इंडियन प्रिमिअर लीग म्हणजेच आयपीएलमध्ये २०२२ साली पार पडलेले पहिलेच असे पर्व ठरले ज्यामध्ये रोहित शर्माला एकही अर्धशतक झळखावता आलं नाही. हे पर्व मुंबई इंडियन्सचं नेतृत्व करणाऱ्या रोहित शर्माला वैयक्तिक स्तरावर आणि कर्णधार म्हणूनही फार वाईट गेलं. मुंबईचा संघ साखळी फेरीनंतर बाहेर पडला. साखळी फेरीमधील दिल्ली कॅपीटल्सविरुद्धच्या शेवटच्या सामन्यामध्येही रोहित स्वस्तात परतला अन् त्याचा पर्वातील शेवटही गोड होईल ही चाहत्यांची अपेक्षा मावळली. शेवटच्या सामन्यात रोहितने १३ चेंडूंमध्ये दोन धावा केल्या. मात्र हा सामना मुंबई इंडियन्सच्या संघाने पाच गडी राखून जिंकला. संघ म्हणून या सामन्यात विजय मिळून मुंबई इंडियन्सने शेवट गोड केला. मात्र संघ गुणतालिकेमध्ये तळाशी म्हणजे आठव्या स्थानी राहिला.
हिटमॅन नावाने लोकप्रिय असणाऱ्या रोहितला या पर्वामध्ये अवघ्या १९.१४ च्या सरासरीने १४ सामन्यांत २६८ धावा करता आल्या. त्याचा सर्वाधिक स्कोअर ४८ इतका राहिला. दरम्यान रोहित सध्या टी-२० विश्वचषकासाठी ऑस्ट्रेलियामध्ये असला तरी त्याने १३ ऑक्टोबर रोजी केलेल्या एका ट्वीटमुळे तो मुंबई इंडियन्सची साथ सोडणार की काय अशी शंका उपस्थित केली जात असल्याचं वृत्त ‘डीएनए’ने दिलं आहे. तर काहींनी या ट्वीटवरुन टी-२० विश्वचषकाआधी कर्णधाराने असं बोलणं हे आश्चर्याचा धक्का देणार आहे असं म्हटलं आहे.
‘नवीन संघाची बांधणी करतोय’ असं ट्वीट रोहितने केलं आहे. “मी नवा संघ बांधतोय. कोणी आहे का?” असं रोहितने म्हटलं आहे. म्हणजेच मी नवीन संघ तयार करत आहे. कोणाकोणाला त्यामध्ये येण्याची इच्छा आहे अशा अर्थाचं हे ट्वीट असून त्यावर मागील १२ तासांमध्ये हजारोंच्या संख्येने रिप्लाय आले आहेत. हे ट्वीट साडेपाच हजारांहून अधिक वेळा रिट्वीट करण्यात आलेलं आहे.
मात्र विश्वचषकाआधी कर्णधाराच्या अकाऊंटवरुन असं ट्वीट आल्याने काहींनी थेट नाराजी व्यक्त करत महत्त्वाच्या मालिकेआधी कर्णधाराने नवा संघ उभारतोय असं म्हणणं चुकीचा संदेश देणार असल्याचं मत मांडलं आहे.दरम्यान दुसरीकडे अनेक क्रिकेटपटूंनी रोहितचं हे ट्वीट कोट करुन रीट्वीट केल्याने हे एखाद्या जाहिरातीचं कॅम्पेन असावं अशी शक्यताही चाहत्यांनी व्यक्त केलेली आहे. आता हा नेमका काय प्रकार आहे ते रोहितच्या पुढच्या ट्वीटनंतरच स्पष्ट होईल. २०११ पासून रोहित मुंबई इंडिन्स संघामधून खेळतोय. त्यापूर्वी तो डेक्कन चार्जर्स संघासाठी दोन पर्व खेळला आहे.