भारतीय अर्थव्यवस्थेच्या दृष्टीनं आनंदाची बातमी आहे. यंदा देशाचा आर्थिक विकासाचा दर (GDP) दुहेरी आकड्यात जाण्याची शक्यता खरी होण्याची चिन्हं आहेत. पहिल्या सहा महिन्यात आर्थिक विकासाचा दर 13.7% नोंदवण्यात आला.
पुढील सहा महिन्यात विकासाचा दर 6 टक्क्यांपेक्षा थोडासा अधिक राहिल्यास अर्थिक विकासदर १० टक्क्यांच्या वर जाण्याचा अंदाज आज पंतप्रधानांचे मुख्य आर्थिक सल्लागार के व्ही सुब्रह्मण्यम यांनी म्हटलं आहे.
कोरोनाच्या काळात घसरलेल्या अर्थिक विकासाची गाडी पुन्हा रुळावर येण्याचे स्पष्ट संकेत मिळाले आहेत. गेल्या आर्थिक वर्षात देशाचा विकासचा दर उणे 7.4 टक्क्यांवर घसरला होता. यंदा मात्र एप्रिल ते जून या कालावधीत विकासदर 20 टक्क्यांच्या वर गेला आहे. तर दुसऱ्या म्हणजे जुलै ते सप्टेंबर तिमाहीत 8.4% विकासदर नोंदवण्यात आला. त्यामुळे पहिल्या सहा महिन्यांचा सरासरी विकासदर 13.7 टक्के नोंदवण्यात आलाय.
अर्थसंकल्प सादर करतानाच केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी चालू आर्थिक वर्षाचा विकासदर 10.5 टक्क्यांच्या जवळपास राहील असा अंदाज वर्तवला होता. पण दुसऱ्या लाटेचा प्रभाव आणि लसीकरणाचा वेग यामुळे हा अंदाज खरा ठरण्याविषयी परदेशी रेटींग एजन्सींनी साशंकता व्यक्त केली होती
पण आज जाहीर झालेल्या आकडेवारीमुळे भारताची अर्थव्यवस्था वेगानं कोव्हिड पूर्व काळाप्रमाणेच वेगानं वाढेल असं चित्र पुढे येत आहे.