हिजाबविरोधात देशभर सुरू असलेल्या निदर्शनांचे खापर इराणच्या अध्यक्षांनी अमेरिकेवर फोडले आहे. देशात अस्थिरता पसरवण्याचा फसलेला कट अमेरिकेने आखला होता, असा आरोप इराणचे अध्यक्ष इब्राहिम रईसी यांनी केला.
महसा अमिनी या २२ वर्षीय तरुणीचा पोलीस कोठडीत मृत्यू झाल्यानंतर इराणची राजधानी तेहरानसह देशभरात तीव्र निदर्शने होत आहेत. अनेक शालेय विद्यार्थिनीदेखील हिजाब फेकून देत असल्याच्या चित्रफिती प्रसारमाध्यमांत पसरल्या. बुधवारी आंदोलन चिरडण्यासाठी पोलिसांनी गोळीबार केल्याची चित्रफीतही समोर आली असताना यामागे अमेरिका आणि पाश्चिमात्य देशांचा हात असल्याचा आरोप रईसी यांनी केला. कझाकस्तानमधील अस्ताना येथील एका परिषदेत बोलताना त्यांनी अमेरिकेवर जोरदार तोंडसुख घेतले. ‘‘इराणवर लष्कराचा आणि त्यानंतर निर्बंध घालून दबाव टाकण्याचा प्रयत्न झाला. मात्र त्यात ते अपयशी ठरले. त्यानंतर आता अस्थिर करण्याचे फसलेले धोरण अमेरिका अमलात आणत आहेत.’’