उत्तर प्रदेशातील लखमीपूर हिंसेवरून काँग्रेस नेते सचिन पायलट यांनी भाजप सरकारवर हल्लाबोल केला आहे. कृषी उत्पन्न दुप्पट करण्याचे स्वप्न दाखवलेल्या भाजपाला देशतील शेतकऱ्यांनी नाकारले आहे. शेतकऱ्यांवर भाजप कार्यकर्ते करत असलेले हल्ले गंभीर आहेत. उत्तर प्रदेशातील लखीमपूर येथील शेतकरी आंदोलनातील हिंसेची न्यायालयीन चौकशी करावी, अशी मागणी सचिन पायलट यांनी केली.
सचिन पायलट आज मुंबईत होते. आझाद मैदान येथील काँग्रेस कार्यालयात त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी पायलट यांनी भाजपवर हल्ला चढवला. शेतकरी आंदोलन दाबवण्याचा केंद्र सरकार व भाजपा प्रयत्न करत असून त्यात त्यांना यश येणार नाही. हरियाणाचे मुख्यमंत्री खट्टर हे शेतकऱ्यांच्या विरोधात भाजपा कार्यर्त्यांना लाठी उचला, असे सांगत आहेत. हा प्रकार देशातील लोकशाहीची मुळे उखडण्याचा प्रकार आहे, असा आरोप पायलट यांनी केला.
लखीमपूर येथील शेतकरी आंदोलनातील पीडितांच्या कुटुंबियास काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी भेटण्यास जात होत्या. त्यांना उत्तर प्रदेश सरकारने बेकायदेशीर रित्या स्थानबद्ध केले. एखादा नेता पीडितांना भेटण्यास जाण्याने कायदा व सुव्यवस्था कशी काय अडचणीत येऊ शकते, असा सवालही त्यांनी केला. साडेसात वर्षात सर्वच आघाड्यावर केंद्रातील मोदी सरकार साफ अपयशी ठरले आहे. विद्यार्थी, शेतकरी, मध्यमवर्ग, युवक, व्यापारी सर्वजण त्रस्त आहेत. मात्र केंद्राच्या विरोधातील लढाई ही राजनैतिक मार्गानीच लढली पाहिजे, अहिंसेच्या मार्गाने केंद्र सरकारला प्रत्युत्तर दिले पाहिजे, असं आवाहनही त्यांनी केलं.
गुजरातमध्ये 21 हजार कोटींचे अंमली पदार्थ एका कंपनीने आयात केले होते. मात्र त्याची माहिती गुजरात सरकार दडपून ठेवत असून या प्रकाराची सर्वोच्च न्यायालयामार्फत चौकशी व्हावी, अशी मागणीही त्यांनी यांनी केली. देशात ड्रग्ज रुट बनवला जात आहे, असा आरोप पायलट यांनी केला.