येत्या 7 ऑक्टोबरपासून राज्यात नवरात्रौत्सवाला सुरुवात होणार आहे. मात्र, कोरोनाचं संकट कायम असल्याने गृहविभागाने मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. नियमाच्या आधीन राहून नवरात्रौत्सव साजरा करण्यास परवानगी दिली आहे. देवींच्या मिरवणुकांपासून ते रावन दहनापर्यंतच्या अनेक बाबींवर कोर्टाने यावेळी भाष्य केलं आहे.
नवरात्रौत्सव मार्गदर्शक तत्त्व?
सार्वजनिक नवरात्रौत्सव मंडळांनी महापालिका तसेच स्थानिक प्रशासनाची त्यांच्या धोरणानुसार योग्य पद्धतीने पूर्वपरवानगी घेणे आवश्यक आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महापालिका तसेच संबंधित स्थानिक प्रशासनाच्या मंडपाबाबतच्या धोरणाशी सुसंगत असे मर्यादित स्वरुपाचे मंडप उभारावेत.
यावर्षीचा नवरात्रौत्सव साध्या पद्धतीने साजरा करण्याच्या अनुषंगाने घरगुती तसेच सार्वजनिक देवीच्या मूर्तींची सजावट त्या अनुषंगाने करण्यात यावी.
देवीच्या मूर्तीची उंची सार्वजनिक मंडळांसाठी 4 फुटांची, तर घरगुती देवीच्या मूर्तीची उंची 2 फुटांचीच असावी.
शक्यतो देवीच्या मूर्तीऐवजी घरातील धातूच्या किंवा संगमरवरच्या मूर्तीचे पूजन करावे. मूर्ती शाडूची किंवा पर्यावरणपूरक असल्यास अशा मूर्तीचे विसर्जन शक्यतो घरच्याघरीच करावे.
देवीच्या मूर्तीचे विसर्जन घरी करणे शक्य नसल्यास कृत्रिम विसर्जन स्थळी विसर्जन करण्यासंदर्भात स्थानिक प्रशासनाशी समन्वय ठेवावा.
नवरात्रौत्सवासाठी वर्गणी किंवा देणगी स्वेच्छेने दिल्यास त्यांचा स्वीकार करावा.
जाहिरातींच्या प्रदर्शनामुळे गर्दी आकर्षित होणार नाही असे पाहावे.
तसेच आरोग्य विषयक आणि सामाजिक संदेश असलेल्या जाहिराती प्रदर्शित करण्यास पसंती द्यावी. तसेच ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ या मोहिमेबाबत देखील जनजागृती करण्यात यावी.
गरबा, दांडिया आणि इतर सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करू नयेत. त्यांऐवजी आरोग्य विषयक उपक्रम, शिबिरे आयोजित करण्यास प्राधान्य द्यावे. या द्वारे मलेरिया, डेंग्यू असे आजार आणि त्यांचे प्रतिबंधात्मक उपाय, तसेच स्वच्छता यांबाबत जनजागृती करण्यात यावी.
देवीच्या दर्शनाची सुविधा ऑनलाईन, केबल नेटवर्क, वेबसाईट व फेसबुक इत्यादीद्वारे उपलब्ध करुन देण्याबाबत जास्तीतजास्त व्यवस्था करण्यात यावी.
देवीच्या मंडपामध्ये प्रत्यक्ष येऊन दर्शन घेणाऱ्या भाविकांच्या बाबतीत राज्य शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने जारी केलेल्या मार्गदर्शक सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे.