष्णतेची लाट आली आहे. पण आता राज्यात पुन्हा अवकाळी पावसाचं संकट ही आलं आहे. हवामान विभागानं (IMD) पावसाचा अंदाज वर्तवला आहे.
रत्नागिरी, सातारा, सिंधुदुर्ग आणि कोल्हापुरात पावसाचा अलर्ट देण्यात आला असून या जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी करण्यात आलाय. पावसामुळे काहीसा दिलासा मिळण्याची शक्यता असली तरी शेतकऱ्यांचं मात्र नुकसान होत आहे.
दुसरीकडे पश्चिम महाराष्ट्रात अवकाळी पाऊस झाला आहे. सोलापूर जिल्ह्यातील सांगोला, पंढरपूर अक्कलकोट इथं पावसानं जोरदार हजेरी लावली. अक्कलकोट तालुक्यातील शिरवळमध्ये मुसळधार पाऊस झाला. पावसानं शेतक-यांची धांदल उडवली असली तरी हवेत गारवा निर्माण झाला आहे. सांगली शहरासह जिल्ह्याच्या काही भागात संध्याकाळी चांगला पाऊस झाला. तापमानाचा पारा 40 अंशांवर गेला असताना या पावसानं नागरिकांना काहीसा दिलासा दिला आहे.