शिर्डी साई संस्थानच्या दानपेटीत जुन्या नोटांचा ओघ सुरूच आहे. साई दर्शनाला येणारे भक्त दान पेटीमध्ये जुन्या ज्या नोटा चलनातून बाद झाल्या आहेत त्या टाकत असल्याचे आढळून आले आहे. कोट्यावधीच्या जुन्या नोटा साई संस्थानच्या तिजोरीत पडून आहेत. दरम्यान याबाबत आता काही महिन्यांपासून भारताची मध्यवर्ती बँक असलेल्या रिझर्व्ह बँक आणि केंद्रीय गृह मंत्रालयाशी पत्रव्यवहार सुरू असल्याची माहिती शिर्डी साई संस्थानच्या मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री बानायत यांनी दिली. दरम्यान आता आरबीआय या नोटांबाबत काय निर्णय घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
साईबाबा संस्थानच्या तिजोरीत तीन कोटींपेक्षा अधिक रुपयांच्या जुन्या पाचशे व हजार रुपयांच्या नोटा आढळून आल्या आहेत. विशेष म्हणजे नोटबंदीला पाच वर्षे उलटली तरी आजही दानपेटीतील या जुन्या नोटांची आवक थांबलेली नाही. आज ही थोड्या फार प्रमाणात या नोटा दानपेटीतील पैशांची मोजदाद करताना आढळून येतात. गेल्या 5 वर्षांत दानपेटीत पडणाऱ्या या नोटांनी साई संस्थानची डोकेदुखी वाढवली आहे. यासाठी केंद्रीय पातळीवर अनेकदा पाठपुरावा करण्यात आला असला, तरी अद्याप यावर कुठलाही तोडगा निघू शकलेला नाही.
दानपेटीत अजूनही कमी-अधिक प्रमाणात या नोटा आढळतात. अन्य देवस्थानांच्या बाबतीतही अशीच परिस्थिती असण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर आरबीआयने नोंदणीकृत देवस्थानांच्या दानपेटीत टाकण्यात आलेल्या जुन्या नोटा जमा करून घ्याव्यात अशी मागणी साईबाबा संस्थानच्या वतीने करण्यात आली आहे. सध्या चलनातील इतर नोटा राष्ट्रीयकृत बँकेत जमा करण्यात येतात, मात्र जुन्या नोटा निघाल्यानंतर त्याची स्वतंत्र नोंद ठेवून त्यावर आयुक्तांच्या धर्मादाय प्रतिनिधींची स्वाक्षरी घेतली जाते. यानंतर त्या तिजोरीत ठेवण्यात येतात. आजवर संस्थानच्या तिजोरीत तीन कोटींपेक्षा अधिक नोटा साचलल्याची माहिती साई संस्थानच्या वतीने देण्यात आली आहे.