परिश्रम हा एकमात्र मार्ग, विजय हाच एकमात्र पर्याय’ : पंतप्रधान नरेंद्र मोदी

देशातील कोरोना स्थितीचा आढावा घेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची आज बैठक घेतली. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मात्र आजारी असल्यामुळे या बैठकीला उपस्थित राहू शकले नाहीत. त्यांच्याऐवजी मोदींच्या उपस्थितीतील या बैठकीला आरोग्यमंत्री राजेश टोपे उपस्थित राहिले आहे. यावेळी पंतप्रधान मोदी यांनी राज्य सरकारांना मार्गदर्शन केलं. त्यावेळी ‘कोरोना विरोधातील लढाईत परिश्रम हा एकमात्र मार्ग आणि विजय हाच एकमात्र पर्याय आहे’, असं मोदी यावेळी म्हणाले.

पंतप्रधान मोदी राज्यांना मार्गदर्शन करताना म्हणाले की, ‘100 वर्षातील सर्वात मोठ्या महामारीविरोधात भारताची लढाई आता तिसऱ्या वर्षात प्रवेश करत आहे. परिश्रम हा आपला एकमात्र मार्ग तर विजय हा एकमात्र पर्याय आहे. आपण 130 कोटी भारताचे लोक, आपल्या प्रयत्नातून कोरोनावर नक्की विजय मिळवू. ओमिक्रॉनबाबत सुरुवातीला जी संशयाची स्थिती होती ती आता कमी होत आहे. सुरुवातीला जे व्हेरियंट होते त्यापेक्षा कितीतरी पट अधिक वेगाने ओमिक्रॉन नागरिकांना संक्रमित करत आहे. आपल्याला सतर्क राहावं लागणार आहे. मात्र पॅनिक होऊन चालणार नाही. आपल्याला हे पाहावं लागणार आहे की सणासुदीच्या काळात लोक आणि प्रशासन अलर्टनेसमध्ये कुठेही कमी पडणार नाही, अशी सूचना मोदींनी सर्व राज्यांना केलीय.

सुरुवातीला केंद्र आणि राज्य सरकारांना ज्या प्रमाणे pre-emptive, pro-active आणि collective approach ठेवला, तोच यावेळी विजयाचा मंत्र आहे. भारतात बनलेली लस जगभरात आपली श्रेष्ठता सिद्ध करत आहे. प्रत्येक भारतीयासाठी हा अभिमानाचा विषय आहे की आज भारताने जवळपास 92 टक्के वयोवृद्ध लोकांना लसीचा पहिला डोस दिला आहे. तर लसीच्या दुसऱ्या डोसचं देशातील प्रमाण जवळपास 70 टक्केच्या आसपास पोहोचलं आहे. 10 दिवसाच्या आत भारताने आपल्या जवळपास 3 कोटी युवकांना लस दिली आहे. हे भारताचं सामर्थ्य दाखवतं, या महामारीला सामोरं जाण्यासाठी आपली तयारी दर्शवतं’, असंही मोदी यांनी सांगितलं.

फ्रन्टलाईन वर्कर्स आणि सिनियर सिटिझन्सला बुस्टर डोस जेवढ्या लवकर दिला जाईल, तेवढंच आपल्या आरोग्य यंत्रणेचं सामर्थ्य वाढेल. तसंच शत प्रतिशत लसीकरण आणि हर घर दस्तक अभियानाला आपल्याला अजून गती देण्याची गरज असल्याचंही मोदी म्हणाले. सामान्य लोकांचं जीवन, कमीत कमी आर्थिक नुकसान व्हावं आणि आर्थिक व्यवस्थेची गती अबाधित राहो यासाठी रणनिती आखताना हे लक्षात ठेवणं महत्वाचं असल्याचंही मोदी म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

scroll to top
error: आपल्याला माहिती कॉपी करण्याची परवानगी नाही.