अभिनेता शाहरुख खान प्रमुख भूमिकेत असलेला ‘पठाण’ चित्रपट अलीकडे खूप चर्चेत आहे. या चित्रपटातील ‘बेशरम रंग’ हे गाणं वादाच्या भोवऱ्यात सापडलं होतं. या गाण्यात दीपिका पादुकोणने भगव्या रंगाची बिकीनी परिधान केल्याने वाद निर्माण झाला होता. तसेच, भाजपाच्या नेत्यांनी गाण्यावर आक्षेप घेतला होता. अशातच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चित्रपटांबद्दल भाष्य करणाऱ्या भाजपा नेत्यांना सल्ला दिल्याचं समोर आलं आहे.
वर्षभरात होणाऱ्या ९ राज्यांच्या विधानसभा आणि आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सखोल रणनिती ठरवण्यासाठी सोमवार आणि मंगळवारी भाजपाचे राष्ट्रीय मंथन पार पडले. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कार्यकर्त्यांना संबोधित केलं. तेव्हाच पंतप्रधान मोदी यांनी भाजपा कार्यकर्ते आणि नेत्यांना चित्रपटाबद्दल अनावश्यक टिप्पणी टाळा, असं म्हटलं आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पंतप्रधान मोदी म्हणाले की, “आपण दिवसभर काम करत असतो. तर, काहीजण चित्रपटांबद्दल विधानं करत असतात. याची दिवसभर माध्यमांत चर्चा होत राहते. त्यामुळे नेत्यांनी चित्रपटाबद्दल अनावश्यक वक्तव्य करण्यापासून दूर राहिलं पाहिजे.” पण, यावेळी पंतप्रधान मोदींनी कोणत्याही नेत्याच्या अथवा चित्रपटाच्या नावाचा उल्लेख केला नाही.
भाजपाचे आमदार राम कदम यांनी ‘पठाण’ चित्रपटातील ‘बेशरम रंग’ गाण्यावर आक्षेप घेतला होता. “पठाण चित्रपटाला देशभरातील साधू-संतांसह सोशल मीडियावर विरोध होत आहे. अनेक हिंदू संघटना या चित्रपटाला विरोध करताना दिसत आहेत. महाराष्ट्रातही सध्या हिंदुत्व विचारधारा असणारं सरकार आहे. त्यामुळं चित्रपट निर्माता आणि दिग्दर्शकांनी समोर येऊन त्यांची बाजू स्पष्ट करावी.”